तिरुपती, १७ :- मंदिरं ही श्रद्धेची स्थानं तर आहेतच. पण, ती पुरातन काळी जशी सामाजिक समतेची केंद्र होती, तशीच ती पुन्हा व्हावीत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
तिरुपती येथे आयोजित इंटरनॅशनल टेम्पल कन्व्हेन्शन आणि एक्स्पोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आचार्य गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आ. प्रसाद लाड, गिरीश कुळकर्णी, मेघना बोर्डीकर, विश्वजित राणे, प्रवीण दरेकर आदी यावेळी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे हे ३०० वे जयंती वर्ष असून, त्यावर्षात हे आयोजन होत आहे, हा अतिशय चांगला योग आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्या काळात परकीय आक्रमकांनी आपली संस्कृती ध्वस्त केली, त्यानंतर पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणेकडे मंदिर, घाटांचे पुननिर्माण अहिल्यादेवी होळकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर धर्माच्या पुनर्स्थापनेचे काम अहिल्यादेवींनी केले.
आज महाकुंभात ५० कोटी लोक स्नान करतात, पण, कुणी कुणाची जात, पंथ विचारत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनातन जीवनपद्धतीला मोठे बळ दिले. भारत एकजूट आहे कारण, आम्ही सनातन संस्कृतीच्या समान धाग्याने बांधलेलो आहोत. मंदिर हे आपल्या समाजजीवनाचे अभिन्न अंग आहे. मंदिर हे केवळ पूजास्थळ नाही, तर सामाजिक परिवर्तनाचे, शिक्षणाचेही स्थळ आहे. मंदिरे ही पुरातन काळी सामाजिक समतेची स्थळे होती, तशीच पुन्हा ती व्हावीत. तिरुपती देवस्थान हे सरकारी ट्रस्ट आहे, महाराष्ट्रात श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगावचे खासगीतून व्यवस्थापन होते. दोन्ही व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरणे आहेत. या अधिवेशनात मंदिर व्यवस्थापन, भाविकांच्या सुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, निर्माल्यप्रक्रिया, स्वच्छता अशा अनेक विषयांवर व्यापक मंथन होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ५७ देशांमधून मंदिर व्यवस्थापन या परिषदेत सहभागी आहेत. यापूर्वी सकाळी तिरुपती येथे भगवान बालाजी यांचे दर्शनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले.
०००