ग्रामीण साहित्याच्या पाऊलखुणा

दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत आहे. मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन आहेअशा या विशेष संमेलनानिमित्त मराठी भाषेतील ग्रामीण साहित्य निर्मितीचा धांडोळा घेणारा हा लेख…

ग्रामीण साहित्याची निर्मिती ही ग्रामीण संवेदनशीलतेतून झाली. सातवाहन राजा हाल यांच्या ‘गाथासप्तशती’ या सारख्या ग्रंथात ग्रामीण जीवनाच्या काही छटा प्रकट होताना दिसतात. याशिवाय मध्ययुगीन महानुभाव, वारकरी वाङ्मय, म्हाइंभट्टाचा ‘लिळाचरित्र,’ ‘गोविंदप्रभुचरित्र’ केशिराजबासांचा ‘दृष्टांतपाठ’ या सारख्या महानुभाव वाङ्मयात ग्रामजीवनाचे दर्शन घडते तसेच संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई, संत सावतामाळी, संत गोरोबा कुंभार, संत चोखामेळा, संत तुकाराम, संत एकनाथ आदी व इतर संताच्या अभंग, गौळणी व भारूडादी काव्य प्रकारातून ग्रामीण संस्कृतीचे सुक्ष्म व प्रभावी प्रकटीकरण दिसून येते.

मराठी काव्याची ‘प्रभात’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहिरी कवनातही ग्रामीण रांगड्या श्रृंगाराचे, ग्राम संस्कृतीचे भावप्रकटीकरण दिसून येते. परंतु उपरोक्त साहित्यलेखनकर्त्याचा लेखन हेतू, प्रेरणा भिन्न स्वरूपाच्या दिसून येतात. लोकसाहित्य हे श्रमिक कष्टकऱ्यांच्या रंजनासाठी, महानुभाव साहित्य पंथनिष्ठेतून उदय पावले, वारकरी साहित्य समाजप्रबोधन व अध्यात्मनिरूपणाच्या प्रेरणेतून तर शाहिरी वाङ्मय हे लोकरंजनाच्या हेतूतून उगम पावले. या साहित्य कलावंताच्या कलाकृतीतून ग्रामजीवनाच्या विविध छटा प्रकट होत असल्या तरी ग्रामजीवनाचे विविध प्रश्न, समस्या केंद्रीभूत मानून साहित्य लेखन करावे असे त्यांना वाटलेले दिसत नाही. कदाचित त्या काळाचा विचार करता ग्रामीण समाज जीवनाच्या व्यथा, वेदना आणि समस्या यांच्या अनुषंगाने आवश्यक असणारी शिक्षणप्रणाली व समाजप्रबोधनाची चळवळ झालेली नव्हती. ग्रामीण साहित्याला महात्मा फुले, राजर्षी शाहू, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शरद जोशी यांच्या विचाराचे अधिष्ठान आहे.

ग्रामीण संवेदनशीलतेचा आणि जाणीवेचा प्रारंभ आपणास महात्मा जोतीराव फुले यांच्या साहित्यात सापडतो. महात्मा फुले यांनी ‘तृतीयरत्न’ नाटक (१८५५) ‘ब्राम्हणाचे कसब’ (१८६९), ‘गुलामगिरी’ (१८७३), ‘शेतक-याचा आसूड’ (१८८३), ‘मराठी ग्रंबकार सभेस पत्र’ (१८८५), ‘इशारा’ (१८८५), ‘अखंडादी काव्यरचना’ (१८८७) इ. ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेखन केलेले दिसते. शेतकरी, कष्टकरी व शुद्रादीशुद्रांच्या संबंधी काही मुलगामी विचार मांडून त्यांच्या दारिद्रयाचा, गरिबीचा अन्वयार्थ त्यांनी शोधला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थिती व दाहकतेचे वर्णन करताना महात्मा फुले यांची ग्रामीणतेसंबधी प्रगल्भ जाणीव प्रकट होते.

कृष्णराव भालेराव यांनी १८७७ मध्ये ‘दीनमित्र’ च्या अंकात ‘बळीबा पाटील’ ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीतून खेडुतांचे होणारे शोषण आणि दाहकता यांचे वास्तवदर्शी चित्र रेखाटले आहे. पाटील, कुलकर्णी, अस्पृश, मुसलमान यांच्या संबंधासह वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था व स्त्रियांचे स्थान यावर प्रकाश टाकते. हरिभाऊ आपटे यांनी १८९८ च्या दरम्यान लिहिलेली ‘काळ तर मोठा कठीण आला’ ही दीर्घकथा १८९७ च्या सुमारास महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळ स्थितीवर आधारलेली आहे. ‘धनुर्धारी (श्री. रा. वि. टिकेकर) यांनी १९०३ मध्ये ‘पिराजी पाटील’ ही पहिली ग्रामीण कादंबरी लिहिली.

१९२० च्या सुमारास भारतीय राजकारणाची सूत्रे महात्मा गांधी यांच्याकडे गेली. राजकारणी, समाजसुधारक, विचारवंत व साहित्यिक यांनी खेड्यात जाऊन तेथील समाजाचा जीवनानुभव समजावून घेतला पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. आपल्या अनुयायांना ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली. गांधीजींच्या हाकेने संमोहित होऊन माधव त्र्यंबक पटवर्धन, यशवंत दिनकर पेंढारकर, ग. त्र्य. मांडखोलकर, श्री. बा. रानडे इत्यादी मंडळीनी १९२३ मध्ये ‘रविकिरण मंडळा’ ची स्थापना केली याच काळात हळुहळू ग्रामीण जीवनातील साहित्यामध्ये आस्था आणि जिव्हाळा निर्माण झाला. त्याचे पर्यावसान ग्रामीण कविता लिहिण्यात झाले.

गिरीश, यशवंत, ग. ल. ठोकळ, ना. घ. देशपांडे, मा. भि. पाटील, के. नारखेडे यांच्या जानपद गीतांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. १९३३ साली ‘सुगी’ हा प्रतिनिधीक जानपदगीत संग्रह प्रकाशित झाला. १९३४ साली ग. ह. पाटलाचा ‘रानजाई’, ग. ल. ठोकळ यांचा ‘मीठभाकर’ (१९३८), के. नारखेडे ‘शिवार’ (१९३९), भा. रा. तांबे ‘गुराख्याचे गाणे,’ गिरीशांचे ‘आंबराई,’ चंद्रशेखराचे ‘काय हो चमत्कार’ हे खंडकाव्य दरम्यानच्या काळात प्रसिध्द झाले. तथाकथित ग्रामीण साहित्याचा निर्माता आणि भोक्ताही शहरी मध्यमवर्गीय समाज होता. म्हणून एक रूचीपालट म्हणून ग्रामीण जीवनाला साहित्यात स्थान दिले गेले. या संदर्भात आनंद यादव म्हणतात की, “हौसेखातर नागर मुलीने खेड्यातल्या मुलीचा पोशाख घटकाभर धारण करावा आणि मिरवावा” तसा हा केवळ बदलाचा एक नवा प्रकार म्हणूनच ही कविता आरंभी जन्माला आली.

या काळात सर्वच वाङ्मय प्रकारात विपूल साहित्य निर्मिती होतांना दिसते. ही आनंददायी बाब असली तरी या काळात ग्रामीण जीवनाचे वास्तवदर्शी चित्र प्रकट झाले का? या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. या कालखंडातील अपवाद म्हणून श्री. म. माटे यांचा विचार करावा लागेल. त्यांनी लिहिलेल्या ‘उपेक्षितांचे अंतरंग’ व ‘माणूसकीचा गहिवर’ या संग्रहातून आलेल्या कथा ही ग्रामीण, दलित, उपोक्षितांच्या व्यथा, वेदनांचा छेद अंतरिच्या उमल्यातून येतांना दिसतात. या अर्थाने माटे यांना ‘ग्रामीण कथेचे जनक’ म्हणतात.

१९४५ च्या नंतर एकूणच मराठी साहित्यात संक्रमण सुरू झाले. हा काळ मराठी ग्रामीण साहित्याच्या दृष्टीनेही परिवर्तनाचा काळ आहे. या काळात उदयास आलेली नवकाव्य, नवकथा हे मराठी साहित्याला वास्तवतेच्या पातळीवर आणू पाहत होते. परिणामतः ग्रामीण साहित्य रंजनपरतेची कात टाकून ग्रामीण वास्तवतेच्या अविष्करणाला महत्व देऊ लागते. “मर्ढेकरांनी नवकाव्याबरोबर साहित्याच्या मूल्यांची भूमिका कलावादी जाणीवेतून मांडली. आपल्या निष्ठा आणि शुध्द कलावादी भान गंगाधर गाडगीळ, गोखले, पु. भा. भावे नव्या जोमाने कथा लेखनाद्वारे मांडीत होते. या लेखनाचा आणि दृष्टीचा ताजा जोम आणि पीळ व्यंकटेश मांडगुळकरांच्या ‘माणदेशी माणसे’ नी शिल्पीत झाला. मांडगुळकर, द. मा. मिरासदार, रणजित देसाई, अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, श्री. ना. पेंडसे आदीचे लक्षणीय लेखन राहिले. विभावरी शिरूरकर यांच्या ‘बळी’ (१९५०) या कादंबरीने समाजापासून वंचित असणाऱ्या मांग-गारूडी या जमातीच्या जीवनातील अंधश्रध्दा, निरक्षरता जोपासणारी, माणसाचा दिशाहिन पट अतिशय प्रगल्भपणे या कांदबरीत मांडली. बहिणाबाई चौधरी यांचा ‘बहिणाबाईची गाणी’ (१९५२) हा अस्सल ग्रामीण संवेदनशीलतेचा ठेवा सापडला. लोकगीताच्या अंगाने कृषीसंस्कृतीचे अनेकविध धागे सहजपणे त्यांनी साकारले.

दरम्यानच्या काळात शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामुळे खेड्यातील नवशिक्षितांची पिढी उदयाला आली आणि आपले अनुभव शब्दात मांडू लागली. यालाच ‘साठोत्तरी साहित्य’ हो संज्ञा रूढ केली गेली, या पिढीने ग्रामीण जीवन प्रत्यक्ष अनुभवले होते. त्यामुळे त्याच्या लेखनातून अनुभूतीच्या खुणा प्रकट होतांना दिसतात त्यांना आत्मभान आले होते. या काळातील ग्रामीण साहित्य अस्सल ग्राम बास्तवाच्या निकट जाताना दिसते. यातूनच अण्णाभाऊ साठे यांची ‘फकिरा’, उध्दव शेळके ‘धग’, हमीद दलवाई ‘इंधन’, शंकर पाटील ‘टारफूला’, ना. धो. महानोर ‘गांधारी’, आनंद यादव ‘गोतावळा’, रा.रं. बोराडे ‘पाचोळा’ या कांदबऱ्या लक्षणीय स्वरूपाने आलेल्या दिसतात. ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात द. ता. भोसले, म. भा. भोसले, ग. दि. मांडगुळकर, शंकरराव खरात, नामदेव व्हटकर, मधु मंगेश कर्णिक, चंद्रकांत भालेराव, वा. भ. पाटील, चंद्रकुमार नलगे, महादेव मोरे, सखा कलाल, चारुता सागर यांच्या शिवाय अनेक साहित्यिक अधूनमधून ग्रामीण लेखन करतांना दिसतात, या काळात ग्रामीण साहित्याने संख्यात्मक व गुणात्मक उंची गाठलेली दिसते. पण ही पिढो ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडताना स्वतःच्या अनुभवाशी रेंगाळताना दिसतात.”समूहाचे जगणे, सामाजिक प्रश्न-समस्या त्यांच्या साहित्यातून येईनाश्या झाल्या. व्यक्तीजीवन, कुटुंबजीवन, नाते संबंध यांच्या मोहात अडकले.

१९७७ पासून सुरू झालेल्या ग्रामीण साहित्य चळवळीने ग्रामीण साहित्याला नवी दृष्टी आणि अस्मिता दिली, तसेच या काळात ग्रामीण साहित्याच्या स्थित्यंतराबाबत एक अतिशय आश्वासक घटना घडली ती म्हणजे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचा उदय ही होय. ‘भीक नको घेऊ घामाचे दाम’ हा शेतकरी संघटनेने कष्टकरी शेतकरी समूहाला दिलेला स्वाभिमानी मंत्र त्यांच्या ठायी ‘आत्मभान’ निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरला. शेतकऱ्याचे प्रश्न आणि त्यासाठी उभी राहणारी आंदोलने ग्राम आत्मभानासाठी पूरक असल्याची भूमिका चंदनशिव व्यक्त करतात. शेतकऱ्यांच्या शोषण परंपराची नोंद घेऊन शेषराव मोहिते, विठ्ठल वाघ, भास्कर चंदनशिव, श्रीराम गुंदेकर, नागनाथ कोतापल्ले, वासुदेव मुलाटे, फ. म. शहाजिंदे, बाबाराव मुसळे, महादेव मोरे, भिमराव वाघचौरे, मोहन पाटील, इंद्रजित भालेराव, संदानंद देशमुख, रा. रं. बोराडे, आनंद यादव, विश्वास पाटील, प्रभाकर हारकळ, राजन गवस, पुरुषोत्तम बोरकर, बा. ग. केसकर, आनंद पाटील, श्रीकांत देशमुख, नागनाथ पाटील, जगदीश कदम, भारत काळे, आसाराम लोमटे, सुरेंद्र पाटील, प्रकाश मोगले, अप्पासाहेब खोत, नारायण सुमंत, प्रकाश होळकर, गणेश आवटे, अशोक कोळी, कृष्णात खोत, भगवान ठग, उत्तम बावस्कर, केशव देशमुख, उत्तम कोळगावकर, भास्कर बडे, लक्ष्मण महाडिक, प्रमोद माने, बालाजी इंगळे, सुधाकर गायधनी, संतोष पवार, कैलास दौंड, नामदेव वाबळे, हंसराज जाधव इत्यादी (अजूनही काही नावे सांगता येतील) साहित्यिक ग्रामजीवन प्रगल्भ जाणीवेसह मांडताना दिसतात. या कालखंडात लिहिणा-या साहित्यिकांना ‘समाजभान’ आल्याचे जाणवते. त्यांनी ग्रामजीवनाचे मानसिक आंदोलनाचे, जगण्याचे प्रश्न नीट नेटकेपणाने आकलन करून घेतले.

ग्रामीण साहित्य प्रवाहाच्या कार्याची गती आणि व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. जो साहित्यिक कलावंत जनतेच्या व्यथावेदना, मानसिक आंदोलन, आकांक्षा, सुख दुःखांना लेखणीत मुखरीत करतो. ते साहित्य खऱ्याअर्थाने विश्वव्यापी रूप धारण करते. मुळात ग्रामीण साहित्याजवळ प्रतिभावंतांची वाणवा नाही. उलटपक्षी वैश्विकतेकडे जाण्याचे सर्वाधिक सामर्थ्य ग्रामीण साहित्यातच आहे, हे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. तिची बांधिलकी कष्टकरी, श्रमिक व सर्जक मानवतेशी आहे. जोपर्यत ग्रामीण कष्टकऱ्यांची संस्कृती अस्तित्वात आहे तोपर्यत ग्रामीण साहित्याला भवितव्य आहे, यामध्ये कसलाही संदेह नाही.

संदर्भ ग्रंथ

०१. अत्रे त्रि.ना, ‘गावगाडा’, वरद बुक्स, पुणे, तिसरी आवृती, १९८९.

०२. गुंदेकर श्रीराम, ‘ग्रामीण साहित्य प्रेरणा आणि प्रयोजन’ दिलीपराज प्रकाशन, पुणे, ऑगस्ट, १९९९.

०३. चंदनशिव भास्कर, ‘भूमी आणि भूमिका’, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९२.

०४. फडके य. दि., ‘महात्मा फुले समग्र वाड़मय’, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९९१.

 डॉ. ज्ञानदेव राऊत

शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी

dnraut800@gmail.com