साहित्य संमेलनाच्या इतिहासात साताऱ्याचे महत्त्वाचे योगदान

दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलने आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा यासाठी सातारा जिल्ह्याने दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचे असून त्याचा आढावा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी यांनी घेतला आहे.

१८ व्या शतकात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने घेण्यास पुण्यात प्रारंभ झाला. मात्र दोन संमेलने झाल्यानंतर पुढील संमेलन दोन दशके झाले नाही. संमेलनाची परंपरा सुरु करण्यासाठी सातारकरांना पुढे यावे लागले. लोकमान्य टिळक यांचे सहकारी आणि साताऱ्यातील प्रसिध्द वकील दादासाहेब करंदीकर यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली तिसरे साहित्य संमेलन सुरु झाले आणि मग त्यामध्ये सलगता राहिली. दिल्ली येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मानही सातारा जिल्ह्याला मिळालेला आहे. निवडणुकीद्वारे संमेलनाच्या अध्यक्षाची निवड नको, अध्यक्षपद हे सन्मानाने दिले पाहिजे यासाठीचा ठरावही सातारा जिल्ह्यानेच पहिल्यांदा मांडला आणि तशी दुरुस्ती साहित्य महामंडळात करुन घेतली.

१८७८ साली पुण्याच्या हिराबागेत न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते. या संमेलनालाच पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मानले जाते. त्यानंतर तब्बल सात वर्षानी १८८५ मध्ये दुसरे ग्रंथकार संमेलन पुण्यातच भरले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर संमेलनांची परंपरा खंडीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. संमेलनाची परंपरा पुन्हा सुरु करण्यासाठी सातारकरांनी पुढाकार घेतला. तब्बल वीस वर्षांनी तिसरे संमेलन साताऱ्यात भरले. ॲड. दादासाहेब करंदीकर यांनी हे संमेलन भरवण्यासाठी पुढाकार घेतला. सातारा हा क्रांतीकारकांचा आणि इतिहास घडवणाऱ्यांचा जिल्हा आहे. त्यामुळे साताऱ्यात जी गोष्ट घडते, त्यात पुन्हा सातत्य राहते. साताऱ्यातील संमेलनानंतर अपवाद वगळता संमेलनांची परंपरा सुरुच राहिली आहे. पुढच्याच वर्षी 1906 मध्ये पुण्यात चौथे साहित्य संमेलन भरले. त्यामुळे पुण्याबाहेर झालेले पहिले संमेलन म्हणूनही साताऱ्याचे नाव इतिहासात कोरले गेलेले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पाठीमागे सातारा जिल्ह्याने नेहमीच आपली शक्ती उभी केलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही संस्थाच आयोजित करायची. मात्र नंतरच्या काळात ही संमेलने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या व्यासपीठावरुन आयोजित करण्यात येवू लागली. महाराष्ट्र साहित्य परिषदेला शक्ती देण्याचे काम या ना त्या कारणाने सातारा जिल्ह्याने नेहमीच केलेले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची इमारत पुण्यातील ज्या जागेवर उभी आहे, ती जागाही साहित्य क्षेत्रासाठी औंधच्या राजाने साहित्य परिषदेला दिलेली आहे. ही जागा ज्यावेळी साहित्य परिषदेला मिळाली, त्यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने साहित्य परिषदच आयोजित करत होती.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणूक लढवूनच मिळवावे लागत होते. निवडणुकीच्या प्रक्रियेत भाग घेण्याची इच्छा नसलेले अनेक मान्यवर संमेलन अध्यक्षपदापासून दूरच राहत होते. त्यामुळे ही प्रथा बदलली पाहिजे आणि निवडणुकीच्या माध्यमातून जे थोर साहित्यीक अध्यक्ष होवू इच्छित नाहीत त्यांना सन्मानाने अध्यक्षपद दिले पाहिजे, अशी भूमिका महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने घेतली आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या फलटण येथे झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने देण्याचा ठराव मांडला. हा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेने मंजूर करुन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे पाठवला. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर झाला. त्यामुळे डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. जयंत नारळीकर, न्या. नरेंद्र चपळगावकर अशा थोर साहित्यीकांना सन्मानाने अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन आहे आणि तेही ते संमेलन दिल्लीत होत आहे. मात्र मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सर्वाधिक मोठा पाठपुरावा सातारा जिल्ह्याने केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी तब्बल एक लाख पत्रे सातारा जिल्ह्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्यावतीने श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पाठवण्यात आली होती. अभिजात भाषेच्या दर्जासाठी पहिल्यांदाच दिल्लीत जावून आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनातही सातारकरांची संख्या सर्वाधिक होती आणि सातारकरांनीच या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. एकुणच साहित्य संमेलने, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा पाठपुरावा यामध्ये सातारा जिल्ह्याचा मोठा वाटा आहे.

दिल्लीत झालेल्या पहिल्या संमेलनाचे अध्यक्षपदही साताऱ्याकडेच

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने सुरु झाल्यानंतर दिल्लीत पहिल्यांदा १९५४ मध्ये म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वी संमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्षपदही सातारा जिल्ह्यातील नामवंत साहित्यीक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. यंदा दिल्लीत होणारे हे दुसरे संमेलन आहे. मात्र पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही सातारा जिल्ह्याने भूषविलेला आहे.

विनोद कुलकर्णी

कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ