नव्यांना ऊर्जा देणारे मालगुंड मधील कवी केशवसुतांचे स्मारक
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. २१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मालगुंड येथील कविवर्य केशवसुत स्मारकाबाबत विशेष लेख..
‘नव्या मनुतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे,
कोण मला वठणीवर आणू शकतो, ते मी पाहे ’
वरील ओळी या कृष्णाजी केशव दामले अर्थात कवी केशवसुत यांच्या ‘नवा शिपाई’ या कवितेतील आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे नजिक मालगुंड हे त्यांचे जन्मगाव. कोकण मराठी साहित्य परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कवी कुसुमाग्रज यांच्या हस्ते अध्यक्ष श्री. पु. भागवत आणि ६७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक राम शेवाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ मे १९९४ रोजी कविवर्य केशवसुत स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले.
केशवसुतांचे जन्मस्थान असणारी वास्तू आजही सुंदर पद्धतीने जतन करुन ठेवली आहे. त्या काळात वापरण्यात येणाऱ्या वस्तू आजही जशाच्या तशा येथे पाहायला मिळतात. स्वच्छ सारवलेल्या या घरामध्ये त्या विराजमान आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष नमिता कीर, विश्वस्त रमेश कीर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप मालगुंड शाखेचे कार्यवाह विलास राणे, कार्याध्यक्ष शुभदा मुळे, नलिनी खेर, सहसचिव रमानंद लिमये, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे ही मंडळी या स्मारकाच्या अनुषंगाने साहित्य चळवळ पुढे नेटाने चालवत आहेत.
स्मारकात प्रवेश केल्यानंतर कोकण मराठी साहित्य परिषद निर्मित कवी केशवसुत स्मारक संकल्पना व आयोजन संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक ही कोनशिला लावलेल्या ठिकाणी कवी कट्टा तयार केला आहे. पुढे त्यांच्या जन्मस्थानाची वास्तू आहे. त्यामागे तुतारी वाजवणाऱ्या व्यक्तीची आधुनिक कलाकृती लक्ष वेधून घेते. त्याच्या बाजूलाच बसविण्यात आलेल्या कोनशिलांवर निवडक कविता कोरलेल्या आहेत. याला वळसा घालून आतमध्ये पुढे गेल्यानंतर ‘आधुनिक मराठी काव्यसंपदा’ हे दालन दिसते. या दालनात मराठीतील नामवंत कवींची रेखाचित्रे आणि त्याखाली त्यांच्याच हस्ताक्षरातील कविता ही अत्यंत कल्पक मांडणी इथे आकर्षून घेते. त्यासोबत त्या काळातील वापरातील वस्तूही मांडलेल्या आहे. हे सर्व पाहताना त्या कालखंडात वावरायला होते. या दालनाच्या समोरच ग्रंथालय आहे.
या ग्रंथालयात ३५ हजाराहून अधिक पुस्तके, ८०० हून अधिक सभासद आहेत. कवी केशवसुतांची जयंती, पुण्यतिथी, मराठी राजभाषा दिन, वाचन प्रेरणा दिन , मराठी भाषा पंधरवडा, ग्रंथालय दिन असे कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. प्राथमिक शाळांमधूनच नवे साहित्यिक निर्माण व्हावेत, साहित्याची गोडी निर्माण करावी, या उद्देशाने ‘श्रावणधारा’ हा कार्यक्रम राबविण्यात येतो. स्वरचित कविता वाचन, निबंध, वक्तृत्व अशा स्पर्धा घेण्यात येतात. त्यामधील निवडक कवितांचे सादरीकरण स्मारकातील पद्मश्री मधु मंगेश कर्णिक सभागृहात केले जाते.
केशवसुत जन्मशताब्दी समारोह समितीच्या माध्यमातून केशवसुतांची कविता हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक इथे पाहून त्यामधील कवितांची छायाचित्रे घेण्याचा मोह आवरता येत नाही.
‘एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन जी मी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगने
दीर्घ जिच्या त्या किंचाळीने
अशी तुतारी द्या मज लागुनि
समतावादी, पुरोगामी केशवसुतांना ‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ म्हटले गेले आहे. मालगुंड मधील हे स्मारक तमाम मराठी जनांनी, भाषाप्रेमींनी एकदातरी पहायला हवे. नव्या लेखनाची प्रेरणा आणि ऊर्जा येथून घेवून पुढे जायला हवे. किमान शाळांमधील मराठी कवितांमध्ये इथे येवून एकदातरी हरवून जायला हवे..
000
-प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
9403464101