श्री जोतिबा मंदिर व परिसराचा विकास ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच केला जाईल – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून ग्वाही

शंभूराज देसाई यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान दख्खनचा राजा श्री जोतिबा आणि

 करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे मनोभावे दर्शन घेतले.

कोल्हापूर दि. २१: महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दौऱ्यादरम्यान श्री क्षेत्र जोतिबा वाडी रत्नागिरी येथे भेट देऊन त्यांनी दख्खनचा राजा श्री जोतिबाचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच महालक्ष्मी मंदिर येथे जाऊन करवीर निवासिनी माता अंबाबाई देवीचेही त्यांनी दर्शन घेतले. याप्रसंगी सर्वांना उत्तम आयुरारोग्य आणि सुखसमृद्धी लाभो, अशी प्रार्थना केली. यावेळी मंत्री श्री. देसाई यांनी वाडीरत्नागिरी येथील मंदिर परिसराची, तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टची पाहणी केली. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवस्थान आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा, या उद्देशाने विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. जोतिबा देवस्थानसह परिसरातील सर्व संबंधित गावांचा समावेश असलेल्या स्वतंत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर श्री जोतिबा मंदिर आणि संपूर्ण परिसराचा विकास केला जाणार आहे. या संपूर्ण परिसरात वृक्ष लागवड, पक्षी उद्यान, जलसंवर्धन, सुशोभीकरण, यात्री निवास, भाविकांना विविध सुविधा आदी विकासकामे केली जाणार आहेत. श्री जोतिबा मंदिर व परिसराचा हा विकास ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच केला जाईल, अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी दिली.

तसेच येथे पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीने राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी आवश्यक त्या सूचना दिल्या. आजच्या दौऱ्यादरम्यान कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात असलेल्या लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्यामुळे कोल्हापूरशी आमच्या कुटुंबाचे घट्ट बंध जोडले गेले आहेत. येथील प्रत्येक भेटीत त्यांच्याबद्दल आणि आमच्या कुटुंबाबाबत करवीरवासीयांमध्ये असलेली आपुलकीची भावना जाणवते. कोल्हापूरकरांच्या या प्रेमाबद्दल नेहमी कृतज्ञ आहे आणि यापुढेही राहील, अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. रविराज देसाई (दादा), ॲड. इंद्रजितजी चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा), जयराज देसाई (दादा) यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.

०००००