(राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मुळ भाषणातील अंशातून )
साहित्यिक व साहित्याचे प्रयोजन काय ? या प्रश्नाचे उत्तर देतांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात. मी साहित्य पुस्तकातून शिकलो नाही. अफाट जनसागरातून, हृदयाच्या गाभाऱ्यातून, आंतरिक उचंबळीतून मी साहित्य शिकलो. साहित्याची कल्पना ह्या जनसागरात मिळाली. पद्धतशीर जीवन जगण्याला सुरुवात जेथे झाली, तेथे साहित्यिकांचा समूह आला. पद्धतशीर जीवन जगण्याचे ज्ञान येणे, जीवनाचे सक्रिय-तत्त्वज्ञान समजू लागणे हे ज्याला साधले, तोच साहित्यिक व आचाराविचारातील शुद्धता, संकुचित वृत्तीचा लोप, संघर्षहीनता, परस्पर सहकार्याची ओढ, गरिबांबद्दल प्रेमभावना, समाजोन्नतीच्या कल्पना याविषयीच्या विचारांची निर्मिती म्हणजे साहित्य.
साहित्यिक व साहित्या बाबतची आपली भुमिका विशद करतांना महाराज पुढे म्हणतात, प्रत्येकाला आपली भावना विश्वव्यापी करावयाची आहे. प्रथम आप्त व नंतर विश्वालाच आपले घर मानणे, किंबहुना ‘हे सारे चराचर विश्व माझेच स्वरूप आहे’ ही जीवनाची अत्युच्य कल्पना असून ती साऱ्या समाजात पसरावयाची आहे. परंतु, या उच्चतेला पोहचण्यासाठी पायऱ्यांनी जावे लागुन अनुभव घ्यावे लागणार आहेत. महात्मा गांधीच्या सेवाग्रामला अखिल भारतीय कुंभार परिषदेत महाराज सहभागी झाले ते म्हणतात, साहित्य मी कुंभारांच्या सामानात, मडक्यातही पाहिले. मी तेही साहित्यच समजतो. जीवनाला सामान पुरविणारे, साहित्याचा पुरवठा करणारे ते सारे साहित्य ! काही साहित्य कलात्मक असेल, काही साहित्य कलात्मक नसेल, काही कलागुणात कमी पडेल. पण कलात्मकतेचा-अंश कमी असणारे जीवनसाहित्य हे साहित्यच नव्हे, असे म्हणता येणार नाही. असे वाद जगात सर्वत्र चालले आहे. नाट्यसाहित्य किती विशाल आहे ? सारे साहित्य जगाच्या पसाऱ्यात रंगले आहे.
आपापल्या परीने ह्या साहित्यातला रंग अनुभवावयाचा आहे. हा अनुभव घेणाऱ्या साहित्यिकात एखादा, परब्रह्माच्या महानंदात रमून साहित्याच्या पराकोटीला आपल्या साहित्यिक भावना नेऊ शकतो व महान साहित्यिक म्हणून तो अमरही ठरतो. त्याची कला, त्याचे साहित्य अजरामर विश्वात्मक ठरते. साहित्यिकांतील दशकानुशके चालत असलेल्या वादावर गुरुकुंज आश्रम येथे 1953 मध्ये संपन्न झालेल्या साहित्य संमेलनच्या अध्यक्षीय भाषणातून भाष्य करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कुणी म्हणतात, विदर्भ साहित्य-संमेलनाचे प्रयोजन नाही. कुणाचा विरोध महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आयोजनाला होतो. कुणाला हिंदी साहित्य संमेलनाची आवश्यकता नाही असे वाटते. परंतु ह्या कशाचेच प्रयोजन नाही असे नाही. प्रांतिक भाषांची किंवा एका राष्ट्रभाषेचीच संमेलने भरावी, असे नसून, कुटुंब साहित्याचीही संमेलने भरावी, ग्रामसाहित्याची संमेलने व्हावी, सर्व भारतीय भाषांची एकत्र संमेलने व्हावी, इतकेच नव्हे तर, विश्वसाहित्य संमेलनाचीही नितांत आवश्यकता आहे, अशी अपेक्षा महाराज मानव कल्याणासाठी व्यक्त करतात. मानव कल्याणासाठी साहित्यिकांकडून अपेक्षा व्यक्त करताना, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज म्हणतात, माणसाला मानव करावयाचे आहे; त्याला दानव होवु द्यायचे नाही, त्याला सर्व जीवनाचे मनोहर हृदयंगम दर्शन घडवायचे आहे. त्यातले मांगल्य, त्यातले अभिजात सौंदर्य, त्यातले सारे वर्म व मर्म अनुभवावयाचे ज्ञान त्याला द्यावयाचे आहे. हे एक भव्य व दिव्य कार्य आहे, हे दिव्य कार्य साहित्यिकांनी करायला हवे आहे. परंतु बरेच साहित्यिक विकृतीच्या मार्गाने जातात असे खेदाने म्हणावे लागते. कला, बुद्धी वा भावना यांचा दुरुपयोग होतो, तो होऊ नये. आमच्या साहित्यिकांनीही आपल्या साहित्याचा दुरुपयोग होणार नाही यासाठी जागरूक असले पाहिजे. आम्हाला सर्व गोष्टींची गरज आहे.
साहित्य हे मिरविण्यासाठी, झब्बूशाहीसाठी व दीन-दुबळ्यांच्या झोपडया चिरडण्यासाठी नाही. जगाला जागवण्यासाठी, जगाच्या निरीक्षणासाठी, जगाच्या विशालतेत विलीन होण्याचे शिक्षण घेण्यासाठी साहित्य आहे. साहित्याने भराभर उड्या मारत अथवा अंतराळातून उडत जायला नको. अशा तकलादू क्षणजीवी साहित्याचे भवितव्य विनाशाकडे वळणारे असते. असे साहित्य जिवंतही राहत नाही , त्याचा उपयोगही होत नाही व परिणामकताही त्यात उरत नाही. लढाईत शंभर वीरांवर वार करीत-मारीत समोर चाललात, मागे काय होत आहे इकडे तुमचे लक्ष नाही. वस्तुत: तुम्ही पुढे जात आहात आणि मागचे मरणारे उठून उभे होत आहेत. हे निष्फळ युद्ध आणि परिणाम न करणारी तुमची विनाशी कला एकाच कक्षेत येतात. याप्रमाणे लढणाऱ्या वीरांची गुलामी जशी नष्ट होत नाही तद्वतच तुमची ही वरवरची साहित्यनिर्मिती ही सुद्धा एक गुलामीच ठरते.
आमच्या समाजात उत्तम विचार, उत्तम गरजा यांची पूर्तता करावयाची आहे. तळमळ वाटणाऱ्यांनी हे करायला हवे. साहित्यिक त्यातून सुटत नाही. आचार-विचारांचा प्रचार नाही तोवर देश सुधारणेचा विचार व्यर्थ होय! आमच्या येथे शेकडा शंभर लोकांना तसा धर्म -समजतो पण त्यातही वास्तवता शेकडा दहांनाही कळत नाही. साप दिसला, भीती वाटली; झाला तो आमचा देव! झाड पडले, झाले झाड देव! जो आघात करील, जो दाखला देईल, तो आमचा धर्म होतो. आमच्या धर्मकल्पनांची, आमच्या सामाजिक जीवनाची ही अधोगती आहे. ही नष्ट व्हावी असे साहित्यिकास वाटणार नाही, तर तो साहित्यिक तरी कसला? संपूर्ण लोकात मानवता वाढावी, विषमतेची दरी मिटावी व अधमता सोडावी ही धर्माची प्रगती आहे. समाजाची उन्नती आहे. साहित्यिकांचा हातभार यासाठी लागावा; नाहीतर ते केवळ ‘भुईला भार’च आहेत असे नाईलाजाने म्हणावे लागेल. मानवाच्या कल्याणासाठी साहित्याची आवश्यकता स्पष्ट करतांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज देशातील विषमतेचे उदाहरण देवुन म्हणतात, आमच्या समाजातल्या रूढ्यांनी आमचे जीवन बरबटले आहे. श्रीमंताच्या घरी जेवणावळी सुरु असतांना त्याचवेळी त्याच्याच घराबाहेर भुकेलेली माणसे उष्ट्या पत्रावळीवरील अन्न मिळविण्यासाठी आपसात भांडतांना दिसणारे चित्र भयावह आहे. ज्या देशात, ज्या प्रांतात, ज्या गावात साहित्य संमेलने भरावी, त्याच गावातल्या, त्याच प्रांतातल्या, त्याच देशातल्या साहित्यात मात्र प्राण्यांपेक्षाही खराब जीवन जगणाऱ्या अश्या दीन-दरिद्री भुकेकंगालांचे प्रतिबिंब उमटु नये, हा दैवदुर्विलासच नव्हे तर काय? साहित्याने आता ही जाणीव करून घेतली पाहिजे. त्याशिवाय साहित्याची व्याख्याच होऊ शकत नाही. महाराज म्हणतात काही साहित्यिकांचे साहित्य कदाचित दुसरे असू सकते. परंतु मला या देशात ‘तरी तसे साहित्य नको आहे. मला मानव कल्याण साधणारे जीवनसाहित्य हवे आहे. समाजातल्या वैषम्याच्या भिंती, विषम स्थिती निवळणारे साहित्य व तसे साहित्य निर्माण करणारे साहित्यिक मला या देशात हवे आहेत. हे कार्य काही कीर्तनांनी करतील, काही भजनांनी करतील, काही कायद्यांनी करतील. आम्ही हे कार्य विचारांची पेरणी करून, साहित्याच्या माध्यमाने केले पाहिजे! साहित्याच्या शक्तीची जाणीव मला आहे. साहित्याची महान शक्ती जगातील मोठेया शक्तींपैकी एक आहे. त्यात बाणेदारपणा आहे. तेज आहे, ओज आहे. या शक्तीचा उपयोग माझ्या समाजाला व्हावा आमच्या देशाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी ही शक्ती भक्तीभावाने वेचली गेली पाहिजे. समाजाचा विकास कोणत्याही साधनाने का होईना, शीर्घ गतीने व्हावा ही तळमळ आम्हाला लागली पाहिजे. सर्व समाजाला पुढे न्यायला साहित्यिकांचे संमेलन हा एक स्तुत्य उपक्रम आहे. यातुन समाजाला जीवनाचे साहित्य, जीवनाचे सामान मिळेल, जीवनाची सेवा मिळेल, सर्व काही मिळेल, अशी विविधांगी दृष्टी साहित्यिकांची असावी! जनसंख्येवर कार्याचे मोजमाप होत नाही. काही थोड्या फार साहित्यिकांनी माझे विचार आत्मसात केल्यास मला समाधान वाटेल! दुसरा शिकलेलाही माणूस आम्ही उचलून धरू शकतो; साहित्य हे जर सर्व समाजाला सामर्थ्य देऊन पुढे नेण्याचे, प्रोत्साहन देण्याचे साधन आहे, तर साहित्य संघाचे वा साहित्य संमेलनाचे क्षेत्र मूठभरासाठीच मोकळे न राहता समाजव्यापी व्हायला हरकत नाही. म्हणूनच साहित्य संघात उपेक्षित कलांवतांनाही आता सदस्य करून घेतले पाहिजेत,त्यांच्यासाठी साहित्याचे दरवाजे, साहित्याचे सारे रस्ते मोकळे व्हावे! “यारे यारे लहान थोर, भलते याती नारी नर” ही भावना साहित्य संघाने ठेवून आपल्या क्षेत्राचा विस्तार करायला हवा; तरच ते साहित्य आणि तरच तो साहित्यिकांचा संघ! अशी अपेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यिकांकडुन करतात.
संकलन :
-प्रा.राजेश बोबडे ,
गुरुकुंज मोझरी, जि -अमरावती.
8087949566/ rajesh772@gmail.com