पालकमंत्र्यांच्याहस्ते ‘यवतमाळ ग्रंथोत्सवा’चे उद्घाटन
यवतमाळ, दि.२० (जिमाका) : अलिकडे वाचनाबाबत उदासीनता दिसून येत आहे. नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे वाचन संस्कृती वाढविण्यासोबतच ग्रंथालय चळवळ अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिकेच्या परिसरात आयोजित दोन दिवशीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे राज्याध्यक्ष प्रा.गजानन कोटेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रंथालय सहायक संचालक डॉ.राजेश पाटील, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन, जिवन पाटील, पराग पिंगळे, शिक्षण विस्तार अधिकारी स्मिता घावडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब, विनोद देशपांडे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची गोडी लागावी, चांगली पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, यासाठी ग्रंथोत्सव घेतला जातो. वाचनामुळे जीवन समृद्ध होते. आपली कल्पना व विचारशक्ती प्रगल्भ होते, शब्दसंपत्ती वाढते आणि ज्ञानाचा विस्तार होतो. वाचनामुळे आपले व्यक्तिमत्त्व खुलते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते, असे पालकमंत्री म्हणाले.
ग्रंथोत्सवामुळे विविध विषयांवरील पुस्तके कमी किमतीत आणि सहज मिळतील. शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालये या उपक्रमाचा लाभ घेऊन वाचन संस्कृतीला बळ देतील, हा विश्वास आहे. आज घरोघरी मोबाईलमुळे वाचन कमी झाले आहे. यासाठी मुलांना दोष देवून पालक सुटका करून घेवू शकत नाही. आई-वडिलच तासंतास मोबाईलवर राहत असतील तर मुलांकडून आपण त्यांनी पुस्तके हातात घेऊन वाचन करावे, अशी अपेक्षा करू शकणार नाही. त्यामुळे पालकांनी देखील वाचन वाढवणे आवश्यक आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.कोटेवार यांनी वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात ही चळवळ कायम ठेवण्यासाठी शासनमान्य ग्रंथालयांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ग्रंथालयांचे अनुदान, कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य समस्या यावेळी श्री.कोटेवार यांनी मांडल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली.
दोन दिवशीय ग्रंथोत्सवात आज उद्घाटनानंतर मी सावित्रीबाई बोलते हा एकपात्री प्रयोग अपुर्वा सोनार व ऋतिका गाडगे यांनी सादर केला. नायब तहसिलदार रुपाली बेहरे यांनी अहिल्या हा एकपात्री प्रयोग सादर केला. दोन दिवस चालणाऱ्या ग्रंथोत्सवास भेट देऊन नागरिकांनी पुस्तके खरेदी व विविध कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
000