नवी दिल्ली येथे येत्या दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची राजधानी नवी दिल्लीत होणारे हे पहिलेच साहित्य संमेलन असून, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याची पार्श्वभूमी या संमेलनास आहे. समकालामध्ये मराठी साहित्य याबद्दल खूप उलट आणि सुलट चर्चा सर्वत्र ऐकायला मिळते. एकीकडे मराठी वाचक खूप कमी होतात अशी चर्चा होताना दिसते व पुस्तक वाचली जात नाहीत अशी चर्चा होताना दिसते. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, तरी देखील एक चर्चा मराठी भाषा ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे, अशीही चर्चा काही अभ्यासक करताना दिसतायत. वास्तविक, मराठी साहित्य कोण वाचतं याचा जर आढावा घेतला तर केवळ महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक यांच्या पलीकडे मराठी वाचकांचं फार मोठं जग आहे, आणि या सर्व वाचकांची जर प्रतिक्रिया पाहिली, या पुस्तकांकडे पाहण्याची तर ती अतिशय स्वागतार्ह आहे. म्हणजे अलीकडच्या पाच-दहा वर्षांमध्ये, जर कोरोनाचा काळ सोडला तर मराठी पुस्तकांची निर्मिती आणि प्रकाशनाची संख्या गती अतिशय वेगवान आहे. तितकीच गती ही पुस्तक विक्रीची आहे आणि सर्व स्तरावरती वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तके वाचणारे वाचकही वाढत आहेत. म्हणजे एखाद्या पुस्तकाची आवृत्ती एका विशिष्ट काळामध्ये २५-२५ वर्षे जात नव्हती, पण अलीकडचं चित्र उलटं आहे. म्हणजे बऱ्याच पुस्तकांची आवृत्ती ही वर्षात-दोन वर्षात संपताना दिसते.
उदाहरण द्यायचं झालं तर शरद बाविस्कर यांची “भूरा कातंबरी” एका वर्षांमध्ये सहा आवृत्त्या गेल्या. अशा पद्धतीने अनेक पुस्तक आहेत की ज्यांची ७००-८००-१००० पुस्तकांची आवृत्ती ही वर्षभरात संपलेली आहे. याचा अर्थ कोणीतरी वाचतय, त्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या वाढते आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जिथं पुस्तक विक्री केंद्र आहेत किंवा प्रदर्शने भरली जातात तिथे मोठ्या संख्येने पुस्तके विकली जात आहेत, आणि ती सर्व प्रकारची पुस्तक विकली जातायेत. शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी ग्रंथप्रदर्शन भरवलं जातं. या वर्षीचा आढावा घेतला तर अतिशय वैचारिक जी पुस्तक, संशोधनात्मक आहेत, वर्षानुवर्षाच्या मेहनतीने तयार केलेली आहेत, अशी बुद्धिजीवी वर्ग वाचतील अशी पुस्तके देखील शेकड्याने विक्री झालेली आहेत. याचा अर्थ पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या ही वाढते आहे किंवा अबादित आहे, त्यामुळे चिंता व्यक्त करण्याचं कारण नाही.
वर्गातली मुलं वाचतायत की नाही याबद्दल सर्व्हे केले, असता समाधानकारक उत्तर मिळत नाही किंवा कोरोनाच्या काळानंतर वर्गात विद्यार्थी येण्याची संख्या कमी होते आहे. परिणामी, असं वाटतं की वाचक कमी होतायेत, पुस्तके वाचली जात नाहीत. पण तसं चित्र नाहीये. विद्यार्थी देखील काही दिवसांनी परततील. काही दिवसातच असं चित्र लक्षात येईल की वर्गा बाहेर राहून हाती काही लागत नाही. किमान वर्गात बसल्यानंतर जे काही ऐकू येतं कानावरती पडतं त्यातूनच व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो. हे वर्गात एखादा शिक्षक शिकवू लागल्यानंतर बोलण्याच्या ओघात पाच-पंचवीस पुस्तकांची नावं, लेखकांची नावं, त्यांच्या लेखनाबद्दलची चर्चा येत राहते आणि त्यातूनच वाचक घडतात. ही प्रक्रिया नक्कीच वर्गात सध्या खंडित आहे, पण बाहेर जर आपण सोशल मीडियावरती पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पुस्तकांची चर्चा होताना दिसते.
जुनी पुस्तक विकत घेणारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे, पुस्तक विकणारा वर्ग तयार झालेला आहे, खूप नवीन मुलं पुस्तक विक्रीच्या क्षेत्रामध्ये आलेली आहेत आणि त्यांचे अनुभव खूप उत्तम आहेत. अतिशय उत्तम दर्जाची पुस्तक निर्मितीची देखील प्रक्रिया मराठीमध्ये सुरु झालेली आहे. काही प्रकाशन संस्था अतिशय उत्तम दर्जाची पुस्तक तयार करत आहेत. हे सगळं वातावरण उत्साहवर्धक आहे. वाचक वाढतायेत, पुस्तक संख्या वाढते आहे, लेखक वाढतायेत, अनेक प्रकारचं लेखन मराठीमध्ये येऊ लागलेल आहे. रिपोर्टाज पद्धतीचं, संशोधनात्मक, ललित आणि नवोदित लेखकांमध्ये जर पाहिलं तर अतिशय दमदार अशा कथा लिहिणारे कथाकार, कादंबरीकार, कवी समोर येतायेत आणि ही सगळी गोष्ट अतिशय स्वागतार्ही आहे, उत्साहवर्धक आहे मराठीच्या वाचकांसाठी आणि मराठीच्या वातावरणासाठी फारच आनंदायी अशी गोष्ट आहे.
खरंतर सगळ्या मराठी भाषिकांनी, भाषिकांना अभिमान वाटावा अशी एक दैदीपीमान परंपरा संतांची मराठीमध्ये आहे. ज्ञानेश्वरांपासून मराठी संतांनी अतुलनीय असं योगदान दिलेले आहे. म्हणजे प्रत्येक संतांवरती स्वतंत्र पणे बोलता येईल इतकं योगदान प्रत्येकाचं आहे. शिवाजी विद्यापीठाने १८०० पानाचं गाथेचं निरूपण प्रकाशित करून एक वर्ष व्हायच्या आधी ते संपलं. त्याच्या ११०० प्रती विकल्या गेल्या, ही अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनामील १८०० पानाचं वैचारिक लेखन हातोहात विकलं जातं, तेही विद्यापीठाच्या एका खिडकीमधून. कारण आमची विक्री केंद्र महाराष्ट्रभर नाही आहेत. म्हणजे विद्यापीठामध्ये येऊन विकत घेऊन लोकांनी हे संपवले आणि म्हणून त्याची दुसरी अध्यवत आवृत्ती नुकतीच प्रकाशित झालेली आहे आणि तिचा देखील खप तशाच पद्धतीने चाललेला आहे.
दिल्ली इथं बऱ्याच वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही खरंतर खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे मराठी भाषेची वहीवाट इतिहासामध्ये जर शोधली तर या वहीवाटीमध्ये अर्ध्या पेक्षा जास्त भारत येतो. म्हणजे तंजावर पासून दिल्ली पर्यंत अनेक प्रांतांमध्ये एका विशिष्ट काळामध्ये मराठी भाषा ही राजभाषा होती. कालपरवा पर्यंत मध्य प्रदेश मध्ये मराठी भाषा राजभाषा होती, गोव्यामध्ये राजभाषा होती, महाराष्ट्र तर आहेच पण महादजी शिंदे यांच्या रूपाने दिल्लीमध्ये आपण मराठीचा झेंडा रोवलेला होता आणि मराठी माणसाचे जे कार्य आहे हे कार्य जगा समोर आणण्यासाठी दिल्लीत साहित्य संमेलन होणं खूप महत्त्वाचे आहे. खरं कारण मराठी साहित्य हे जागतिक दर्जाचे साहित्य आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही वाचनामधून होते. आपण नेहमी भाषिक कौशल्यांच्या गोष्टी करतो की भाषिक कौशल्य येण्याचा मार्ग एकमेव मार्ग म्हणजे वाचन हे आहे. म्हणजे चांगलं लिहिता येणे, चांगलं बोलता येणे हे आजच्या काळात फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि कोण चांगलं लिहितो, कोण चांगलं बोलतो याचा अभ्यास केला तर जो चांगलं वाचतो तो चांगलं बोलतो, चांगलं लिहितो आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासामध्ये भाषिक कौशल्य फार महत्त्वाची आहेत आणि ती आत्मसात करण्यासाठी समाजातल्या सर्व स्तरातील लोकांनी वाचनाशी जोडून घेणं खूप महत्त्वाचं वाटतं. आज वाचन ही व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर समृद्ध करणारी गोष्ट आहे, समज वाढवणारी गोष्ट आहे, आकलन शक्ती वाढवणारी गोष्ट आहे. त्यामुळे देशाची जर प्रगती व्हायची असेल, आपला देश पुढे न्यायचा असेल, मराठी भाषा पुढे न्यायची असेल तर प्रत्येकाला वाचलं पाहिजे.
-डॉ. नंदकुमार मोरे मराठी भाषा, विभाग प्रमुख
0000