मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याहस्ते राज्यातील शिवकालीन, प्राचीन तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ
किटा कापरा येथे गाळ काढण्याचा राज्यस्तरीय शुभारंभ
शिव जयंती निमित्त हजार तलावातून गाळ काढणार
यवतमाळ, दि.१९ (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात 33 तलाव बांधले. आजही त्या तलावांमध्ये मुबलक पाणी आहे. शेतकरी, सामान्य नागरिक सुखी संपन्न झाला पाहिजे, हा महाराजांचा तलाव बांधण्यामागचा उद्देश होता. अत्यंत दुरदृष्टीने महाराजांनी पाणी साठविण्याचे काम केले, असे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
शिवजयंतीचे औचित्य साधून राज्यातील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचिन तलाव, गावतळे व पाणी पुरविण्यासाठी वापरण्यात येणारे सद्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणी पुरवठ्यात वाढ करण्याची मोहिम मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने राज्यभर राबविण्यात येत आहे. आज शिवजयंतीच्या दिवशी या मोहिमेचा यवतमाळ जिल्ह्यातील किटा कापरा येथून राज्यस्तरीय शुभारंभ झाला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, किटा कापराच्या सरपंच अनिता ढोले, उपसरपंच मेघा तराळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी भुमेश दमाहे, पराग पिंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.पांडे, तहसिलदार योगेश देशमुख आदी उपस्थित होते.
शिव जयंती निमित्त सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेची आज राज्यात एकाचवेळी सुरुवात झाली. राज्यात एक हजार तलावातून गाळ काढण्याचा उद्देश आम्ही ठेवला आहे. शिवाजी महाराजांनी शेतकरी, शेतमजूर आनंदी कसा राहीलं यासाठी धोरण राबविले. त्यांनी त्याकाळात बांधलेले तलाव सुस्थितीत तर आहेच; त्या तलावात आजही भरपूर पाणी असल्याचे आपण पाहतो. महाराजांनी सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन तलावांची निर्मिती केली. महाराजांचे पाणी साठवणुकीचे काम या मोहिमेच्या माध्यमातून पुढे नेत असल्याचे श्री.राठोड म्हणाले.
मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविली जात आहे. ठराविक कालावधीसाठी राबविण्यात येणारी ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय मी या विभागाचा मंत्री झाल्यानंतर घेतला. यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद देखील केली. ग्रामपंचायतींना या मोहिमेत सहभागी करुन घेतले. पुर्वी तलावांमधील गाळ काढण्याची तरतूद होती. आता नाले, बंधारे यातील गाळ काढण्याची बाब देखील समाविष्ठ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक उपयुक्त गाळ उपलब्ध होतील, असे मंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.
शिव जयंती निमित्त राबविण्यात येत असलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ मंत्री श्री.राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन केला. किटा कापरा येथील तलावातून गाळ काढून त्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेतजमिनीत पसरविण्यासाठी देण्यात आला. शेतकऱ्यांना गाळ नेण्यासाठी शासन अर्थसहाय्य देत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री श्री.राठोड यांनी यावेळी केले.
0000