ही साहित्य संमेलने कोणाची?

दिल्ली येथे दिनांक २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५ या काळात डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, पुणे आणि सरहद्द, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनाचे उद्घाटक प्रत्यक्ष पंतप्रधान मोदी आहेत . ७१ वर्षानंतर दिल्लीत असे साहित्य संमेलन दुसऱ्यांना भरत आहे .१९५४ साली  ३७ वे साहित्य संमेलन लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत भरले होते. त्यावेळी उद्घाटन होत असताना व्यासपीठावर पंतप्रधान नेहरू आणि लोकसभेचे सभापती ग .वा. माळवणकर उपस्थित होते. या दोन्ही साहित्य संमेलनांची वैशिष्ट्ये म्हणावित ती म्हणजे दोन्ही साहित्य संमेलनांना त्या त्या काळचे देशाचे पंतप्रधान व्यासपीठावर उपस्थित राहिले आहेत.

* साहित्य संमेलनाची पूर्वपिठीका –

इ.स. १८७८ मध्ये पुणे येथे पहिले मराठी साहित्य संमेलन न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी यांच्या पुढाकारातून झाले होते. त्या संमेलनाचा  मुख्य उद्देश ग्रंथ प्रसारास चालना देणे हा होता .त्यामुळे अशा विचारांच्या मंडळींनी एकत्र येऊन विचार विनिमय करावा म्हणून हे संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी या संमेलनास ग्रंथकार सभा किंवा ग्रंथकार  परिषद असे म्हटले गेले होते. यात विविध ग्रंथकारांना आमंत्रित करण्यात आले होते. तशा पद्धतीचे आवाहन ज्ञानप्रकाश मध्ये ७ फेब्रुवारी १८७८ मध्ये प्रकाशित करण्यात आलेले होते.

या परिषदेचे अध्यक्ष न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. नंतर दुसरे वार्षिक मराठी साहित्य संमेलन २४ मे १८८५ मध्ये पुणे येथे कृष्णशास्त्री राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार होते. या संमेलनाचे निमंत्रण आयोजक न्यायमूर्ती रानडे यांनी महात्मा फुले यांना पत्राद्वारे पाठविले होते. त्यावेळी महात्मा फुल्यांनी या ग्रंथकार सभेस उद्देशून ‘उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या तुमच्या घालमोड्या दादांच्या साहित्य संमेलनाला मी येणार नाही ‘असे कडक शब्दांत संबोधले होते. या पत्रातील महत्त्वाचा मुद्दा पुढीलप्रमाणे होता -सामान्यतः मानवी हक्कांचा विचार करण्यास जी मंडळी नकार देतात. जे ते इतरांना मान्य करत नाहीत आणि त्यांच्या वर्तनानुसार भविष्यात ते मान्य करण्याची शक्यता कमी आहे त्यांच्या परिषदा आणि पुस्तके आपल्याला अर्थपूर्ण वाटत नाहीत.

महात्मा फुले यांचे हे पत्र ११ जून १८८५च्या ज्ञानोदय वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. महत्वाची बाब म्हणजे या साहित्य संमेलनाच्यावेळी निमंत्रितांपैकी ज्या मंडळींनी आपल्या भावना पत्रांद्वारे कळविल्या होत्या अशा एकूण 43 पत्रांचे वाचन केले गेले .आणि त्यात पहिले पत्र महात्मा फुले यांचे होते. खरे तर हा आयोजकांचा मोठेपणा होता.

* साहित्य संमेलनाचे वेळोवेळी होत गेलेले नामांतर-

अगदी सुरुवातीचे म्हणजे १८५८ चे पुणे येथे संपन्न झालेले साहित्य संमेलन हे ग्रंथकार संमेलन किंवा ग्रंथकार सभा,परिषद  म्हणून नामनिर्देशित झाले. त्यानंतर १९०७ मध्ये या संमेलनास लेखक संमेलन असे संबोधले गेले. तर १९०९मध्ये महाराष्ट्र साहित्य संमेलन असे त्याचे नामाभिधान केले गेले. मध्यंतरीच्या काळात पुन्हा एकदा मराठी साहित्य संमेलन असे नाव बदलण्यात आले. १९३५ ते १९५३ या काळात महाराष्ट्र साहित्य संमेलन या नावाने ओळखले जाऊ लागले. पुन्हा १९५४ मध्ये मराठी साहित्य संमेलन असे नाव योजले गेले. १९६१ मध्ये अखिल भारतीय मराठी महामंडळाकडे साहित्य संमेलनाचा कारभार गेला. कारण त्यावेळेस या महामंडळाची स्थापना करण्यात आली.

ही स्थापना करताना मराठी भाषेचे, साहित्याचे आणि संस्कृतीचे प्रश्न सोडविण्यासाठी  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने भरविणे हा उद्देश ठरविण्यात आला.  तेव्हापासून आजपर्यंत संमेलने भरविण्याची  ही परंपरा कायम आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ ही संस्था संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, मुंबई साहित्य संघ ,मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर आणि मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद या संस्थांचे मिळून  स्थापन करण्यात आली. दर तीन वर्षांनी या महामंडळांची जबाबदारी वरील चारपैकी एका साहित्य संस्थेकडे जात असते. आणि ती  साहित्य संस्था अखिल भारतीय मराठी  महामंडळाच्या सहकार्याने संमेलनाचे आयोजन करत असते . या महामंडळाशी आजूबाजूच्या राज्यांतील मराठी साहित्य संस्थाही निगडित झालेल्या आहेत.

* अखिल भारतीय साहित्य संमेलनाचेवेळी वा आधी  उद्भवणारे वाद –

दरवर्षी होणारी साहित्य संमेलने ही कुठल्या ना कुठल्या तरी वादाला बळी पडतात . हे वाद उद्भवण्यात वेगवेगळी कारणे निमित्तमात्र ठरतात  . पैकी काहीची यादी पुढील प्रमाणे तयार करता येईल -१) महामंडळांतर्गत कार्यरत असणाऱ्या घटक संस्थांचे अंतर्गत वाद ,२) संमेलनस्थळ ठरवण्यावरून वाद ,३) अध्यक्षपद निवडण्याच्या पद्धतीवरून/निवडीवरून वाद,४) आयोजकांमुळे निर्माण झालेले वाद,5) आयोजनात ,व्यासपीठावर राजकारणी मंडळींची हजेरी असण्यावरून वाद,६) सरकारी अनुदानावरून होणारे वाद,७) महामंडळाशी संलग्न नसणाऱ्या इतर काही मराठी भाषक साहित्य संस्था किंवा साहित्यिक यांच्याकडून उद्भवणारे वाद,८) अध्यक्षपदाची निवडणूक लढवितांना वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये निर्माण  झालेले वाद,९) निवडून येण्यापूर्वी वा निवड झाल्यावरही एखाद्या उमेदवाराच्या /अध्यक्षाच्या पुस्तकावरून ,विधानावरून निर्माण झालेले वाद,१०) वादग्रस्त बाबींच्या विरोधात राज्यातील काही राजकीय ,सामाजिक, साहित्यिक ,सांस्कृतिक संघटनांनी विरोध दर्शनासाठी सुरू केलेले आंदोलनात्मक वा इतर स्वरूपाचे वाद,११)  अध्यक्षीय भाषणातील एखाद्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद,१२) तत्कालीन देश -राज्य काल परिस्थितीवरून  निर्माण होणारे वाद ,१३) आयोजनातील ढिसाळपणामुळे निर्माण होणारे संमेलनोत्तर वाद,१४) मानापमान नाट्यावरून उद्भवणारे वाद,१५) महामंडळाने वा आयोजकांनी गरजू घटकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करण्यावरून उपस्थित झालेले वाद.दरवर्षी होणारी साहित्य संमेलने अशा कुठल्या ना कुठल्या वादाला जन्म देत असतात. यावर्षीच्या साहित्य संमेलनप्रक्रियेत असा कुठलाही लक्षवेधी वाद निर्माण झाला नाही. तरी एका बाबीने  साहित्यक्षेत्रात खळबळ उडवून दिली .ती बाब म्हणजे  ९८व्या साहित्य संमेलनासाठी परदेशातून आमंत्रित म्हणून येणाऱ्या व्यक्तींना सरकारने आवश्यकतेपेक्षा कितीतरी अधिक रक्कम बहाल करणे.

* साहित्य संमेलनाची उपयुक्तता-

साहित्य संमेलन हे महाराष्ट्राचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. आज गावपातळीपासून ते वैश्विक पातळीपर्यंत मराठीची साहित्य संमेलने आयोजित केली जात आहेत .त्यात विश्व ,अखिल भारतीय, राज्यस्तरीय, प्रादेशिक ,प्रांतिक ,नगरीय, उपनगरीय, जिल्हास्तरीय ,ग्रामीण ,दलित, आदिवासी, महिला,कामगार,जातीय,व्यावसायिक , बालकुमार ,नवोदित, युवा, आंबेडकरी ,ख्रिस्ती अशा वेगवेगळ्या शीर्षकांनी ही संमेलने आयोजित करण्याचा झपाटा फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अलीकडेच ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. ही  सर्व मराठी भाषकांसाठी एक आनंदाची आणि गौरवाची बाब आहे. ह्या गोष्टी मराठी भाषेच्या संपन्नतेसाठी आवश्यक अशा आहेत . मात्र अलीकडे अ . भा . साहित्य संमेलने समाजविन्भुख होत आहेत की काय असा प्रश्न पडतो. ही संमेलने कोणासाठी? सामान्य जनांसाठी,आयोजकांसाठी , साहित्यिकांसाठी की राजकारण्यांसाठी ? त्यामुळे पुन्हा एकदा महात्मा फुले यांची ती विधाने आठवू लागतात. ही संमेलने ‘घालमोड्या दादांची’च हे पटते. महात्मा फुलेंनी अशा संमेलनांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या त्या ही संमेलने कितपत वास्तवात आणतात हा प्रश्न उरतोच. तरीही ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

_ बाबाराव मुसळे,

ज्येष्ठ साहित्यिक,वाशिम