मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे

मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रातील सूर

 नवी दिल्ली दि. २२ : मराठी तरुणांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम केल्यास निश्चित यश मिळते, असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रातील मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रात उमटला.

नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात “मराठी पाऊल पडते पुढे”  या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर आयोजित चर्चासत्रात बीव्हीजी समूहाचे हणमंतराव गायकवाड, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर व वृत्त निवेदक प्रसन्न जोशी सहभागी झाले होते.

श्री हणमंतराव गायकवाड म्हणाले, मराठी संस्कृती दहीहंडीसारखी असावी, एकमेकांना हातभार लावून पुढे नेणारी असावी. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात आपल्याला काय काम करायचे आहे ते ठरविणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी आहे, आपल्याला ज्या क्षेत्रात आनंद मिळतो तो मिळवावा असे सांगतानाच मला रोजगार, आरोग्य व शेतकरी बांधवांसाठी काम करण्यात आनंद आहे. असे काम करा असा सल्लाही त्यांनी दिला.

मराठी तरुणांनी आपले आवडते क्षेत्र निवडावे व त्या क्षेत्रात झोकून देऊन काम करावे, असे सांगून श्री गायकवाड म्हणाले, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी देशातील शेतकऱ्यांची प्रगती अत्यंत महत्त्वाची आहे. गावातच सर्व सुविधा मिळतील अशा दृष्टीने नियोजनही महत्त्वाचे आहे. गावातच उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील त्यासाठी काम करावे लागणार आहे. आपण दहा लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून काम करत असल्याचेही श्री गायकवाड यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श समोर ठेवून आपण काम करत असल्याचे सांगून श्री. गायकवाड म्हणाले, बीव्हीजी समूहाचा आठ लोकांचा प्रवास आज एक लाख लोकांपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेतही बीव्हीजी ग्रुप काम करत असून जगभर बीव्हीजी ग्रुपच्या माध्यमातून काम विस्तारण्याचा आमचा प्रयत्न आहे. जगात खूप संधी आहेत संधीचा आपण शोध घेतला पाहिजे. कोणतेही काम लहान नाही. आपण निवडलेले काम समर्पित भावनेने करा, असे श्री गायकवाड म्हणाले.

 उद्योजक श्री. रवी पंडित म्हणाले, आपण आपल्या क्षेत्रात काम करताना ते काम चांगले असेल तर तेच काम आपली ओळख निर्माण करते. आपल्या वागण्या बोलण्यातून आपले व्यक्तिमत्व ठरते. आपण आपल्या क्षेत्रात ध्येयाने प्रेरित असाल तर लोकही मागे उभे राहतात. त्यासाठी आपला उद्देश चांगला पाहिजे. नवीन उद्योजक स्वतःच्या बळावर पुढे जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा आदर्श महत्त्वाचा आहे. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाला आपल्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे लागणार आहे. उल्लेख श्री पंडित यांनी यावेळी केला.

 ज्येष्ठ पत्रकार श्री पराग करंदीकर म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात मराठी पाऊल पुढे पडते आहे ही आनंदाची बाब आहे. आपल्याला प्रगतीसाठी सर्वसामावेशक व्हावे लागणार आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील छोट्या-मोठ्या नोंदी आपल्याला ठेवाव्या लागणार आहेत. इतिहासाचे भान ठेवून वर्तमान कवेत घेऊन भविष्याचे नियोजन करावे लागणार आहे. वर्तमानाचा वेध घेताना भविष्याची बांधणी होऊ शकते असेही ते म्हणाले.

 प्रत्येकाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी व प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. आपल्याला वेळेचे नियोजन अत्यंत बारकाईने करावे लागणार आहे. प्रत्येक गोष्ट शिकण्याची वृत्ती बाळगावी यश निश्चित मिळेल  असा विश्वास श्री करंदीकर यांनी व्यक्त केला.

वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी यांनी देशाने उद्योग तसेच विविध क्षेत्रातल्या प्रगतीत आपला सहभाग, उद्योजकांचे योगदान व सद्यस्थितीत सुरू असलेल्या बदलाबाबत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला.

 मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्राला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

0000