९८वे अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना २०१२ चंद्रपूर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला होता. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील काही अंश यानिमित्ताने…
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्रेपन्नावे अधिवेशन ५ जानेवारी १९७९ रोजी चंद्रपूर येथे झाले होते. त्यावेळी संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात कथाकार प्रा. वामन कृष्ण चोरपडे हे होते. आणि स्वागताध्यक्ष श्रीयुत शांतारामजी पोटदुखे हे होते. त्यावेळच्या संमेलनात मी माझ्या एकदोन कविता वाचल्या होत्या. तेहतीस वर्षांनंतर आज दिनांक ३ फेब्रवारी २०१२ रोजी मी माझे अध्यक्षीय भाषण करायला उभा राहिलो आहे. खरे तर मी माझ्या घरी. माझ्या कुटुंबात परत आलो आहे. अशीच माझी भावना आहे. मी भाषेच्या घरात राहतो, भाषेच्या प्रदेशात माझा रहिवास आहे. हे घर खूप मोठे आहे. हा प्रदेश खूप विस्तीर्ण आहे. मी या घराच्या विविध दालनांमधून वावरतो. गवाक्षांतून बाहेर पाहातो. याच्या तळघरांतून आणि भुयारांतून हिंडत असतो. याची कित्येक दालने अजून मी पाहिलेली देखील नाहीत. परंतू माझे संचित मोठे आहे. याच घरात वावरलेल्या कित्येक महानभावांचे ते अक्षरसंचित आहे. तो माझा ठेवा आहे, मी काही थोडी टिपणे तेवढी काढलेली आहेत.
थोडा विसावा घ्यावा म्हणून मधून मधून मी माझ्या महाकाय पूर्वजांच्या तळहाताएवढ्या कोपऱ्यात येतो. या जागेजवळ एक अवाढव्य खिडकी आहे. तीमधून मी बाहेर डोकावतो. मी आत आणि बाहेर पाहण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. फार थोडे मला जमले आहे. माझ्या आतही एक जग आहे आणि त्यात सतत कोलाहल सुरू असतो. या कोलाहलातही एक शांत स्वर शोधण्याचा माझा प्रयत्न असतो, मी आता या क्षणी मी माझ्या आतल्या आणि बाहेरच्या कोलाहलासह आपणासमोर उभा आहे.
तेहतीस वर्षांनंतरचे चंद्रपूर पुष्कळच वाढले, विस्तारले आहे. सगळीच निमशहरे, शहरे, महानगरे आपले रूप बदलत आहेत. इतिहासातच झोपून गेल्यासारखे वाटणारे हे शहरही आता पापण्या उघडून इकडेतिकडे पाहू लागले आहे. श्रीमहाकाली, अचलेश्वर यांच्यानंतर सुपर थर्मल पॉवर प्लांट हे आधुनिक काळातले नवे देवालय इथे आलेले आहे. या रोपट्यातून निघालेले विजेचे हात दूरपर्यंत पोचलेले आहेत. शहरांत झगमगाट आहे, परंतु खेड्यांमध्ये, रानांमध्ये प्रकाशाचे थेंब पाझरत आहेत की नाहीत याबद्दल मी साशंक आहे. मधून मधून मला मात्र डोळ्यांमधले अंगार फुललेले दिसतात.
उन्हाचा, पावसाचा स्पर्श झाला नाही तर झाडेही वेडीवाकडी वाढत जातात, तेथे माणसांचे काय. याच शहराच्या रस्त्यांवरून माझे बालपण चालत गेले आणि याच शहरात मला केव्हातरी कवितेच्या कीटकाचा दंश झाला. महाकाली, त्या देवीच्या पलिकडच्या अजस्त्र पाषाणमूर्ती माझ्या कवितांमध्ये प्रतिमा म्हणून येऊ लागल्या. तेव्हाच्या योगभ्रष्ट या प्रदीर्घ कवितेत मी लिहिले होते: चांदा हे शहर अमुकसाठी प्रसिद्ध असून तमूकसाठी अप्रसिद्ध असले तरी येथे दर चैत्र पौर्णिमेला महाकालीची मोठी यात्रा भरते.
त्यावेळी महाकालीचे जे मला जाणवले होते तेही लिहिले
महाकाली.
जळते डोळे.
जळते हास्य.
जळते. उघडे नागडे नृत्य.
हे नृत्य विध्वंसाचे नाही, सर्जनाचे आहे. विध्वंसापेक्षा सर्जनावर माझा जास्त विश्वास आहे. समाजाची जुनाट खिळखिळी झालेली संरचना नष्ट केली पाहिजे. परंतु त्या ठिकाणी नवी आणि अधिक उत्तम अशी संरचना उभारली पाहिजे हे मी त्यावेळच्या ‘माझ्या लोकांचा आकांत’ या कवितेत लिहिले होते. अर्थात माझ्या लोकांचा आकांत अद्याप मावळला नाही. अजूनही दूरवर पसरलेल्या अरण्यांमधून दुःखितांचे विव्हल स्वर वाऱ्यावरून माझ्यापर्यंत पोचतात.
जोवर मराठीच्या विविध बोली बोलल्या जात आहेत, प्रमाण मराठीत शिक्षित लोक आपले व्यवहार करीत आहेत, मराठी माध्यमांच्या शाळा बहुसंख्येने आहेत तोपर्यंत मराठी भाषा टिकून राहण्याचे उपाय करणे शक्य आहे. मराठीला पर्याय म्हणून इंग्रजीची (आणि माहिती तंत्रज्ञानाची, इलेक्ट्रॉनिक्सची) निवड करण्याचा विकल्प आपण ठेवतो तेव्हाच मराठीचे स्थान दुय्यम कसे आहे हे आपण दाखवत असतो. या विषयांचा स्वीकार करूनही मराठी हा विषय अनिवार्य असलाच पाहिजे असे धोरण आखले पाहिजे आणि त्याची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. गेली काही वर्षे मराठीची गरज कशी नाही याचा वृत्तपत्रांतून प्रचार करण्यात गेलेली आहेत, विशेषतः विज्ञान आणि वाणिज्य शाखांमधल्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर मराठी नको या मताचा प्रभाव टाकण्यात आलेला आहे. पुढे तर प्रश्नच नाही. भाषेचा किंवा साहित्याचा बाराही लागू नये अशीच व्यवस्था केलेली आहे. आपण पहिलीपासून दहावीपर्यंत मराठीचा आग्रह धरलेला आहे.
अकरावीपासून मराठी विषय सोडला तरी चालेल अशी व्यवस्था केलेली आहे. हे योग्य नाही. लोकांनी ते रोखायला हवे आहे. कुठलेही विषय घ्या, पण एक विषय मराठी हा असलाच पाहिजे असा लोकांनी आग्रह धरायला पाहिजे, आणि शासनानेही विचार करायला पाहिजे. जी मुले अकरावी-बारावीला मराठी विषय घेतात त्यातही काही बीएला जातात आणि मराठी साहित्य हा विषय घेतात. बीएससी, बीकॉमकडे जाणाऱ्यांना मराठी साहित्य हा विषय घेण्याची संधीच आपण नाकारलेली आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकविद्या, व्यवस्थापनविद्या यांच्याकडे बहुसंख्य विद्यार्थी जातात. त्याच्या अभ्यासात भाषा नाही आणि साहित्यही नाही. म्हणजे मराठी वाचवण्याची सगळी जबाबदारी बीएला जाणाऱ्या मूठभर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर आपण टाकलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे.
काही थोडे लोक मराठीचे अध्ययन करतात. बाकीच्यांना मराठीशी काही देणेघेणे नाही. ही वस्तुस्थिती भाषेच्या, साहित्याच्या संस्कृतीच्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाच्याही दृष्टीने चांगली नाही. भाषेपासून, साहित्यापासून मुलांना तोडून टाकता आणि मराठी भाषेचे काय होईल, मराठी साहित्याचे काय होईल अभी चिंता करता. ही विसंगती आहे. मी असे सुचवतो आहे की आपण अन्य विद्याशाखांमध्येही साहित्य हा विषय ठेवावा.
प्रमाण मराठीचा जीवनाच्या सर्व क्षेत्रात कुशल वापर आणि मराठीच्या बोलीचे संवर्धन या दोन्ही बाबतीत शासनाच्या भाषाविभागाने भरीव काम केले पाहिजे. महाराष्ट्रात अनेक बोली आहेत. वऱ्हाडी, नागपुरी, हळबी, अहिराणी, डांगी, मालवणी, कडाळी, झाडी, डांगणी, माणदेशी मराठवाडी, भिलोरी, पोवारी, गोंडी, इत्यादी. आजच्या मराठी साहित्यात या विविध बोलींमधले लेखन केले जात आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता या साहित्यप्रकारांतील लेखनात बोलींचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. दलित, भटक्या विमुक्त, आदिवासी जाती-जमातीमधून आलेल्या लेखकाच्या स्वकथनांतून त्या त्या प्रदेशाशी, व्यवसायाशी, समाजगटाशी निगडित बोली आलेली आहे.
उदाहरणार्थ लक्ष्मण माने यांच्या उपरामध्ये कैकाडी बोली, रुस्तुम अचलखांब यांच्या गावकीमध्ये जालना परिसरातील बोली, दादासाहेब मल्हारी मोरे यांच्या गबाळमध्ये मिरज-जत परिसरातील कुडमुडे जोशी जमातीची बोली, शरणकुमार लिंबाळे यांच्या अक्करमाशीत अक्कलकोट परिसरातील बोली, लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्यामध्ये लातूर परिसरातील संतामुच्चर जमातीची बोली, रावजी राठोड यांच्या तांडेलमध्ये नांदेड परिसरातील बंजारा बोली, भगवान इंगळे यांच्या ढोरमध्ये जामखेड परिसरातील बोली, योगीराज बागूल यांच्या पाचटमध्ये वैजापूर परिसरातील ऊसतोडीच्या कामगारांची बोली अशा कितीतरी बोली मराठी साहित्यात आलेल्या आहेत. बोलीबरोबर ती बोली बोलणाऱ्यांची संस्कृतीही अशा कथनांतून व्यक्त होते. या बोलीचा आणि प्रमाण मराठीचा सांधा जोडण्याचे काम विद्यापीठातील मराठीचे, समाजशास्त्राचे आणि सांस्कृतिक मानवशाखाचे प्राध्यापक करू शकतात; नव्हे, ते त्यांनी करावे असे मी सुचवतो.
भारतासारख्या कृषिप्रधान देशावर आर्थिक जागतिकीकरणाचा किती गंभीर विपरीत परिणाम होतो याविषयी वंदना शिवा यांनी लिहिले आहे: आर्थिक जागतिकीकरणामुळे बीज-बियाणे उद्योगाचे केंद्रिकरण, जागतिक व्यापारी प्रतिष्ठानांचा (ग्लोबल कार्पोरेशन्स) कृषिव्यवसायात प्रवेश, कीटकनाशकांचा वाढता वापर, वाढत चाललेली कर्जे, निराशा, त्यामुळे लहान शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या गोष्टी घडत आहेत. भांडवल गुंतवणारी कार्पोरेट-नियंत्रित कृषिव्यवस्था अस्तित्वात येते आहे. अशा स्थितीत गरीब शेतकरी टिकून राहणे अशक्य झाले आहे. जागतिकीकरणात निर्यातीला प्राधान्य आहे. त्यामुळे शेतकरी अन्नधान्य पिकवण्याऐवजी निर्यात करता येईल अशी पिके घेऊ लागले आहेत. उत्पादनखर्चात वाढ झाल्यामुळे कर्ज काढण्याची प्रवृत्ती वाढीस लागली. पाहिजे तसे उत्पन्न झाले नाही किंवा भाव मिळाले नाहीत तर शेतकरी बुडतो, तो वैफल्याने ग्रासला जातो.
जागतिकीकरणाच्या अवस्थेत इंग्रजीसारख्या एकाच भाषेत संज्ञापन आणि ज्ञानव्यवहार होत असेल तर इतर भाषा बोलणाऱ्यांचे आणि त्यांच्या भाषांचे भवितव्य काय हा प्रश्न उपस्थित होणे अपरिहार्य आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची, राजकारणाची, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या व्यवस्थापनाची, ज्ञानाची, अनुवादाची, संगणकाची, इंटरनेटची आणि मोबाईल फोनची, भाषा आहे. ती ग्लोबल लैंग्वेज आहे. थोडक्यात ती जागतिकीकरणाची भाषा आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत इंग्रजी भाषेला अत्यंत महत्त्व आलेले आहे. पूर्वी ब्रिटिश वसाहती असलेल्या देशांतच नव्हे तर जगाच्या सर्वच खंडांतील देशांमध्ये ती शिकली, बोलली, लिहिली जाते आहे. तथापि पूर्वी वसाहती असलेल्या देशांवर तिचा अधिक प्रभाव आहे. घानासारख्या आफ्रिकन प्रजासत्ताकात इंग्रजी भाषेला प्रथम क्रमांकाचे स्थान आहे. राज्यकारभाराची, व्यापाराची, शिक्षणाची तीच भाषा आहे. जागतिकीकरणाच्या अर्थकारणामुळे विकसनशील देशांच्या अर्थकारणावर जसे विपरीत परिणाम होत आहेत तसेच ते भाषांच्या बाबतीतही होतील का अशी चिंता अनेक देशांतील भाषातज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. इंग्रजीमुळे राष्ट्रीय भाषांचे, प्रादेशिक भाषांचे, बोलींचे अस्तित्व मिटून जाईल काय या प्रश्नाने जगभरातील विचारवंत अस्वस्थ झालेले आहेत. कारण तशी काही चिन्हे वास्तवात दिसत आहेत.
भारतामध्ये भाषांची विविधता आहे. आसामी, उड़िया, उर्दू, कब्रड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोगरी, तमिळ, तेलुगू, नेपाली, पंजाबी, बंगाली, बोडो, मणीपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, संथाली, संस्कृत, सिंधी, हिंदी या प्रमुख भाषा आहेत. हिंदी ही उत्तरप्रदेश, उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, हरयाणा, हिमाचल प्रदेश, आणि राजधानी दिल्ली व केंद्रशासित प्रदेश यांची अधिकृत भाषा आहे. इंग्रजी भाषेचा सहभाषा म्हणून स्वीकार केलेला आहे. राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी आणि हिंदी या भाषांना विशेष महत्त्व आहे. प्रादेशिक भाषांना राज्यभाषेचा दर्जा असला तरी सर्वच राज्यांमध्ये इंग्रजी ही भाषा सार्वजनिक व खासगी क्षेत्रांमध्ये उपयोगात आणली जाते. या मान्य प्रादेशिक भाषांखेरीज अन्य भाषाही आहेत महाराष्ट्रात मराठीच्या बोलींखेरीज भिली, गोंडी, कोरकू, वारली या भाषा आहेत. या मराठीच्या बोली नसून स्वतंत्र भाषा आहेत आणि त्या भाषांमध्ये त्या भाषक समुहांचे सांस्कृतिक संचित आहे.
आज आपण सगळेच पूर्वी न अनुभवलेल्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहोत. सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्पन्न झालेल्या संभ्रमाच्या मुद्रा पाहतो आहोत. गावे, शहरे बदलत आहेत. पुष्कळदा असे वाटते की आपण अवाढव्य अशा बाजारपेठेतून हिंडतो आहोत. आजच्या या स्थितीत संस्कृती, भाषा, साहित्य यांचे भवितव्य काय या प्रश्नाने आपण अस्वस्थ आहोत. याशिवायही अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत. स्पेस मिळाली की आपण प्रश्न मांडायला लागतो. काही वेळा आपल्याला अशी स्पेस तयार करावी लागते. झाडीपट्टी रंगभूमी ही अशा स्पेसचे उत्तम उदाहरण आहे. उर्वरित महाराष्ट्राला कितपत कल्पना आहे कोण जाणे. झाडीपट्टीची दंडार ही परंपरेने चालत आलेली लोककला आहे. दंडार म्हणजे हातात डहाळी घेऊन केलेला नाच असा एक अर्थ दिलेला आहे. म्हणजे हे सृजनाचे नृत्य आहे. जंगलात, निसर्गात राहणाऱ्या लोकांचा निर्मितीचा उत्सव, आता सर्वत्र पसरलेल्या जंगलात कार्पोरेट हत्ती शिरून उच्छाद मांडायला सिद्ध झालेले आहेत.
साम्राज्यवाद नष्ट झाला आहे. परंतु साम्राज्ये आपल्या डोळ्यांसमोर आकार घेत चालली आहेत. जागतिकीकरण हे या साम्राज्याचे नाव आहे. या साम्राज्यात आधुनिकता आणि समृद्धी यांची आमिषे दाखवली जातात, परंतु प्रत्यक्षात सामाजिक दुभंगलेपण आणि सांस्कृतिक मागासलेपण यांचे पोषण केले जाते. व्यक्तीचे बाहेरच्या जगाशी असलेले संबंध, बाजारपेठेचा प्रभाव आणि त्याच्याशी निगडित उपभोक्तावादी संस्कृती आणि धार्मिकता व धर्मजातीवाद यांचा उदय या तीन गोष्टींचा अनेक विचारवंतांनी परामर्ष घेतला आहे. व्यक्तीच्या दृष्टीने सामाजिक प्रश्न महत्त्वाचे राहिलेले नाहीत. सार्वजनिकतेच्या ठिकाणी वैयक्तिकता आलेली आहे. व्यक्ती स्वतःच्या प्रश्नांमध्ये जास्त गुंतून गेली आहे. बाजारपेठेचे स्वरूप बदलले आहे. पूर्वी अप्राप्य अशा वस्तु व्यक्तीच्या हाताशी आलेल्या आहेत असा आभास तयार केला जातो. परंतु व्यक्तीची वास्तविक स्थिती आणि तिच्या निवडीला केले जाणारे आवाहन यांत विसंगती तयार होते. वस्तूंमध्येच सर्वस्व आहे. खरा आनंद आहे असे वाटणे. वस्तूंनी झपाटले जाणे अशी एक मानसिक अवस्था तयार होते. आर्थिक क्षमता नसल्याने बहुसंख्यांना त्या मिळवता येत नाहीत.
सर्वसामान्य माणसांच्या सुखदु:खाची हायस्ट्रीट फिनिक्सच्या मोराला काही पर्वा नसते तो चमचम दिव्यांचा पिसारा फुलवून दिमाखात उभा असतो. जयंत पवार यांची ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ ही कथा जागतिकीकरणावरचे, मुक्त बाजारपेठेवरचे नवमध्यमवर्ग आणि कनिष्ठवर्ग यांच्यात पडलेल्या दरीवरचे एक प्रखर भाष्य आहे.
जागतिकीकरण ही भिन्न भिन्न आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विचारप्रवाहांना सामावून घेणारी संज्ञा आहे. जागतिकीकरण ही एक अवस्था आहे आणि सिद्धांतही आहे. वर्तमानकाळात जागतिकीकरण या शब्दात विविध अर्थच्छटा दडलेल्या आहेत. उदाहरणार्थ: मुक्त बाजारपेठ, आर्थिक उदारीकरण, राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक जीवनावर पाश्चात्य धारणांचा प्रभाव, पश्चिमीकरण किंवा अमेरिकीकरण, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, इंटरनेट क्रांती, जागतिक एकात्मता, इत्यादी. जागतिकीकरणाची ही अवस्था एक अपूर्ण अवस्था आहे. भांडवलशाहीचा हा पुढचा टप्पा आहे. वाफेवर चालणारी जहाजे, टेलिग्राफ, टेलिफोन, रेल्वे ही भांडवलशाहीची संचार साधने होती. प्रगत भांडवलशाहीला संगणक, उपग्रहांवर अधारित दृक-श्राव्य माध्यमे, भ्रमणध्वनी, द्रुत आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक ही संचार-संज्ञापन साधने मिळालेली आहेत. समाजवैज्ञानिकांच्या मते जागतिकीकरण या संज्ञेत सामाजिक अस्तित्वाशी निगडित स्थल आणि काल या संकल्पनांतील मूलभूत बदलांचा निर्देश आहे.
वसंत आबाजी डहाके,
ज्येष्ठ साहित्यिक,
अमरावती.