ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन जगात मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचे स्मरण करत असताना मराठीतील कितीतरी चांगले शब्द काळाच्या ओघात लोप पावले आहेत असे शब्द हुडकून बोली भाषेत त्याचा सर्वांनी वापर केला पाहिजे, केवळ मराठी दिनाच्या निमित्ताने मराठीबद्दल बोलून तिला घासून लख्ख करण्यापेक्षा दरवेळी मराठीच्या अस्तित्वासाठी आपण सर्वांनी झटले पाहिजे. भ्रमणध्वनीवर सध्या मराठी भाषेचे विविध ‘अॅप्स’ही आले आहेत अशा तंत्रज्ञानाचा स्पर्श मराठीला झाला असला तरी तिचा वापर राजभाषा, ज्ञानभाषा आणि व्यवहाराची भाषा म्हणून वाढला पाहिजे, अन्यथा इतर भाषांच्या आक्रमणात अमृताची भाषा मागे पडेल.अशी भीती मला वाटते .
मराठी भाषेची खरी घसरण सुरू झाली ती १९९१च्या आसपास. मराठी मंडळींनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालायला सुरुवात केली. इंग्रजी भाषेला विरोध करण्याचे कारण नाही. ती जगाची भाषा आहे आणि ती न येऊन चालणारे नाही, हे खरे असले तरी काळाच्या ओघात इंग्रजी भाषाच श्रेष्ठ असे जे अवडंबर माजवले गेले, तिथे मराठीचा ऱ्हास सुरू झाला.
आपला देश बहुसांस्कृतिक असून प्रत्येक मैलागणिक भाषा बदलते आणि म्हणूनच बहुभाषेच्या आधाराने भाषा टिकते आणि विकसित होते. मराठी ही ओळख टिकवणे आपले कर्तव्यच आहे. मराठी ही केवळ साहित्य भाषा म्हणून त्याकडे पाहून चालणार नाही. ती संस्कारभाषा, ज्ञानभाषा आणि व्यवहारभाषा होणे गरजेची आहे. नवे ज्ञानविज्ञान मराठी माध्यमातून सुलभपणे येण्यासाठी भाषा तज्ज्ञां कडून विश्वसनीय आणि प्रमाणभूत साधने उपलब्ध झाली पाहिजे.
अद्ययावत ज्ञाननिर्मितीच्या कामात सहज सुलभपणे उपलब्ध होणारी ज्ञानभाषा म्हणून मराठीची वाढ झाली पाहिजे. ज्ञानविज्ञान, तत्त्वज्ञान आणि कला यांच्यातील संशोधन मराठीतून उपलब्ध होणे गरजेचे आहे. विखुरलेल्या मराठी समाजाला मराठीच्या माध्यमातून जोडून घेत या सर्व समाजाचे भाषाज्ञान वाढवणे आवश्यक आहे. मराठी भाषेला सक्षम करण्यासाठी आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी आपण सर्व मराठी जणांनी आणि महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला व केंद्र शासनाने अभिजात दर्जा देऊन त्यावर मोहोर अमटवली आता आपण सर्वजण मराठी भाषा वृध्दींगत करण्यासाठी कसोसीने प्रयत्न करूया.
संस्कृत नंतर सर्व भाषांत मराठी भाषा अधिक सात्त्विक आहे. प्रायोगिक स्तरावर प्रत्येकाने तिचे वैभव टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, ‘माय मराठी’ला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठी भाषिकांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण दृढ निश्चय करूया आणि संघटितपणे ‘मराठी’चे रक्षण तसेच संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करूया ! आणि प्रत्येक मराठी माणसांनी आजच्या मराठी दिनी ठरवलं पाहिजे की माझी मराठी ही माझी जबाबदारी नाही का ? महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. मराठी ही राजमान्य, लोकमान्य राज्यभाषा झाल्याला आता अनेक वर्ष होऊन गेले, तरी महाराष्ट्रातही मराठीला योग्य स्थान नाही. हे मनातील शल्य व्यक्त करताना कवी कुसुमाग्रज असे म्हणतात, ” महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा, डोक्यावर राज्य मान्यतेचा सोनेरी मुकुट घालून उभी आहे. परंतु तिच्या अंगावरचे वस्त्र फाटके आहेत.” मराठीचे स्वतःचे राज्य असावे, मराठीला राजभाषेचा मान मिळावा म्हणून वर्षानुवर्षे हजारो मराठी सुपुत्रांनी धडपड केली, संघर्ष केले. प्रसंगी बलिदान ही केले.
प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके, साने गुरुजी यांच्या सारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी माणसाच्या मनामनात जागृत ठेवली.आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या आक्रमणाने मूळ मराठी भाषाच बदलत चालली आहे.
दैनंदिन बोली भाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.
मायमराठीचा जयजयकार असो’ म्हणा, ‘गर्व से कहो हम मराठी है’ म्हणा किंवा ‘वुई वॉन्ट मराठी’ म्हणा… आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं महत्त्वाचं आहे. भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं प्रथम मनात उमटतात, नंतर ती उच्चारांतून आणि कृतीतून प्रकटतात. केवळ दिखाऊ पणासाठी मराठीचं प्रेम नको, आंतरिक जाणीवांतून ते प्रकट होत राहिलं, तर भाषा आणि संस्कृती कधीच मरत नाही.असे मला वाटते.
आपली स्वाक्षरी मराठीतून करा ! ‘गुड मॉर्निंग’च्या ठिकाणी ‘शुभ प्रभात’ म्हणा ! मुलांना ‘मम्मी-डॅडी’ नको, तर ‘आई-बाबा’ म्हणायला शिकवा ! दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ म्हणण्यापेक्षा ‘नमस्कार’ म्हणून बोलण्यास प्रारंभ करा ! सणाच्या शुभेच्छा मराठीतून द्या, उदा. ‘हॅपी दिवाली’च्या ठिकाणी ‘शुभ दीपावली’ म्हणा ! मुलांना ‘हॅरी पॉटर’ वाचायला न देता ‘पंचतंत्रा’तील कथा आणि साने गुरुजी यांची पुस्तके वाचायला द्या ! दारावर पाटी मराठीतून लावा ! ‘नावात इंग्रजी अक्षरांनी आद्याक्षरे न लिहिता, मराठी (मातृभाषेतील) आद्याक्षरे वापरा. हे काम आपण शाळांमधून करू शकत नाही का ? म्हणजेच माझी मराठी ही माझी जबाबदरी नाही का ? मराठी ही निव्वळ भाषाच नाही तर ती एक संस्कृती आहे.
मराठी भाषेचा इतिहास खूप आधीपासून म्हणजेच अगदी राष्ट्रकुट राजापासून अस्तित्वात आहे. मराठी भाषा लवचिक आहे. थोड्या थोड्या फरकाने शब्दांचे अर्थ बदलतात. मुंबईची मराठी भाषा। हल्ली खिचडी भाषा झाली आहे. शुद्ध मराठी राहिली नाही. तिच्यात हिंदी, मराठी, इंग्रजी यांची भेसळ झाली आहे. हिंदी आणि इंग्रजी सिनेमा पाहून भाषा अशी झाली आहे. पूर्वी मराठीला मान नव्हता, पण आता काही प्रमाणात आहे. आणि आता केंद्र शासनाने आपल्या मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे भाषा संवर्धनाचे मोठे काम यापुढे होणार यात शंका नाही. परंतु आपण सर्व मराठी भाषकांनी एकत्रीत येऊन मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करूया!
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ !
‘जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी’।।
पद्माकर मा कुलकर्णी
अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूर.