सारे काही मराठीसाठी…

यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्ली येथे होत आहे. या आधी नवी दिल्ली येथे ७२ वर्षापूर्वी ऑक्टोबर महिन्यात ५४ वे साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा, महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली नव्हती, आणि अ. भा. मराठी साहित्य महामंडळही अस्तित्वात नव्हते. या 54 व्या साहित्य संमेलनाचे उद्धाटन तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी केले होते. अध्यक्ष होते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आणि स्वागताध्यक्ष होते काकासाहेब गाडगीळ. त्यानंतर दिल्लीत साहित्य संमेलन होत आहे ते यंदाच. या आधी तब्बल बावीस वेळा महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलने झाली आहेत. यंदाही हे संमेलन अनेक कारणांसाठी विशेष ठरणार आहे.

केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्ली येथे होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. यामुळे हे संमेलन ऐतिहासिक असेल. हा सोहळा मराठी भाषिक, साहित्यप्रेमींसाठी एक अभिमानास्पद क्षण ठरणार आहे. यामुळे संपूर्ण भारतभर आणि परदेशात विखुरलेल्या मराठी जनामनास एकत्र येण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनामुळे मराठीचा लौकिक अधिक वृद्धिंगत होईल. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा मराठी भाषिकांसाठी अभिमानाचा क्षण असेल.

अशा या विशेष संमेलनानिमित्त ‘मराठी भाषेच्या समृध्दतता व संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थाविषयी’ माहिती देणारा लेख…

मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ व राज्य मराठी विकास संस्था अशी 4 कार्यालये कार्यरत आहेत. या चार कार्यालयांकडून मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. या सर्व उपक्रमांना गती देण्यात आली आहे.

राज्य मराठी विकास संस्था

पुस्तकांचे गाव भिलार या प्रकल्पांतर्गत सुरुवातीस 25 घरांमधून प्रत्येकी 500 पुस्तके वाचक/पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. लोकसहभागातून सुरू केलेल्या या प्रकल्पास वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने घरांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे. सध्या येथे साहित्यिक व भाषिक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता वाचकांसाठी निवास व्यवस्था, रस्ते, वाहनतळ, सार्वजनिक प्रसाधनगृह तसेच खुले प्रेक्षागृह इत्यादी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे.

राज्य मराठी विकास संस्थेकडून अमराठी भाषिकांसाठी अध्यापन साधने विकसित करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या पुढाकाराने ‘मायमराठी’ हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत सन 2018 मध्ये 38 लाख रुपये अर्थसहाय्य वितरित करण्यात आले होते. या अनुदानात सद्यस्थितीत भरीव वाढ करण्यात आली आहे.

मराठी बोलींचे प्रतिमांकन हा प्रकल्प डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या सहाय्याने हाती घेण्यात आला असून यामध्ये 60 बोली भाषेचा समावेश करण्यात आला आहे.

दासोपंतकृत गीतार्णव शब्दार्थ- संदर्भकोश : नाथपंचकातील एक महत्वाचे कवी दासोपंत यांनी लिहिलेली गीता टीका म्हणजेच ‘गीतावर्ण’ हा ग्रंथ होय. या साहित्यकृतीची माहिती मराठी वाचकांना व्हावी, याकरिता हा प्रकल्प हाती आला आहे.

भाषा संचालनालय

भाषा संचालनालयाने दैनंदिन प्रशासन व न्याय व्यवहारात सातत्याने उपयोगी होणाऱ्या अ) कार्यदर्शिका ब) प्रशासन वाक्यप्रयोग क) शासन व्यवहार कोश ड) न्याय व्यवहार कोश या भ्रमणध्वनी ॲपचे काम पूर्ण केले असून वरील चार कोषांमध्ये सुमारे 86 हजार मराठी/इंग्रजी शब्दांचा समावेश आहे.

परिभाषा कोश अद्यावतीकरण करण्याचे काम सातत्याने सुरू असते. शासन व्यवहार कोश, कृषिशास्त्र, अर्थशास्त्र, तत्वज्ञान आणि तर्कशास्त्र तसेच शिक्षणशास्त्र परिभाषा कोश या कोषांच्या अद्यावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सुमारे 34 परिभाषा कोश/शब्दकोश तसेच शासन मार्गदर्शक पुस्तकांची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ –

नवीन लेखन प्रकल्प

मराठी भाषेत मौलिक व वैचारिक विषयांवर नाविन्यपूर्ण लिखाण करण्याकरिता मंडळाकडून 20 नवीन लेखन प्रकल्प हाती घेतले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. 1) नाट्य संज्ञाकोष, 2)मराठी नाटक आणि रंगभूमीचा समग्र इतिहास 3) महाराष्ट्राच्या सामाजिक- सांस्कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास 4) महाराष्ट्र दृश्यात्मक कलांच्या परंपरांचा आढावा- बृहद्ग्रंथ प्रकल्प 5) 19 व्या व 20 व्या शतकातील अध्यात्म मार्गदर्शकाचा बोध, 6) मराठी सारस्वतांचे चित्रचरित्र 7) सत्यशोधकांचे अंतरंग 8) गुरुवर्य कृ. अ. केळुसकर यांचे समग्र वाङमय, 9) सुफी तत्वज्ञान सखोल विश्लेषण- बृहद्ग्रंथ 10) भारतातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीची ऐतिहासिक वाटचाल- एक दृष्टिक्षेप 11) महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसांच्या कामगिरीचा समग्र आणि सम्यक इतिहास, 12) अभंगसेतू- संत वचनांचे अनुवाद, 13) अक्षर बालवाङमय : संहिता शोध व बृहद् संदर्भग्रंथ, 14) नक्षत्र निलनभीचे – समग्र बालकवी, 15) महाराष्ट्राच्या प्रयोगात्मक लोककला : परंपरा आणि नवता (1850 ते  2016), 16) कविवर्य नामदेव ढसाळ यांचे समग्र वाङमय- बृहद्प्रकल्प, 17) नागेश विनायक बापट यांचे समग्र वाङमय, 18) मराठीतील बालसाहित्य : इतिहास लेखन आणि समीक्षा संपादन, 19) आधुनिक महाराष्ट्र : अन्वेषणात्मक कालपट, 20) महाराष्ट्रातील नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त, गाणपत्य, चैतन्य, लिंगायत, आनंद व अन्य संप्रदायांच्या मध्ययुगीन वाङमयातील अप्रकाशित व असंग्रहित स्फुट कवितांचे प्रकाशन. दरवर्षी 27 फेब्रुवारीला, मराठी भाषा गौरव दिन समारंभाच्या वेळी या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येते.

अनुदानात वाढ :

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व त्यांच्या 4 घटक संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर या 7 साहित्य संस्थांच्या साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याकरिता आतापर्यंत या संस्थांना दरवर्षी प्रत्येकी 5 लाख रुपये इतके अनुदान देण्यात येत होते.  या अनुदानात वाढ करण्यात आली असून आता प्रत्येकी 10 लाख रुपये इतके अनुदान दिले जाते.

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ

मराठी विश्वकोशाचे 1 ते 20 या सर्व खंडाचे काम पूर्ण झाले असून यामध्ये सुमारे 18 हजार 57 इतक्या नोंदीचा समावेश आहे. हा विश्वकोश शासनाच्या संकेतस्थळावर तसेच कार्ड, पेन ड्राईव्हच्या स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. या विश्वकोशाच्या नोंदीचे अद्यावतीकरण करण्याकरिता महाराष्ट्रातील विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांची मदत घेण्यात येत असून विषयनिहाय विविध 47 ज्ञानमंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या ज्ञामंडळांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने विश्वकोशांच्या नोंदींचे अद्यावतीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आधुनिक कार्य पद्धतीने विश्वकोशातील नोंदी अद्यावत करण्यासंबंधी सर्व संबंधितांना विश्वकोश मंडळाकडून मार्गदर्शन करण्यात येते त्याकरिता वेळोवेळी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.

0000

संकलन : विजय राऊत

विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती