दहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून शुभेच्छा 

तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा द्या

मुंबई, दि. 20 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. कोणताही तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून परीक्षा देण्याचे आवाहन करून शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शालेय शिक्षणमंत्री श्री. भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता दहावीची परीक्षा. 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातील 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी 5 हजार 130 केंद्रांवर परीक्षेला सामोरे जात आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नसून आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी म्हणून या परीक्षेकडे पाहावे.

शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता उत्तम कामगिरी करा, असे सांगून शालेय शिक्षणमंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/