प्रस्तावना :
मराठी साहित्यात कथा, कविता, नाटक, ललित गद्य, चरित्र, आत्मकथन आदी वाङ्मय प्रकार आहेत. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात समाजामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात अनेक चळवळी झाल्या. ग्रामीण जीवनाचा विकास व्हावा हा मुख्य उद्देश असलेल्या या चळवळी काही प्रमाणात यशस्वी ठरल्या तर काही प्रमाणात अयशस्वी ठरल्या. या चळवळींमधून साहित्यामध्येही ग्रामीण, दलित, स्त्रिवादी, आदिवासी, जनवादी इत्यादी वाङ्मयीन प्रवाह निर्माण झाले. या सर्व प्रवाहांमध्ये महत्त्वाचा वाड्.मयीन प्रवाह म्हणजे ग्रामीण साहित्याचा प्रवाह होय. महात्मा जोतिबा फुले यांची मुख्य प्रेरणा असलेल्या साहित्य प्रवाहात प्रामुख्याने ग्रामीण लोकांच्या सुख-दुःखांचा, व्यथा-वेदनांचा, श्रद्धा-अंधश्रद्धांचा, रुढी-परंपरांचा, कृषिनिष्ठ समाजव्यवस्थेचा चर्चेचा विषय येतो. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, इंदिरा गांधी यांच्या समाजक्रांतीकारी विचाराने समाजामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली व या सर्व गोष्टींचा प्रभाव साहजिकपणे ग्रामीण साहित्यावर पडला. घटनेने दिलेल्या लेखन व भाषण स्वातंत्र्याचा वापर करत ग्रामीण सुशिक्षित तरूण आपल्या व्यथा, वेदना, सुखदुःखे साहित्यात मांडू लागला, त्यामध्ये व्यंकटेश माडगूळकर, श्री. म. माटे, आनंद यादव, शंकर पाटील, ग.ल. ठोकळ, रा. रं. बोराडे, सदानंद देशमुख इत्यादी अनेक प्रतिभा संपन्न माणसांची नावे घेता येतील. या सर्व प्रतिभासंपन्न लोकांनी आपल्या ग्रामीण बोलीत आपलं रोजचं जगणं, बोलणं, वागणं मांडायला सुरवात केली. यासाठी त्यांनी कथा, कादंबरी, कविता, नाटक, वैचारिक लेखन इत्यादी वाड्.मयीन प्रकार हाताळले. या सर्व वाङ्मयीन प्रकारामधून त्यांनी ग्रामीण जीवन, जाणीवा कशा पद्धतीने जिवंत केल्या आणि ग्रामीण साहित्य चळवळीच्या साहित्याचे स्वरूप कशा प्रकारचे आहे.
‘ग्रामीण’ साहित्य संकल्पना :
मराठी साहित्यात ‘ग्रामीण’ ही संज्ञा सर्वसाधारणपणे १९२५ पासून रूढ झाली आहे. कोणतीही संकल्पना किंवा संज्ञा एकदम अस्तित्वात येत नसते. त्यापाठीमागे कोणतीतरी पार्श्वभूमी असते अशीच पार्श्वभूमी ‘ग्रामीण’ या संज्ञेच्या निर्मितीमागेही आहे हे लक्षात घ्यायला हवे.
ग्राम म्हणजे खेडं. आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. सत्तर-ऐंशी टक्के समाज खेड्यांमध्ये राहतो. शेतकरी हा खेड्यातील प्रमुख घटक आहे. खेड्यात राहणारा शेतकरी हा शेती आणि निसर्गाशी संबंधित असा घटक आहे. शेती व्यवसाय, निसर्गाचे सान्निध्य, तुरळक लोकवस्ती, एकजिनसीपणा, भौगोलिकता इत्यादी वैशिष्ट्यामुळे हा समाज शहरी जीवनापासून वेगळा ठरतो. या समाजाची स्वत:ची अशी संस्कृती निर्माण होऊन या खेड्याची रचना ही एका विशिष्ट पध्दतीनुसारच रचलेली असते. या विशिष्ट पध्दतीच्या ग्रामव्यवस्थेच्या रचनेविषयी विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, “या देशात अनेक राज्यव्यवस्था आल्या गेल्या परंतु, ग्रामव्यवस्था कायम राहिली.”
‘कृषिकेंद्रित रचना’ हे ग्रामसंस्कृतीचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याने ग्रामव्यवस्थेत शेतकरी हा प्रमुख घटक असतो. संपूर्ण ‘गावगाडा’ शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून निर्माण झाल्याचे दिसून येते. त्रि. ना. अत्रे यांनी ग्रामरचनेविषयीचे चित्र रेखाटले आहे ते असे, “खेडे म्हटले की अगोदर चटकन काळीच डोळयापुढे उभी राहते. शेते, पिके, गवत, झाडे, गुरेढोरे, शेळया मेंढया, मेंढके, शेतकरी, गुराखे, पाट, बुडक्या, विहिरी, नांगर, कुळव, मोट, मळा, गोफण वगैरे. बळीराजाचे वैभव खेड्याचे नाव काढताच इतके मन व्यापून टाकते की, खेड्यात शेतीखेरीज दुसरा व्यवसाय चालत असेल किंवा शेतकऱ्याखेरीज दुसरे कोणी रहात असेल असे एकाएकी मनातही येत नाही. कुणबी पुढे झाल्याखेरीज एकाही खेड्याची वसाहत झाली नाही. त्याने धान्य पैदा करून इतरांच्या खाण्याची तरतूद केली तेव्हा इतर गोळा झाले.”
कृषिजीवनाशी निगडित असणारे सण–उत्सव साजरे केले जातात. ग्रामीण जीवन हे शेती, पाऊस, निसर्गातील घटक यांच्याशी निगडित असते. भारतीय शेती प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून असते. ग्रामसंस्कृतीत कुटुंबव्यवस्थेला अधिक महत्त्व असते. शेतीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी एकत्रित कुटुंबपध्दतीला महत्त्व असते पण, आजच्या काळात ही पध्दती कोलमडून पडलेली दिसते. ग्रामीण भागात परिवर्तन होत असले तरी जातिव्यवस्था नष्ट झालेली नाही प्रत्येक जातीची स्वत:ची अशी एक स्वतंत्र रचना असते, वेगवेगळी संस्कृती असते.
ग्रामीण व्यक्ती ही कुटुंबाला, कुटुंब जातीला, आणि जात गावगाड्याला बांधलेली असते. या साऱ्या विवेचनातून असे लक्षात येते की, माणसाच्या मनोविश्वाचे आणि व्यवहाराचे चित्र ग्रामीण साहित्यातून प्रकट होत जाते. ग्रामीण जीवनातील वास्तव प्रकट होते.
थोडक्यात, ग्रामीण साहित्यात ग्रामीण माणसाचे माणूस म्हणून असणारे धर्म प्रकट होतात. ग्रामीण साहित्य हे व्यक्तीकेंद्रित असते. कृषिकेंद्रित संस्कृती या संस्कृतीने निर्माण केलेले लोकमानस, गावगाडा यातूनच ग्रामीण साहित्य आकारास येते. ग्रामसंस्कृतीतूनच ‘ग्रामीण’ साहित्याची संकल्पना उदयास आली आणि ती झाली.
ग्रामीण साहित्य हे ग्रामीण व्यवस्थेशी संबंधित असते. “कृषिकेंद्रित व्यवस्था निसर्गसन्मुख आणि आदिमातेशी संवाद साधू पाहणारी स्वतंत्र अशी व्यवस्था म्हणजे ग्रामीण व्यवस्था.” हे नागनाथ कोत्तापल्लेचे मत उचित ठरते.
ग्रामीण साहित्य व्याख्या :
‘ग्रामीण साहित्य निर्मिती होऊन आज पंच्याहत्तर वर्षे होऊन गेली तरी ग्रामीण साहित्याची समीक्षा करणारे समीक्षक अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत ग्रामीण साहित्याच्या दृष्टीने ही फार मोठी दुर्दैवाची बाब आहे. मराठी साहित्यात ग्रामीण साहित्याने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले असले तरी ग्रामीण साहित्यसमीक्षा उपेक्षितच राहिली आहे. एखादा समीक्षक ग्रामीण साहित्याचे लेख किंवा एखादा ग्रंथ निर्माण करतो हा एखादा अपवाद सोडता कोणत्याही समीक्षकाने ग्रामीण साहित्याची फारशी दखल घेतल्याचे दिसत नाहीत.
१९६० नंतर ग्रामीण साहित्याने नवे रूप धारण केले. विविध भागातून ग्रामीण लेखकांचा उदय झाला. १९७५ नंतर ग्रामीण साहित्यात क्रांती घडून आली. ग्रामीण साहित्याने चळवळीचे स्वरूप धारण केले. ग्रामीण साहित्याची प्रथम दखल घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला तो ‘आनंद यादव’ या ग्रामीण लेखकानेच ग्रामीण साहित्याच्या अभ्यासाला यादवांचे ग्रंथ एक वरदानच ठरले असे म्हणावे लागेल.
आनंद यादवानंतर मराठी साहित्य समीक्षेत ग्रामीण साहित्यावर समीक्षा करणारे अनेक समीक्षक निर्माण झाले. नागनाथ कोत्तापल्ले, भालचंद्र नेमाडे, वासुदेव मुलाटे, द. ता. भोसले, गो. म. कुलकर्णी, चंद्रकुमार नलगे, रवींद्र ठाकूर हे समीक्षक ग्रामीण साहित्याला लाभले. ग्रामीण साहित्याचा सखोलपणे अभ्यास करून त्याच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील ग्रामीण साहित्याला कोणत्याही एका व्याख्येत बांधणे अशक्यप्राय आहे. यावरून ग्रामीण साहित्याचा प्रवाह किती विस्तारित स्वरूपाचा आहे याची कल्पना येते. ग्रामीण साहित्याच्या विविध समीक्षकांनी केलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे अभ्यासता येतील.
१. डॉ. आनंद यादव :
“खेडेगाव तेथील जीवनपध्दती, खास अशा रीती, शेती, तेथील निसर्गाशी, मातीशी असलेले मानवी पण प्रदेशनिष्ठ वैशिष्ट्यपूर्ण संबंध तेथील एकूण संस्कृतीला लाभलेली काही प्रादेशिक वैशिष्ट्ये, मानवी जीवनाला लाभलेल्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक, ज्ञानविषयक, मर्यादा व त्यातून उद्भवणारे प्रश्न, समस्या इ. सर्व अनुभूतीतून निर्माण झालेले साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य होय.”
२. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले :
“ग्रामीण जीवनातून फुलणारे ग्रामीण वास्तवातून साकार होणारे साहित्य ते ग्रामीण साहित्य.”
३. डॉ. गो. म. कुलकर्णी :
“आधुनिक काळाने ग्रामसंस्कृतीत जगलेला परंतु नवशिक्षणामुळे या संस्कृतीपासून कालांतराने अलग झालेला नव विचारवंतांचा, नवलेखकांचा जो वर्ग निर्माण झाला त्याला स्वतःचे वा इतराचे ग्रामीण जीवन जाणवते त्याचे दर्शन आजचा ग्रामीण लेखक प्राधान्याने घडवित असतो एकूणच आजचे वा कालचे ग्रामजीवन त्याचे मनोव्यापार, सांस्कृतिक संवेदन, सखोलपणे आणि सर्वागीण स्वरूपात ज्यात व्यक्त होते असे साहित्य म्हणजे ग्रामीण साहित्य.”
४. डॉ. भालचंद्र नेमाडे :
“ग्रामीण संस्कृतीची ओढ आणि त्यातील आनंदतत्त्वाबद्दलची आस्था ग्रामीण साहित्यातून प्रकट होते.”
थोडक्यात ग्रामीण जीवनपध्दती, ग्रामीण माणसांचे मन आणि संस्कृतीचा ठेवा यांचा घेतला जाणारा शोध आणि बोध म्हणजे ग्रामीण साहित्य. या सर्व व्याख्यांवरून असा निष्कर्ष काढता येईल की, ‘ग्रामीणता’ साकार होण्यामध्ये कृषिनिष्ठ संस्कृती, निसर्गसन्मुखता यातून निर्माण झालेले लोकमानस हे घटक महत्त्वाचे ठरतात. यातूनच जगण्याची एक ‘रीत’ साकार होत जाते या रीतीचे चित्रण ज्या साहित्यात आढळते ते ग्रामीण साहित्य.
ग्रामीण साहित्याचा विकास :
ग्रामीण साहित्याचा उदय आणि विकास खऱ्या अर्थाने विसाव्या शतकात झाला. एकोणिसाव्या शतकात ग्रामीण साहित्याचा पाया रचला गेला आणि विसाव्या शतकात खरेखुरे ग्रामीण साहित्य उदयास आले. ‘ग्रामीण साहित्य’ ही संकल्पना १९२५ पासून रूढ झाली तेव्हापासून ग्रामीण जीवनातील वास्तव चित्र मराठी साहित्यात दिसू लागले. ग्रामीण साहित्यात पहिला आविष्कार कवितांमधून झाला कवितांमधून ग्रामीण जीवन उमटू लागले पण, या कवितांवर इंग्रजी कवितांचा प्रभाव जाणवतो. इंग्रजीतील ‘पॅस्टोरल पोएट्री’ (Postoral poetry) वरून मराठीत जानपदगीते, गोप – गीते निर्माण झाली असली तरी ग्रामीण साहित्याला एक दिशा मिळाली हे निश्चित मानावे लागेल. भा. रा. तांबे, कवी गिरीश, ग. ल. ठोकळ यांनी विशेषत: ग्रामीण वातावरण, ग्रामीण भाषा वापरून कविता निर्माण केल्या आहेत हे विसरून चालणार नाही.
१९२० मध्ये टिळकयुगाचा अस्त झाला आणि गांधीयुगाचा प्रारंभ झाला. ‘गांधीवाद’ ग्रामीण साहित्याचा प्रेरणास्त्रोत ठरला. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, परिवर्तन घडले, सारा समाज ढवळून निघाला. या सर्व घटनांचा परिणाम साहित्यावरही तितकाच प्रखरतेने झाला. साहित्यातही नवे परिवर्तन झाले. गांधीजींच्या विचारांनी साऱ्या जीवनाला व्यापून टाकले होते. ‘खेड्याकडे चला’ हा मूलमंत्र गांधीजींनी जनतेला देऊन खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात घडविले. खेड्याचे महत्त्व नव्या जाणिवासह पटवून दिले. खेड्याचा उध्दार करून विषमता, अज्ञान, दारिद्र्य यांना दूर करून भारताला प्रगत राष्ट्र बनवायचे गांधीजींचे स्वप्न होते. गांधीजींचे विचार अत्यंत प्रभावी होते त्यात शंकाच नव्हती. त्याच्या प्रगल्भशाली विचारांचा प्रभाव इतका जबरदस्त होता की, ग्रामीण साहित्याची नवी कवाडे उघडली गेली असे म्हणावयास हरकत नाही. १९२५ नंतर ग्रामीण साहित्यावर गांधीजींच्या विचाराचा प्रभाव अधिक जाणवतो.
१९२५ नंतरच्या ग्रामीण साहित्यात वेगळेपण जाणवत असले तरी मराठी साहित्यापेक्षा फारसे वेगळे वाटत नाही. या संदर्भात नागनाथ कोत्तापल्ले यांचे मत विचारात घेऊया. त्यांच्या मते, “१९२५ नंतर अवतरणाऱ्या ग्रामीण साहित्यामागील प्रेरणांचे वेगळेपण दिसत असले तरी स्वरूप मात्र तत्कालीन एकूण मराठी साहित्यापेक्षा फारसे वेगळे नाही. तत्कालीन मराठी साहित्य हे मोठया प्रमाणात ‘स्वप्नरंजनपर’ आणि ‘अवास्तव कल्पनाविश्वात रमणारे आहे. ग्रामीण साहित्य या पेक्षा फारसे वेगळे आहे असे म्हणता येणार नाही.”
१९२३ मध्ये रविकिरण मंडळाचा उदय झाला. या मंडळातील अनेक कवींनी ग्रामीण जीवनाविषयक कविता निर्माण करून ग्रामीण जीवनाचे चित्र टिपले आहे. कवी गिरीश, कवी यशवंत, भा. रा. तांबे यांच्या काव्याने विशेष लक्ष वेधून घेतले. १९३१ मध्ये वि. स. सुखटणकर यांनी ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ हा कथासंग्रह प्रसिध्द करून खेड्यातील समाज दर्शन घडविले. १९३२ मध्ये ग. ल. ठोकळांनी ‘मीठभाकर’ हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिध्द करून ग्रामीण जीवन चित्रण केले आहे.
याच दरम्यान ग्रामीण साहित्यात एक नवा प्रवाह येऊन मिळाला. तो प्रवाह म्हणजे ‘प्रादेशिक’ ग्रामीण संज्ञेप्रमाणेच ‘प्रादेशिक’ ही संज्ञाही रूढ झाली. साधारणत: १९२७–२८ पासून प्रादेशिक जीवनचित्रण साहित्यातून प्रकट होऊ लागले होते. वि. स सुखटणकरांच्या ‘सह्याद्रीच्या पायथ्याशी’ (१९३१) या कथासंग्रहातून गोमांतक प्रदेशाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. १९३० साली मडगावच्या साहित्य संमेलनात ‘प्रादेशिक’ ही संज्ञा ऐकल्याचे कवी बा. भ. बोरकरांनी सांगितले आहे.
‘प्रादेशिक’ ही संज्ञा ‘ग्रामीण’ या संज्ञेपेक्षा व्यापक स्वरूपाची मानली जाते. या संदर्भात मधु कुलकर्णी लिहितात, “ग्रामीण साहित्य आणि प्रादेशिक साहित्य यामध्ये काहींनी भेद मानलेला आढळतो पण, परिसर म्हणजेच प्रदेश हे मान्य असल्यास ग्रामीण व प्रादेशिक या संज्ञा समानधर्मीच आहेत हे मान्य होण्यास हरकत नाही. किंचितसा फरक मानायचाच झाला तर ‘प्रादेशिक’ ही संज्ञा ‘ग्रामीण’ संज्ञेपेक्षा जास्त व्यापक आहे असे फार तर म्हणता येईल.”
आनंद यादवांनी प्रादेशिक वाङ्मय ग्रामीण वाङ्मयातच असते असे मत व्यक्त करून पुढे ते असेही म्हणतात, “ग्रामीण वाङ्मय असा शब्दप्रयोग मराठीत करीत असताना त्या वाङ्मयाकडून तेथील समूहाच्या ग्रामजीवनाची अपेक्षा नसते. तेथील एखाद्या व्यक्तीचे जीवनदर्शनही ग्रामीण वाङ्मयात चालते… प्रादेशिक वाङ्मयात त्या प्रदेशातील ग्रामविभागाचे समूहदर्शन अभिप्रेत असण ग्रामीण वाङ्मयात त्या त्या ग्रामविभागातील व्यक्तीनिष्ठ जीवन अभिप्रेत असते. तो त्या प्रदेशाचाच पर्यायाने एक भाग असतो.”
प्रादेशिक वाङ्मय हे ग्रामविभागातील समूहजीवनदर्शन आणि ग्रामीण वाङ्मय म्हणजे ग्रामविभागातील व्यक्तिनिष्ठ जीवनदर्शन असा भेद करून प्रादेशिक वाङ्मय हे त्या प्रदेशातील ग्रामजीवनाचेच चित्रण असते असा समन्वय साधून ‘ग्रामीण वाङ्मय’ या शब्दावर अधिक भर यादवांनी दिलेला आहे.
‘प्रादेशिक’ आणि ‘ग्रामीण’ या संज्ञात काही साम्य असले तरी त्या वेगवेगळया आहेत असे नागनाथ कोत्तापल्ले नमूद करतात पुढे ते असेही म्हणतात, “… प्रादेशिक साहित्य ग्रामजीवनाला, ग्रामसंस्कृतीला फारसे महत्त्व देत नाही तर महत्त्व देते ते एका विशिष्ट प्रदेशाच्या समग्र टप्प्याला कधी ग्रामजीवन आलेच तर ते स्वतंत्रपणे येत नाही ते येते त्या प्रदेशातील समग्र संस्कृतीचा एक भाग म्हणूनच येते ग्रामसंस्कृतीपेक्षा त्या प्रदेशाचा टापू अधिक महत्त्वाचा असतो त्या दृष्टीने प्रादेशिक साहित्यातून व्यक्तिकेंद्रितता दिसत नाही तर समूहकेंद्रितता हे या साहित्याचे वैशिष्ट्य असते.”
थोडक्यात ‘प्रादेशिक’ आणि ‘ग्रामीण’ या दोन संज्ञामध्ये काही साम्य भेद दिसून येत असले तरी हे दोन्हीही प्रवाह एकमेकात गुंतलेले आहेत असेच म्हणणे अधिक योग्य ठरेल. ग्रामीण संज्ञेसोबतच प्रादेशिक संज्ञेची वाटचाल झाली आहे.
१९४१ पासून ग्रामीण साहित्याला विशेष बहर आला. र. वा. दिघ्यांनी ‘पाणकळा’ (१९३९) निर्माण करून प्रादेशिकतेची खाण शोधली. र. वा. दिघे, ग. ल. ठोकळ, विशेषतः श्री. म. माटे यांनी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ (१९४१) हा ग्रामीण कथासंग्रह प्रसिध्द करून ग्रामीण भागातील दलितांच्या उपेक्षित भटक्या जीवनाचे अंतरंग उलगडून दाखविले आहे.
१९४१ ते १९६० च्या दरम्यान ग्रामीण साहित्याला नवी दिशा मिळाली. श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकार यांनी ग्रामीण जीवनाचा अनुभव आपल्या लेखणीतून समृध्दपणे आविष्कृत केला. याच काळात ग्रामीण साहित्यात नवे पर्व सुरू झाले. नव्या चाकोरीतील ग्रामीण लेखकांचा उदय झाला. व्यंकटेश माडगूळकरांचे साहित्य एक नवतेज घेऊन जन्माला आले. माडगूळकरांबरोबर शंकर पाटील, द. मा. मिरासदार अशा काही लेखकांनी ग्रामीण साहित्याला एक नवदिशा दिली.
काही ग्रामीण स्त्री लेखिका उदयास आल्या बहिणाबाई चौधरी, प्रतिमा इंगोले या ग्रामीण स्त्री लेखिकांनी ग्रामीण साहित्य विस्तारात मोलाचा हातभार लावला आहे.
‘ग्रामीण’ या संज्ञेबरोबरच ‘प्रोदशिक’ या संज्ञेनेही चांगलाच जोम धरला होता. श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर यांच्या कादंबरीतून प्रदेशाचे जिवंत चित्रण दिसून आले. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ (१९५५) या कादंबरीने ‘प्रादेशिक’ हा शब्द सार्थकी लावला असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
१९६० नंतरच्या ग्रामीण साहित्याने फार मोठी झेप घेतली. या काळात ग्रामीण लेखकांची नवविचारांची नवी पिढी उदयास आली. आपल्या ग्रामीण जीवनानुभवाची शिदोरी घेऊन ग्रामीण साहित्याला नवजीवन दिले. उध्दव शेळके, रा. रं. बोराडे, आनंद यादव, ना. धो. महानोर, महादेव मोरे, सखा कलाल, बाबा पाटील, शंकरराव खरात, आनंद पाटील याशिवाय अन्य लेखकांनी विविध भागातील ग्रामीण वास्तवाचे जीवनचित्रण करून बदलत्या ग्रामीण वास्तवाला लक्षणीय पध्दतीने हाताळले आहे.
१९७५ नंतर ग्रामीण साहित्यास नवउभारी मिळाली. ग्रामीण साहित्याच्या चळवळीचा उदय होऊन या चळवळीतून ग्रामीण लेखकांचा एक वर्ग उदयास आला. राजन गवस, अरूण साधू, बाबा भांड, चंद्रकुमार नलगे, देवदत्त पाटील, मनोहर तल्हार, वासुदेव मुलाटे, भास्कर चंदनशिव, नागनाथ कोत्तापल्ले, योगिराज बाघमारे, इंद्रजित भालेराव, सदानंद देशमुख या लेखकांनी ग्रामीण साहित्यात अमूल्य अशी भर घातली आहे. ग्रामीण साहित्यात या लेखकांनी आमूलाग्र बदल घडवून आणला.
लेखक जेथे जन्मला, जेथे वाढला, ज्या निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्तपणे जगला, तेथील परिसराच्या रंगगंधासह बऱ्या वाईट अनुभवासह तो बरेच काही शिकला या अनुभवातूनच त्यांच्या लेखणीने ग्रामीण साहित्याला आकार दिला.
१९८० च्या दरम्यान खेड्यातील एकूणच समाजजीवन बदलले. ग्रामीण भागातील शिक्षित झालेला लेखक वर्ग स्वत:ला आलेले अनुभव आणि ग्रामीण भागाचे चित्रण ग्रामीण साहित्यात करू लागला.
समारोप :
एकविसाव्या शतकात ग्रामीण साहित्यविश्वात अग्रेसर म्हणून प्रा. सदानंद देशमुख या लेखकांचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. ग्रामीण साहित्यातील नव्या दमाचे ग्रामीण लेखक प्रा. सदानंद देशमुख यांनी ग्रामीण साहित्यात मोलाची अशी भर घालून स्वत:चा असा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे. २१ व्या शतकाच्या उंबरठयावरचे बदलते खेडे तेथील ग्रामीण जीवन आणि निसर्गाशी चालणारा जीवनसंघर्ष याचे चित्रण ‘तहान’ (१९९८) या कादंबरीत आले आहे. धगधगत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण करून ग्रामीण साहित्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचे कार्य केले आहे. या नव्या ग्रामीण लेखकाने ग्रामीण साहित्यातून वर्तमानाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी कथा कादंबऱ्यातून ग्रामीण जीवनाचे भेदक चित्रण वाचकासमोर उभे केले आहे. त्यांनी ग्रामीण साहित्याला नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे.
– डॉ. मारोती गायकवाड
सहाय्यक प्राध्यापक व संशोधन मार्गदर्शक
मराठी विभाग, भारतीय तथा विदेशी भाषा संस्था
एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
मो. ७९७२३८२५५६
संदर्भ सूची :
१. शिंदे विठ्ठल : ‘रामजी शिंदे लेखसंग्रह’, (संपादक) मंगुडकर, पृ. १८४.
२. अत्रे, त्रि. ना. : ‘गावगाडा’, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१६, पृ. १-२.
३. कोत्तापल्ले, नागनाथ : ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृ. १९७
४. यादव, आनंद : ‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे १९७९, पृ. ६.
५. कोत्तापल्ले, नागनाथ : ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृ. ७.
६. कुलकर्णी गो. म. : ‘ग्रामीण साहित्य चळवळ आणि आम्ही’, (संपादक) मुलाटे वासुदेव, लेख ‘ग्रामीण साहित्य चळवळीच्या निमित्ताने’, पृ. ३६.
७. नेमाडे, भालचंद्र : ‘टीकास्वयंवर’, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९०, पृ. ३७
८. कोत्तापल्ले, नागनाथ : ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृ. ३.
९. कुलकर्णी, मधु : ‘महाराष्ट्र साहित्यपत्रिका’, (ग्रामीण साहित्य विशेषांक), महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, जुलै – डिसेंबर १९८०, पृ. ४५.
१०. यादव, आनंद : ‘ग्रामीण साहित्य स्वरूप आणि समस्या’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे १९७९, पृ. ६२.
११. कोत्तापल्ले, नागनाथ : ‘ग्रामीण साहित्य : स्वरूप आणि शोध’, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, पृ. १५.
www