समाजनिर्मितीची रूपरेषा…

आपल्या उक्ती आणि कृतीतून समाजाला प्रबोधनाच्या मार्गावर नेणाऱ्या संत गाडगेबाबा यांची २३ फेब्रुवारी रोजी जयंती आहे. समाजाला दशसूत्री देऊन त्यातून एक सशक्त समाजनिर्मितसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. राज्‍य शासनाने गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीचा अंगीकार केला असून त्यामाध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत विकास नेला जात आहे.

विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत एक परिणामकारक कृतिशील व्यक्तिमत्व म्हणजे संत गाडगेबाबा होत. संत गाडगेबाबांची खरी ओळख ही चिंध्या पांघरणारा, हाती खराटा घेऊन स्वच्छतेचे व्रत सांभाळणारा नि आपल्या कीर्तनातून सर्वसामान्यांना अंधश्रध्दा, कर्मकांड यांपासून मुक्त करू पाहणारा एक लोकोत्तर पुरूष ! सामाजिक परिवर्तनासाठी ‘स्वच्छता’ आणि ‘कीर्तन’ या दोन प्रबोधन उपक्रमांचा उपयोग त्यांनी केला. गाडगेबाबांचे तसे औपचारीक शिक्षण झाले नव्हते. घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती त्यास कारणीभूत होती, असे असले तरी गाडगेबाबांनी विविध पध्दतीने व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांसाठी आपल्या जीवनकार्यातून एक तत्वज्ञान देऊ केले.

युगनिर्माता संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. झिंगराजी जानोरकर हे त्यांच्या वडिलांचे नांव! तर सखुबाई ही त्यांची आई. गाडगेबाबांचे लहानपणचे नांव डेबू! त्यांच्या व्यसनाधीन-अंधश्रध्दाळू वडिलांचा १८८४ मध्ये मृत्यू झाला. त्यावेळी गाडगेबाबांचे वय अवघे सात वर्षांचे होते. वडिलांच्या मृत्यूनंतर गाडगेबाबांचे मामा चंद्रभान यांचे घरी त्यांच्या पुढील जीवन प्रवास सुरू झाला. गाडगेबाबांचा कामसूपणा आणि प्रामाणिकपणा त्यांच्या गुरे राखणीपासून तर शेती करण्यापर्यंत ठायी ठायी दिसून येई. १८९२ मध्ये त्यांचे कुंदाबाईसोबत लग्न  झाले. काही दिवसांनी मामाची शेती सावकाराने गिळंकृत करण्याचा प्रसंग त्यांच्यावर ओढवला. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी व झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी डेबुजीने अपार कष्ट घेतले. बाबांना आलोका व कलावती या दोन मुली तर मुद्गल आणि गोविंद अशी दोन मुले होती. १९०५ मध्ये त्यांनी कोणत्याही पाशात न अडकता गृहत्याग केला. त्यानंतर आयुष्याची ५० वर्षे व्रतस्थपणे त्यांनी जनसेवेत घालवली.

बुडती हे जन न देखवे डोळा !

 म्हणोनी कळवला येत असे !

या भावनेतून त्यांनी समाजाला दिशा दिली. गाडगेबाबांची दशसूत्री प्रसिध्द आहे. त्यामध्ये समाजकल्याणाची एक रूपरेषा आपल्याला प्रतीत होते.

१) भूकेल्यांना : अन्न, २) तहानलेल्यांना : पाणी, ३) उघडयानागडयांना : वस्त्र, ४) गरीब मुलामुलींना: शिक्षण, ५) बेघरांना : आसरा, ६)अंध, पंगू रोग्यांना : औषधोपचार, ७) बेकारांना : रोजगार, ८) पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय, ९) गरीब तरूण-तरुणींचे : लग्न १०) दु:खी व निराश्यांना : हिंमत

अशी ही गाडगेबाबांची दशसुत्री म्हणजे कल्याणकारी राज्याच्या गुणवैशिष्ट्यांचाच भाग जाणवते.

समाजातील सुस्थितीत लोकांकडून इतर दुर्बल लोकांसाठी कार्य करण्याची ते जशी अपेक्षा व्यक्त करतात तशीच अपेक्षा ते शासनाकडूनही करतात. या दशसूत्रीतील गर्भित अर्थ खऱ्या अर्थाने मानवी विकासाचा निर्देशांक कसा वाढवता येईल याचे दिग्दर्शन करतो.

भुकेल्यांना : अन्न

या मूलभूत सुत्राकडे त्यांनी समाजाचे लक्ष वेधले. देशातील कुणीही माणूस हा भुकेने मरू नये, याकरिता बाबांनी मांडलेला विचार अनेकांनी स्वीकारला. शासनाने देखील ‘शिवभोजन योजना’च्या माध्यमातून हे सुत्र अंगिकारले आहे. आज राष्ट्रीय स्तरावरती सुमारे ८० कोटी नागरीक हे मोफत शिधा प्राप्त करत असून त्यातून त्यांना मोठा आधार मिळत आहे. सरकारने या कायद्याच्या माध्यमातून उचललेले पाऊल व केलेले प्रयत्न म्हणजे आज कोणीही गरीब उपाशी राहणार नाही, असेच म्हणावे लागेल.

तहानलेल्यांना : पाणी

गाडगेबाबा ज्यावेळी समाजप्रबोधनाचे काम करत होते. त्याकाळी पाण्याचे दुर्भिक्ष होते. विशेषत: स्त्रियांची होणारी भटकंती व गुंड-घागरी घेऊन त्यांची होणारी पायपीट, हे सार्वत्रिक चित्र होते. ‘जल हेच जीवन’ याचे महत्व सांगत असतांना प्रत्येक माणसाला पाणी मिळायला हवे व तेही शुध्द असावे. या गाडगेबाबांच्या संकल्पनेलाच केंद्र व राज्य शासनाने आपल्या धोरणांमध्ये अंगीकृत करून ‘गाव तेथे पाणी पुरवठा योजना’ राबविली जात आहे.

उघड्यानागड्यांना : वस्त्र

आज ‘माणुसकीची भिंत’ यासारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक उपयोगी कपड्यांचे दान दिले जाते आहे. गरजूंनी तेथून कपडे घेऊन आपली निकड भागवावी, अशी अपेक्षा त्यामागे आहे. शिवाय अनेक सेवाभावी संस्थामार्फत मोफत कपडे, ब्लॅंकेट्सचे वाटप केले जाते. यासारख्या उपक्रमांना बळ देण्यासाठी लोकमानसात सेवाभावी वृत्ती व दानत्व वाढवणे गरजेचे आहे. ज्यातून गरीब व उपेक्षित जनतेची वस्त्रांची गरज भागवली जाऊ शकते.

गरीब मुला-मुलींना : शिक्षण

गाडगेबाबा शिक्षणाचे महत्व जनसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी सतत कीर्तनातून संदेश देत.अज्ञानामुळे होणाऱ्या नुकसान व शोषणाचे अनेकअंगी पदर ते उलगडून दाखवीत.

आज शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणात राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तीमुळे व वसतिगृहाच्या प्रशस्त व्यवस्थांमुळे समाजातील तळागाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सोईचे झाले आहे. तसेच परदेशात शिक्षण घेण्यासाठी शासनाद्वारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य व प्रोत्साहन दिले जाते आहे.

आजच्या संदर्भात बाबांनी अपेक्षिलेला शिक्षित समाज हा केवळ शालेय शिक्षणापुरता मर्यादित नसून, समाजातल्या उन्नत व विकसित घटकांच्या बरोबरीने उपेक्षित व मागास समाजाला शिक्षित करणे, असाच आपल्याला घ्यावा लागेल. त्यादृष्टीने शासनासोबतच समाजानेही कार्य करणे आज गरजेचे आहे.

बेघरांना : आसरा

बाबांना अभिप्रेत असलेली जी संकल्पना होती. त्यामध्ये कुडाच्या, तुटक्या-फुटक्या घरांमध्ये राहणारी श्रमिक माणसे, उघड्यावर संसार करणारी कुटुंबे यांना किमान हक्काचे छप्पर मिळावे ही होती.

रानावनात भटकंती करणारी स्थलांतरीत माणसे यांना स्थायित्व मिळावे आणि देशाचे नागरिक म्हणून किमान जगण्याची पूर्तता व्हावी, याकरीता गाडगेबाबा आपल्या किर्तनातून सातत्याने मांडणी करत.

देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर या उघड्या पडलेल्या माणसांना हक्काचे निवारे देण्यासाठी केंद्र शासनाने अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या. ज्यामध्ये ‘लोक आवास योजना’, ‘वाल्मिकी आंबेडकर आवास योजना’, ‘प्रधानमंत्री घरकुल योजना’, ‘महाराष्ट्र हाऊसिंग ॲण्ड एरिया डेव्हलपमेंट अथॉरटी’ (म्हाडा) यांचा समावेश आहे. आजही केंद्र व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये होणारी कोट्यवधी रूपयांची तरतूद ही बाबांच्या दूरदृष्टी व समाजभानाला अधोरेखित करणारी आहे.

गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व लहानपणीच हेरले होते नि अंगी बाणले होते. सार्वजनिक अस्वच्छतेतून साथीचे रोग, प्रदूषण आणि गलिच्छपणा या समस्यांना सामोरे जावे लागते, हे त्यांनी आपल्या भ्रमंतीतून टिपले होते. त्यामुळे स्वच्छतेचे महत्व लोकांच्या मनावर बाब बिंबवत असत. त्यासह लोकाच्या मनातील आरोग्यविषयक अंधश्रध्दाही बाबा निपटून काढत.

रोग्यांना : औषध

या सूत्राच्या परिपूर्तीसाठी बाबांनी मुंबई-पुण्यासारख्या शहरात दवाखान्याजवळ धर्मशाळा बांधल्या. गरीब स्त्रियांसाठी प्रसूतिगृहे, दवाखाने बांधले. ते आरोग्यविषयक जाणिवेतूनच !

कॉलरा कुणाच्या अवकृपेने होतो. यावर बाबांचा मुळीच विश्वास नव्हता. तो केवळ अस्वच्छतेने होतो. हे त्यांना पक्के ठाऊक होते. त्यामुळेच यात्रेच्या ठिकाणी ते सावध असत व लोकांनाही सावध करत.

बाबांच्या विचाराaचा मोठा प्रभाव हा धोरणकर्त्यावरही पडलेला आपल्याला आज दिसून येतो आहे. गाडगेबाबांच्या संवाभावीवृत्तीतून पेरलेल्या संस्कारामुळे व शासनाच्या प्रोत्साहानामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याला खेड्यातीलच नव्हे तर शहरी लोकांकडूनही उत्स्‍फूर्त प्रतिसाद लाभतो आहे. ६०-७० वर्षापूर्वी पेरलेल्या या संस्कारांना आज अभियानाच्या रूपाने देखणेपण मिळाले आहे. ‘स्व्च्छता’ या शाश्वत संस्काराचा वसा जपणाऱ्या कर्मयोगी गाडगेबाबांचे नाव या अभियानास शासनाने देऊन एका परिने त्यांचा गौरवच केला आहे.

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तिंच्या अपंगत्वाकडे न बघता त्यांच्यातील सामर्थ्य ओळखून, त्यांचा सुप्त गुणांना विकसित करून, त्यांना जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी द्यावी व त्यांच्या हक्काचे संरक्षण व्हावे, या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. शिवाय सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण, सवलती सूट व प्राधान्य देण्यात आले आहे. या सर्वांचा उद्देश अपंग व्यक्तिंना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे हाच आहे. त्यापुढे जाऊन शासनाने तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वार्षिक अर्थसंकल्पातील ५ टक्के रक्कम ही दिव्यांगांच्या साहाय्यसाठी राखीव ठेवण्याची सक्ती केली आहे. यातून फार मोठा आर्थिक आधार त्यांना मिळतो आहे. गाडगेबाबांच्या विचाराचे हे एक मोठे यश आहे, असे म्हणता येईल.

पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना : अभय

पशु-पक्षी, मुके प्राणी हे सुध्दा सृष्टीचे अविभाज्य घटक असून माणसांप्रमाणेच त्यांना सुध्दा जगण्याचा समान अधिकार आहे. ही गोष्ट ७०-७५ वर्षांपूर्वी बाबा मांडत होते. त्याकरीता अंधश्रध्देवर आधारलेल्या पशुबळी, नवस-सायास यांचा बाबांनी कडाडून विरोध केला. लक्षावधी लोकांना त्यापासून परावृत्त केले. आतातर केंद्र शासनाने व राज्य शासनाने पशुहत्या बंदीसारखे अनेक कायदे केले असून मुक्या जनावरांना वेदना देणाऱ्या कृती बंद केल्या आहेत.

अशिक्षित असणाऱ्या गाडगेबाबांना आज प्रगत राष्ट्र मांडत असलेल्या जैवविविधतेच्या साखळीची महती उपजतच ठाऊक होती. ही बाब त्यांच्या असामान्यत्वाची प्रचिती देणारी आहे.

गरीब तरूण-तरूणींचे : लग्न

समाजातील हजारो गरीब तरूण-तरूणींचे लग्न होऊन, त्यांनी सुखाचा संसार करावा असे गाडगेबाबांना वाटत असे. एकीकडे समाजात श्रीमंत व आर्थिकदृष्ट्या सबल लोकांच्या कुटुंबातील लग्ने उत्साहाने व थाटामाटात पार पडत. त्यांचे अनुकरणातून गरीब लोक अनेकदा कर्ज काढून लग्न-समारंभ साजरे करत. कित्येक गरीब तरूण-तरूणींच्या पाल्यांजवळ पैसाच नसे. त्यामुळे ते विवाहार्दीपासून वंचित राहत. कर्जबाजारी होऊन लग्न करू नका, ही बाब आपल्या कीर्तनातून बाबा सतत मांडत असत.

आज शासनाने गरीब व गरजू कुटुंबातील तरूण मुला-मुलींची लग्न करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. ज्यामधून लक्षावधी विवाहसोहळे सामूहिकपणे संपन्न होत आहेत. या कार्यक्रमांमधून संपन्न होणाऱ्या सोहळयांमध्ये जाति-पातीची कुठलीही बंधने नसून, एकाच मांडवाखाली विविध जातीच्या जोडप्यांचे विवाहसोहळे हे समाजिक ऐक्याचे प्रतीक ठरत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ‘जाति-पाती विरहीत समाज’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप मिळाले असून, ते बाबांना अपेक्षित असलेल्या समाज निर्मीतीच्या दिशेने पुढे नेणारे आहे.

बेकारांना : रोजगार

प्रत्येकाने शिक्षण घ्यावे, शारीरिक श्रम करावे, रोजगार मिळवावा, असे बाबांना वाटे. कुठलेही श्रम कमी प्रतीचे नसतात, प्रामाणिकपणे शिस्तबध्द पध्दतीने नियोजित कामे करून त्या कामांना प्रतिष्ठा मिळवून देता येते, असे त्यांचे परखड मत होते. बाबांच्या विचारांना पुढे नेणारे आणखी एक महत्वाचे पाऊल शासनाने उचललेले आपल्याला दिसते.

गरीब व बेरोजगारांना रोजगार मिळावा या हेतूने शासनाने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम १९७७ नुसार दोन योजना सुरू केल्या. १) ग्रामिण भागात अकुशल व्यक्तींकरीता रोजगार हमी योजना, २) वैयक्तिक लाभाच्या योजना.

शासनाच्या या योजनांमधून बेकारांना रोजगार मिळण्यासाठी प्रयास केले जात असतानाच, मानवी संसाधनाच्या निर्मीतीसाठी व आजच्या स्पर्धेमध्ये आवश्यक असणारे कौशल्य विकसित करणारे विविध अभ्यासक्रम राबविले जात आहेत.

रोजगार आणि स्वयंरोजगार यांच्या माध्यमातून श्रमाला प्रतिष्ठा देणारी व आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर तरूणांची पिढी निर्माण व्हावी, हा यामागील उद्देश आहे. यातून बेरोजगारी व आर्थिक कुचंबना निश्चितपणे संपुष्टात येईल. गाडगेबाबांच्या ‘बेकारांना : रोजगार’ आणि ‘दु:खी व निराशांना : हिंमत’ या दोन्ही सुत्रांच्या पूर्ततेसाठी या योजना व धोरणे निश्चितच उपयुक्त ठरणारे असून मानसिक व शारीरिकदृष्ट्या अत्यंत सुदृढ असा समाज आपण याद्वारे निर्माण करू शकणार आहोत.

बाबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाच्या प्रत्येक समस्येवर विविध योजना शासनाकडून राबविल्या जात असल्या व समाज उन्न्तीची सर्व जबाबदारी शासनाची असली तरी, प्रत्येक नागरिकाने ती नैतिक कर्तव्य म्हणूनही निभावने जरूरी आहे. आपण या दृष्टीने येणाऱ्या काळात कार्य करत राहू हीच खऱ्या अर्थाने बाबांना आदरांजली ठरेल !

प्रा. डॉ. मोना चिमोटे

 विभागप्रमुख, पदव्युत्तर मराठी विभाग

 संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती

 (संकलन-विभागीय माहिती कार्या. अमरावती)