कोल्हापूरच्या लौकिकात भर पाडणारं १९९२ चं ६५ वे मराठी साहित्य संमेलन

३१ जानेवारी, १९९२ हा उद्घाटनाचा दिवस. सकाळी बरोबर सव्वासात वाजताच वेगवेगळ्या चार ठिकाणांहून चारीही ग्रंथदिंड्यांना प्रारंभ झाला. राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळापासून समता ज्योत आणि एक ग्रंथदिंडी निघाली, तर राजारामपुरीतील वि. स. खांडेकर यांच्या ‘नंदादीप’ या निवासस्थानापासून ज्ञानज्योत निघाली. समता ज्योत आणि ग्रंथदिंडीचं पूजन प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केलं, तर ज्ञानज्योत आणि ग्रंथदिंडीचं पूजन महापौर शामराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही दिंडी. पालखीत खांडेकरांची ग्रंथसंपदा ठेवलेली. ही पालखी अध्यक्ष रमेश मंत्री, डी. वाय. पाटील आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी वाहिली. लेझीम आणि बँडपथकाच्या सुरावटीवर दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित चित्ररथ आणि महाराणी ताराराणींच्या वेशातील अश्‍वारुढ नव्या युगाची रणरागिणी महिला, या लवाजम्यानं कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेतलं.

त्याचवेळी इकडे प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावरून महापालिकेच्या वतीनं छत्रपती राजाराम महाराजांच्या नावे एक ग्रंथदिंडी निघाली, तर वरुणतीर्थ वेस येथील गांधी मैदानावरून मुख्य दिंडीला प्रारंभ झाला. साऱ्या दिंड्या पूर्वनियोजित पद्धतीनुसार दसरा चौकात एकत्र आल्या. त्या ठिकाणी रमेश मंत्री, डी. वाय. पाटील आणि डॉ. प्रतापसिंह जाधव अशा तिघांनी या अतिभव्य दिंड्याचं स्वागत केलं. सजवलेला गजराज, घोडे आणि उंट असा लवाजमा, तसेच आकर्षक चित्ररथ, लेझीम पथकं, शिवाय धनगरी ढोल यांच्या दर्शनानं आणि निनादानं सारं शहर न्हाऊन निघालं होतं.

२५ हजारांहून जास्त विद्यार्थी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मातब्बर आणि मान्यवर ग्रंथदिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते, तर सुमारे साडेतीनशे वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करीत ब्रह्मानंदी एकरूप झाले होते. ‘ग्यानबा तुकाराम काय, सोपान-मुक्‍ताबाई काय, नि एकनाथ-नामदेव काय’; सगळे साहित्य पंढरीचे वारकरीच! त्यांचे अभिजात अभंग आजही मराठी माणसांच्या ओठी-ओठी घोळत असतात. ते तर खरे आद्य सारस्वत! मग त्यांच्या नावाचा जयजयकार झाल्याशिवाय साहित्याची दिंडी पुढे कशी बरं जाईल?

या दिंडीत ६५ बैलगाड्याही सामील झालेल्या होत्या. त्या जणू अण्णा भाऊ साठेंपासून शंकर पाटलांपर्यंतच्या ग्रामीण साहित्यिकांच्या गावरान साहित्याचं प्रतिनिधित्वच करीत होत्या, असं म्हटलं तर वावगं ठरणार नव्हतं. ही चार दिंड्यांची मिळून एक झालेली अतिभव्य ग्रंथदिंडी राजर्षी शाहू साहित्यनगरीजवळ आली, तेव्हा सव्वा अकरा वाजले होते. संमेलनासाठी आलेले रसिकमनाचे नगरविकासमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह हजारो उपस्थितांचे ग्रंथदिंडी पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. उद्घाटक प्रा. वसंत कानेटकर यांनी पालखीतील ग्रंथांना पुष्पांजली अर्पण केली. दिंडीचं स्वागत केलं. सखारामबापू खराडे, डी. बी. पाटील, जी. बी. आष्टेकर तसेच विविध शिक्षण संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक आणि अनेक शिक्षक यांनी या ग्रंथदिंडीसाठी परिश्रम घेतले.

३१ जानेवारी! करवीरनिवासिनी अंबाबाईच्या साक्षीनं ‘राजर्षी शाहू साहित्यनगरीत’ साहित्य शारदेचा दरबार सुरू झाला. सनई-चौघड्याचे मंगलस्वर दरबाराचे अल्काब पुकारत होते. प्रवेशद्वारावर तुतारीच्या निनादात पाहुण्यांचं आगमन झालं. टी. ए. बटालियनच्या वाद्यवृंदांनी आणि गुलाबपुष्पांच्या वर्षावानं पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं. पाहुणे व्यासपीठावर विराजमान झाले. प्रथम स्वागत गीताचे मंजूळ स्वर साहित्याच्या दरबारात घुमले आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्र गीत झंकारलं. आता दिग्गज ज्ञानवंतांचे विचार मनोमनी साठवण्यासाठी श्रोत्यांनी पंचप्राण कानांत आणून ठेवले.

हे संमेलन म्हणजे प्रकाशकांसाठी मोठी पर्वणीच ठरली. या साहित्यनगरीतील स्टॉल्सवर लाखो रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली. तसेच गूळ आणि कोल्हापुरी चप्पल खरेदीसाठीही लोकांची झुंबड उडाली, तर संमेलनाला आलेला महिला वर्ग हुपरीतील खास कलाकुसर केलेल्या दागिन्यांच्या खरेदीत मग्न झाल्याचं चित्र दिसत होतं. अशा या ‘नव नवल नयनोत्सवा’ची रसिकांनी अनुभूती घेतली.

संमेलनाचा दुसरा दिवस कविवर्यांसाठी आणि काव्यप्रेमींसाठी मेजवानीचाच ठरला. कवी कृ. ब. निकुंब यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन संपन्न झालं. सुरेश भट, सुधांशू, नारायण सुर्वे, रामदास फुटाणे यांसारख्या बिनीच्या कविवर्यांनी आपल्या कविता सादर करून रसिक श्रोत्यांची मनापासून दाद मिळवली. तसेच फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवोदितांचं कवी संमेलन झालं. त्यालाही श्रोत्यांनी तेवढीच दाद दिली. कवींची एक नवी पिढी जोमानं पुढं येऊ पाहतेय, हे या नवोदित कवी संमेलनातून दिसून आलं. जणू ही सागराला भरती येण्यापूर्वीची गाज होती.

६५व्या मराठी साहित्य संमेलनाची सांगता झाली. तीन दिवस चाललेल्या या शारदोत्सवाला लोकोत्सवाचंच स्वरूप आलं होतं. अस्सल कोल्हापुरी भोजन, उत्तम निवास व्यवस्था यासह कोणतीही उणीव न जाणवणारं संयोजन हा सर्वांसाठीच एक सुखद अनुभव होता. कोल्हापुरी खास तांबड्या, पांढऱ्या रश्श्यासह चमचमीत मटणाच्या जेवणावर खवय्यांनी चांगलाच ताव मारला! या अविस्मरणीय क्षणांच्या स्मृती जागवीत श्रोते आणि साहित्यिक मंडळी माघारी परतले. कोल्हापूरच्या लौकिकात भर पाडणारं असं हे संमेलन झालं.

00000

(संदर्भ – सिंहायन आत्मचरित्र : साहित्य संमेलनाची यशोगाथा – डॉ.प्रतापसिंह जाधव)

 

(छायाचित्र – ३१ जानेवारी, १९९२ रोजी ६५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीत सहभागी झालेले मान्यवर साहित्यिक. डावीकडून शंकर पाटील, डॉ. प्रतापसिंह जाधव, उद्घाटक वसंत कानेटकर, स्वागताध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील, संमेलनाध्यक्ष रमेश मंत्री, मधु मंगेश कर्णिक, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, संमेलनाचे कार्यवाह प्रा. भैरव कुंभार)

00000