प्राचीन काळापासून भारतीय पारंपरिक लोककलांचे विश्व समृद्ध आणि संपन्न आहे. विविधतेतील एकता हे पारंपरिक लोककलांचे आगळे-वेगळे वैशिष्ट्य आहे. मौखिक परंपरा हे भारतीय लोककला आविष्काराचे वेगळेपण होय. हा वारसा एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या हाती सुपूर्द केला आहे. त्यामुळे या लोकाविष्काराचे आकलन करताना त्यातील सूक्ष्म बारकावे लक्षात घेतले असता काही नवे प्रवाह गोचर होतात. पारंपरिक लोककलांचे जनसंवाद हे सामर्थ्य हे अतिशय लक्षणीय स्वरुपाचे आहे. परंतु, ते उपेक्षित आणि दुर्लक्षित राहिले आहे. पारंपरिक लोककलांचे आणि त्यांच्या आविष्काराचे दृढ नाते हे कलावंतांच्या जीवनाशी निगडीत आहे. देशाच्या, राष्ट्राच्या उन्नतीचेही ते एक प्रमुख साधन आहे.
काय आहे लोकसाहित्य..?
लोक हा बहुवचनी शब्द आहे. लोकांचे आपोआप घडत गेलेले जीवन, त्यांनी निर्माण केलेला परिसर, त्या अनुभवांची गाणी, गोष्टी, म्हणी, उखाणे, चाली-रिती, श्रद्धा-समजुती, देवदेवता, कला, क्रीडा म्हणजे लोकसाहित्य! समूहमनाचा स्वीकार किंवा नकार, समूह मनाने केलेले बदल, बरे-वाईट प्रत्येक युगातच घडत असतात. ‘लोक’ ते स्वीकारीत-नाकारित असतात आणि भाषेतून व्यक्तही करीत असतात. म्हणून लोकसाहित्य सतत घडत-बि-घडत असते, ते केवळ ग्रामीण किंवा भूतकालीन नसते. समाजाच्या विविध स्तरातले लोकमन सामूहिक अबोधपणे ते घडवित आणि मोडीत असते. ते प्रवाही आणि कालप्रवाही असते.
शिक्षितांकडूनच दुर्लक्ष!
मी येथे समग्र लोकसाहित्याबद्दल गंभीर चिकित्सा करीत बसणार नाही. आपल्या डोक्याला मुद्दामहून, अगदी जरासा ताण देण्याचाही माझा यत्किंचितही हेतू नाही. तर लोकमन कालप्रवाहात कोणते लोकसंचित कसे स्वीकारीत जाते, त्याला कशी वळणे मिळतात, गाभा परंपरेतला राहूनही बदल-परिवर्तन कसे होत जाते, यांच्या काही उदाहरणांसह मागोवा घेण्याचा हा एक छोटेखानी माझा प्रयत्न आहे.
इंग्रजोत्तर नागरी शिक्षित समूहातून तमाशासारख्या लोककलांकडे दुर्लक्ष झाले. त्याची जागा ‘नाटक’ या कलाप्रकाराने घेतली. मराठी नाटक हे इंग्रजोत्तर शिक्षित मंडळींनी इंग्रजी नाटकांच्या अनुकरणातूनच उचलले, कारण आज आपण ज्याला नाटक म्हणतो ते शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्यांसाठी तेव्हा उपलब्धच नव्हते. तेथे प्रथम इंग्रजीतून शेक्सपिअरची आणि पुढे अन्य पाश्चिमात्य नाटककारांचीच नाटके शिकविली गेली. स्नेहसंमेलनात त्यांचेच प्रयोग होवू लागले, तेच आम्ही उत्साहाने पाहत आलो. सांस्कृतिक भूक भागवत गेलो.
लोककला आवाहक ताकद!
संस्कृत नाटकेही शिकविली गेली. मग इंग्रजी आणि संस्कृत नाटकांची भाषांतरे, रुपांतरे होवू लागली. मग त्या पद्धतीच्या अनुकरणातून मराठी नाटके लिहिली गेली. पण, नाटकाचा खरा प्राण त्याचा ‘प्रयोग’ असतो. प्रारंभीचा हा भाषांतरित नाटकांचा एक जोरकस प्रवाह आला आणि काही काळ बराच स्थिरावला. १९२५ मध्ये एका नाटककाराला एकदम आपल्या पारंपरिक लोककलांचा बाज एका नागर नाटकात आणावासा वाटला. माधवराव जोशी यांचे ‘संगीत संस्थानिक स्वराज्य अथवा म्युनिसिपालिटी’ हे ते नाटक होय! नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्था उदयास आल्या होत्या. त्या म्युनिसिपालिटीची निवडणूक हा नाटकाचा विषय. धमाल विडंबन आहे हे. आजही कोणी प्रयोग केला तर आजच्याच नगरपालिकांचे हुबेहूब चित्र त्यात आहे असे वाटते.
स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा एकदा देशीपणाची अस्मिता जागी झाली. लोकसाहित्य, लोककलांचा पुन्हा वापर केला गेला. मात्र, नाटकात पुन्हा लोककलांचा उपयोग झाला, तो जर्मन नाटककार बर्टोल्ड ब्रेख्त यांच्या अनुकरणाने. समाजामध्ये सामाजिक, राजकीय परिवर्तन करायचे असेल तर लोककलांमधील सामूहिक आवाहक आणि आश्वासक ताकदीचा प्रयोग आणि उपयोग करून घेणे प्रभावी ठरते. डाव्या विचाराच्या ब्रेख्तने श्रमकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या न्यायाचे प्रश्न मांडण्यासाठी केलेल्या प्रयोगापैकी ‘कॉकेशियन ऑफ चॉक सर्कल’ या ‘अजब न्याय वर्तुळाचा’ (अनु. चिं. त्र्यं. खानोलकर) या अनुवादित नाटकाने मराठी रंगभूमीला एक दिशा दाखविली. सर्वसामान्य लोकांना परिचित अशी एखादी लोककथा लोककलांच्या माध्यमातून मांडायची. ते लोकांना परिचित असते, आवडते. मग त्याच परिचित कथेतून नवा, कालसंवादी आशय, विषय मांडून परंपरेला कलाटणी देवून नव्या काळाशी संवाद साधायचा.
ब्रेख्तच्या या तंत्रातून १९७०-८० च्या दशकात काही भाषांतरित, रुपांतरित नाटके झाली. श्रमकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे भीषण महानगरी वास्तव मांडणारे रत्नाकर मतकरींचे ‘लोककथा ७८’ हे नाटक आले. पुण्याच्या सतीश आळेकर आणि जब्बार पटेल यांनी विजय तेंडूलकरांचे ‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक मराठी रंगमंचावर आणून इतिहास घडविला. हे नाटक आशय आणि प्रयोग दोन्ही दृष्टींनी युगप्रवर्तक ठरले.
वर-वर पाहता कथा ऐतिहासिक, सादरीकरणासाठी दशावतार, भारूड, गोंधळ अशा लोककला प्रकारांचा वापर आणि आशय कालातीत. प्रत्येक वेळी नाटक नवेच वाटावे. याच प्रवाहात मग सतीश आळेकरांचेच ‘महानिर्वाण’ नाटक आले. एकूण मानवी जगण्या-मरणातील विसंगतीवरची ही उपहासिका ‘ब्लॅक कॉमेडी’ म्हणता येईल, अशी आविष्कारासाठी प्रामुख्याने वापरली. कीर्तन शैली म्हणजे एक लोककलाच !
नित्यनूतन आविष्कार !
त्या आधी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकजागरणासाठी ‘राष्ट्रीय कीर्तन’ नावाचा एक प्रकार येवून गेला. तर बहुजन जागरणासाठी म. ज्योतिबा फुले यांच्या काळात ‘सत्यशोधक जलसे’ लोककलावंतांनी लिहिले, सादर केले आणि गाजविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी देखील ‘आंबेडकरी जलसे’ ताकदीने सादर केले अन् गाजविले. समूहमनाला जेव्हा-जेव्हा मरगळ येते, तेव्हा-तेव्हा प्रयोगसिद्ध लोककलांनी नवनवे आविष्कार आणून समाजाला वळण दिले. कारण समूहाला आवाहन
करण्याची प्रचंड ताकद लोककलांमध्ये असते. पारंपरिकता, सामूहिकता, सुबोधता, उत्स्फूर्तता आणि लवचिकता अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे प्रत्येक काळात लोककला नित्य नूतन आविष्कार सादर करीत असतात, करीत आल्या आहेत. स्त्री चळवळींच्या काळातही ‘मुलगी झाली हो…’ या लोकशैलीतल्या पथनाट्याने जागतिक विक्रम केला आहे.
प्रभावी लोकाविष्कार शैली!
एकेकाळी दारूबंदी, स्त्रीभ्रूणहत्या विरोध यावर पोवाडे केले गेले. आजही ही परंपरा त्याच ताकदीने सुरू आहे. ‘म्युनिसिपालिटीची’ आठवण यावी असा पु. ल. देशपांडे यांचा ‘पुढारी पाहिजे’ हे वगनाट्य तुफान गाजले होते.
नाटकांमधून प्रामुख्याने प्रबोधनासाठी, सामाजिक, राजकीय परिवर्तनपर विचार जागृतीसाठी लोकाविष्कार शैलींचा प्रभावी उपयोग पुन:पुन्हा होतो आहे. खरे तर प्रबोधनासाठी समाजमन तयार करण्यासाठी वारकरी, संतांनी प्रथम लोककलांचा प्रभावी उपयोग केला. अंधश्रद्धेतून, नवस-सायास आदी कर्मकांडातून, भक्तीच्या नावावर केल्या जाणाऱ्या आत्मक्लेषी कर्मातून, भोंदू बाबांच्या अध्यात्माच्या नावावर केल्या जाणाऱ्या शोषणातून सर्वसामान्य, निरक्षर, दरिद्री स्त्री-पुरुषांची मने मोकळी व्हावी, त्यांना भक्तीची उन्नत वाट मिळावी, म्हणून संत एकनाथ महाराजांनी भारूडांतून, रूपकांतून केलेल्या रचना सर्वज्ञात आहेत. सर्वच वारकरी संतांचे या क्षेत्रातले योगदान खूप मोठे, नव्हे तर अनन्यसाधारण आहे. आता पुन्हा त्यांचे आविष्कार सादर व्हावेत अशी परिस्थिती आली आहे, असे वाटते.
लोकमनाचा उत्स्फूर्त उद्गार
आतापर्यंतच्या सर्व विवेचनावरून लक्षात आले असेल की, सगळे लोकाविष्कार कालसंवादी राहिले तर टिकतात. केवळ जुने टिकवायचे म्हटले तर ते शक्य नाही. त्याचा अभ्यास जरूर होवू शकतो, व्हायलाच हवा. त्यामुळे परंपरेतले टिकाऊ काय आणि टाकाऊ काय, हे समूहमनच ठरवते. एखादी व्यक्ती नाही ठरवू शकत, हे तेवढेच सत्य म्हणावे लागेल. कारण सर्व (लोक) संस्कृती, साहित्य, कला या लोकसमूह निर्मित, समूहरक्षित आणि समूहाच्या गतीबरोबर घडणाऱ्या आणि बिघडणाऱ्या आहेत.
इंग्रजोत्तर काळात नाटकांखेरीज अन्य कलाप्रकारांचा कसा उपयोग स्वातंत्र्यपूर्व काळातही झाला, हे राष्ट्रसेवादलाच्या कलापथकांतून राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे. एक फरक मात्र इंग्रजोत्तर नागर जीवनात झाला आहे. व्यक्तीनिर्मित साहित्य, कथा, कविता, कला यांच्यावर कर्त्याची नाममुद्रा आली. भांडवली मनोवृत्तीत कॉपीराईट, स्वामित्व हक्क म्हणून ‘अर्थ’ संबंध निर्माण झाले. ते लोकसाहित्य नव्हे, ज्यावर अभावितपणे लोकमनाच्या स्वीकृतीची मोहर उमटते, असे साहित्यही त्याचवेळी समांतरपणे निर्माण होत असते. आहे, त्याकडे फारसे लक्ष जात नाही. कर्त्याची नाममुद्रा प्रारंभी असली तरी तो लोकमनाचा सहज, उत्स्फूर्त उद्गार असल्यासारखा त्याचा वापर लोक नागरी जीवनातही करीतच असतात. उदा. संत वचने.. अनेकदा कर्त्याच्या नावाचेही विस्मरण होते. पण कृती शिल्लक राहते. रूढ लोकसाहित्य, लोककला, या बाहेरच्या काही उदाहरणातून माझे म्हणणे जास्त चांगले स्पष्ट होईल. अशा साहित्याला लौकिक साहित्य अशी संज्ञा वापरली जाते.
कालसापेक्ष अभिव्यक्ती!
संवेदनांची अभिव्यक्ती व्यक्तिनिरपेक्ष पद्धतीने सतत होत असते. ही लोकसाहित्याचीच निर्मिती होत असते. अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जी गाणी वाजवली जातात, ती वस्तीतल्या बायका-मुले गुणगुणताना दिसतात. त्यांचा कर्ता कोणीतरी असणारच, पण त्यावर स्वामित्व लोकमनाचे असते.
आजच्या क्षणाला सुद्धा राजकीय, सामाजिक वास्तवावरच्या चारोळ्या, उखाण्यांसारखे यमक, अनुप्रास साधीत, शब्दचमत्कृती आणि अर्थचमत्कृतीयुक्त एसएमएस, ट्विटरच्या प्रतिक्रिया ही लोकमनाची उत्स्फूर्त, सहज आणि मुख्य म्हणजे मूळ निर्मात्याचा स्वामित्व हक्क नसलेली ही आधुनिक लोकसाहित्य निर्मितीच आहे. स्वरूप बदलले, आशय बदलला तरी तत्व कायम असते. समूहमनाला शब्दातून अभिव्यक्त झाल्याशिवाय राहवत नाही. कधी गंभीरपणे, कधी मिश्किलपणे असा हा प्रवाह आहे. अगदी खळाळत्या प्रवाही पाण्यासारखा. काळ बदलला, जुने संदर्भ सुटले तरी बिघडत नाही. लोककला कालसंवादीच असून, प्रवाही लोकसंस्कृतीच्या असंख्य अगणित पाऊलखुना आहेत. नव्या संदर्भांना नव्या पद्धतीने लोकमन शब्दातून मोकळे करीत पारंपरिक, अस्सल मराठी लोककलांचा आणि लोकसंस्कृतीचा हा झरा अखंडपणे प्रवाहीच राहणार आहे, एवढे मात्र निश्चित!
-डॉ. शेषराव पठाडे, छत्रपती संभाजीनगर. मो. ९६०४८८४०५६
-लेखक लोककलांचे अभ्यासक, लोककलावंत व पत्रकार आहेत.