मराठी भाषेबाबत महाराष्ट्रात माता व बालक यांच्या मधील संवादाची जी बोलीभाषा असते तिलाच मराठी मातृभाषा संबोधले जाते. मराठी माणूस जेथे वस्ती करीत राहिले तेथे संवाद साधताना रोजच्या वापरात, व्यवहारात रूढ असलेली मराठी भाषा मातृभाषा प्रचलित झाली. अन त्याच भाषेत शालेय विद्यार्थी शिक्षण घेत, अभ्यास करीत, मराठी भाषेला समृद्ध करू लागले. प्रत्येक तालुका, जिल्हाच्या गावागावातून बोलीभाषा ऐकायला वेगळी वाटली, तरी बोललेली समजते, कळत असते. या भाषेत शब्दकोष भांडार विपुल आहे, हे मराठी वाड•मयाचा अभ्यास करताना आढळून येते. मराठी संत साहित्य याचा अभ्यास करताना भाषा विविध अलंकाराने नटलेली वाक्प्रचार, म्हणी यांच्या सौंदर्याने सजलेली समृद्ध अन आकर्षक अशी जाणवते.
अभिजात दर्जा प्राप्त झालेल्या या मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मराठी सकल जणांनी मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. शब्दांचे मतितार्थ अन् भाव, आशय समजून उच्चार करताना शब्द उच्चारले पाहिजे. व्याकरणाचा अभ्यास करून त्यातील बोलीतून येणारा भेसळपणा दूर केला पाहिजे. जनमानसात ती टिकून राहण्यासाठी चर्चा सत्रे, निबंध अन काव्य स्पर्धा, प्रश्न मंजुषा, शिबिरे, इत्यादी आयोजित करावयास पाहिजे, नुसतेच मराठी भाषा दिन साजरे करीत, पुढे गप्प राहून उपयुक्त नाही. अगदी शिशु वर्ग, पूर्व प्राथमिक, माध्यमिक ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समाविष्ट करून अभिजात मराठी भाषेचा प्रचार अन् प्रसार करायला पाहिजे. बक्षिसे, शिष्यवृत्ती अन् पुरस्कार, पारितोषिके आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. दानशूर प्रायोजक यांना सहभागी करून निरंतर कार्यक्रम राबविले पाहिजे. शासन दरबारी भाषेचे महत्व अधोरेखित करीत तिचा वापर व्यवहारात वाढविणे गरजेचे आहे.
राज्यातील इंग्रजी भाषा माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयांमधून मराठी भाषेला डावलून हद्दपार करू नये, म्हणून सर्वांनीच जागरूक राहायला पाहिजे. शासनाच्या सर्वच विभागातून अन् मंत्रालयीन कामकाज, तसेच न्यायालयीन स्तरावरील कामकाज काटेकोरपणे मराठी भाषेतून होते किंवा कसे हे दक्ष राहून पाहायला हवे. सर्वच स्तरावर भाषा विकासाचे, समृद्धीचे शर्थीचे प्रयत्न करताना आताच्या तरुण पिढीतील युवक-युवतींना मराठी ग्रंथालये, आध्यात्मिक साहित्य, संत साहित्य वाड•मय व इतर अवांतर वाचनाकडे वळविले पाहिजे तरच अभिजात मराठी भाषेला उत्कर्षांचे दिवस मिळाल्याचे आपणा सर्वांना पाहावयास मिळेल, असे जाणवते.
आपली अभिजात मराठी भाषा ही स्वतःच्या भाषिक सौंदर्यावर ठाम उभी आहे, तिला इतर कोणत्या भाषिकांनी नव्हे तर सुशिक्षित अन सुसंस्कृत मराठी माणसांनीच भक्कम आधार देणे गरजेचे आहे. स्वतंत्र लिपी, स्वर, व्यंजन, वर्ण, व्याकरणाच्या नियमांनी ती बद्ध आहे. विविध विषयावर साहित्य संपदा विपुल असून आपल्या महाराष्ट्र मधील लोकांची लोकभाषा आहे. प्राचीन काळातील शिलालेख यावर ही मराठी कोरीव अक्षरे, उत्खननाच्या वेळेस इतिहासकार तज्ञांना संशोधनात त्याबाबतचे पुरावे मिळालेले आहेत.
मराठी माणसांनीच जाणीवपूर्वक प्रयत्न करून आपल्या अपत्यांना, पाल्यांना वाचन संस्कृती चे महत्व विषद करून भाषेचे संस्कार रुजविले पाहिजे. ही सुरुवात प्रत्येक घराघरातून व्हायला हवी. त्यांची भाषेबाबतची गोडी वाढवायला हवी. जितकी मराठी अस्मिता आपण त्यांच्यामध्ये जागृत ठेवू, तितका अभिजात मराठी भाषेचा स्तर व अभिमान वाढतच राहील. उच्च अभिरुची अन् उच्च दर्जा असणारी अभिजात मराठी भाषा ही प्रत्येकास स्वतःच्या आईइतकीच प्राणप्रिय असायला हवी. मराठी भाषेच्या समृद्धीची आणि विकासाची जबाबदारी आपल्या सर्व मराठी समाज बांधवांची आहे, एवढेच नव्हे तर ते प्राधान्याने आद्य कर्तव्य समजून जाणीवपूर्वक सजगतेने आपापल्या परीने प्रयत्न करीत आपल्या या अभिजात मराठी भाषेला वैभवाचे दिवस येण्यासाठी सतर्क अन् जागरूकच राहायला पाहिजे, असे मला अभ्यासू प्रवृत्ती, वाचनाअंती मनापासून कळकळीने जाणवते !!!
मराठी भाषेमध्ये प्रभावी लेखन आपल्या पूर्वसूरींनी अजरामर करून साहित्यात पूर्वापार त्यात पिढीगणिक लेखकांनी भर घालून वाचकांसाठी अमोल नजराणाच ठेवलेला आहे, अन् प्रत्येक मराठी ग्रंथालये यामध्ये विपुल ग्रंथसंपदा आजवर तेथील व्यवस्थापक यांनी अमूल्य ठेवा आपला सर्व प्रयत्नांनी जतन करून ठेवलेला आहे, वाचकप्रिय वाचकांसाठी कायम उपलब्ध करून दिला आहे. तिथे स्वतः जाऊन वाचकांनी वाचण्याचा आस्वाद घ्यायला हवा, अन् आपल्या पाल्यांना तेथे त्यांच्यासोबत जाऊन भेटी द्यायला पाहिजे. त्यांनाही त्यामुळे वाचनाची आवड निर्माण होऊन गोडी लागेल अन ज्ञान समृद्ध होतील, अशी आशा जाणवते.
निरनिराळी विषयांवरील पुस्तकांच्या वाचनाने बुद्धीची भूक शमवली जाते अन् व्यक्ती सकारात्मकतेने विचार करण्यास प्रवृत्त होतो. विचारांना आखीव रेखीव दिशा मिळून खंबीरता प्राप्त होते. अन् निर्णयक्षम होऊन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज होतो. यासाठीच पालकांनी न कंटाळता अपत्यांकडून पुस्तकाचे वाचन करून घेतले पाहिजे. पुस्तकाने मानवाचे मस्तक हे सशक्त होत असते. सशक्त झालेले मस्तक कधीच कुणाचे हस्तक होत नसते. अन् हस्तक न झालेले मस्तक कुणापुढे नतमस्तकही होत नसते. लोक स्वतःहून वाचन संस्कृती जपत वाचनालयाकडे वळतील, तेथील पुस्तके वाचतील तरच स्वबुद्धीच्या बळावर स्वतःचे प्रश्न सोडवू शकतील. देशाचे भवितव्य, नाव उज्ज्वल तर होईलच, प्रगतीही कोणी रोखू शकणार नाही. यासाठी तरी भाषेचे संस्कार मनस्वी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांच्या मनावर रुजविले पाहिजे, असे मला अनुभवांती सांगावेसे वाटते.
लेखन:-
सौ.मीना घोडविंदे (वनगे),
साहित्यिका, ठाणे
(8451997915)