वर्धेकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारे साहित्य संमेलन

केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. या पार्श्वभुमीवर २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. देशाच्या राजधानीत होणारा “मराठी भाषेचा जागर’ केवळ महाराष्ट्रापुरता आणि देशापुरता मर्यादीत न राहता जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या तमाम मराठी बांधवांसाठी एक अविस्मरणीय क्षण असणार आहे. या निमित्ताने वर्धा येथे झालेल्या ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा धांडोळा घेणे आवश्यक आहे.

१४ जानेवारी २०२३ ला विदर्भ साहित्य संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या शताब्दी वर्षाची सांगता म्हणून विदर्भ साहित्य संघातर्फे दि. ३, ४ व ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ज्येष्ठ विचारवंत न्यायमूर्ती श्री. नरेंद्र चपळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान वर्धा नगरीला दुसऱ्यांदा प्राप्त झाला आहे. यापूर्वी १९६९ साली वर्धा येथे ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. कविश्रेष्ठ पुरुषोत्तम शिवराम रेगे हे त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर ५३ वर्षांनंतर हा योग पुन्हा आला.

वर्धा शहराचे नाव ज्या लोकमातेवरून पडले त्या लोकमातेचे म्हणजे नदीचे नाव वर्धा आहे. तिचे मूळ प्राचीन नाव ‘वरदा’ असे आहे. वरदा म्हणजे वर देणारी. विदर्भाच्या संपन्न प्रदेशाला उत्तर-दक्षिण विभागून आसपासचा प्रदेश सुजलाम् सुफलाम् करणारी वर्धा नदी, हिच्या पाण्यात सेवाभावाचा गुण आहे. म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांनी या नगरीला आपली कर्मभूमी मानले. केवळ या दोन विभूतीच नव्हे तर जमनालालजी बजाज, बाबा आमटे, सिधुताई सपकाळ, क्रांतिवीर पांडुरंग सदाशिव खानखोजे, बापूरावजी देशमुख, वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर अशी अनेक महान रत्ने याच मातीत निर्माण झाली.

वर्धा हे जसे समाजसेवकांचे प्रेरणास्थान आहे, तसेच कलावंतांचेही प्रेरणास्थान आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त ही वर्धा शहराचीच देणगी आहे. पांढरे सोने म्हणून ज्याला गौरविले जाते त्या कापसाची शेती हे वर्ध्याचे भूषण आहे. वर उल्लेखित केलेल्या महनीयांशिवाय अनेक कलावंत, साहित्यिक, राजकारणी, समाजसेवी, शिक्षणप्रेमी आणि अन्योन्न मंडळींनी तसेच संस्थांनी वर्धा शहराच्या आणि परिणामी महाराष्ट्राच्या कीर्तीत भर घातली आहे.

वर्धा ही महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासोबतच साहित्यिक, कलावंत व पत्रकारांची भूमी आहे. त्यामुळेच वर्धा येथे पार पडलेले ९६ वे साहित्य संमेलन विशेष महत्वाचे आहे. या संमेलनाच्या साहित्यप्रेमींच्या खूप आठवणी आहेत.

कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा, विदर्भातील बोली भाषा, ग्रंथालय चळवळीचे यशापयश, आम्हा लेखकांना काही बोलायचे आहे, ललितेतर साहित्याची वाढती लोकप्रियता, समाज माध्यमातील अभिव्यक्ती: एक उलट तपासणी, वैदर्भीय वाङ्मयीन परंपरा, भारतीय व जागतिक साहित्यविश्वात मराठीची ध्वजा फडकवणारे अनुवादक, कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक, मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन, वाचन पर्यायांच्या पसाऱ्यात गोंधळलेले वाचक, गांधीजी ते विनोबाजी : वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून व वंचित समाजाच्या साहित्यातील लोकशाहीचे चित्रण या विषयावरील परिसंवादामधून साहित्याची विविधांगी चर्चा घडवून आणली.

कथाकथन, संमेलनाध्यक्षांची भाषणे आणि त्यावर चर्चा, मृदगंध वैदर्भीय काव्यप्रतिभेचा, एकांक गावकथा, निमंत्रितांचे कविसंमेलन, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद व स्त्री-पुरुष तुलना अशा वैविध्यपूर्ण साहित्यिक उपक्रमाची मेजवानी ही या संमेलनाची खास वैशिष्ट्य होती.

यानिमित्ताने ‘वरदा’ अत्यंत सुरेख व माहितीपूर्ण स्मरणिका आयोजकांनी केली आहे. ही स्मरणिका साहित्यिक ठेवाच आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी मध्ये लेखक, साहित्यिक, कलावंत, प्रसिद्ध व नामांकित साहित्यिकांना भेटण्याचा व अनुभवण्याचा योग वर्धेकरांना दीर्घकाळ स्मरणात राहील असाच आहे.

 

रवी गिते

जिल्हा माहिती अधिकारी

वर्धा