टॅपेंटाडेल, केरेसोप्रोडॉल व त्यांच्या सर्व उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश; केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई

मुंबई, दि. २३ : बीबीसी वृत्तचित्रवाहिनीद्वारे २१ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झालेल्या मिडीया रिपोर्टच्या अनुषंगाने, भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या औषध निरीक्षकांच्या संयुक्त पथकाने राज्यातील ‘एव्हिओ (Aveo)’ औषध निर्माण कंपनीच्या कारखान्यावर व स्टोरेज गोदामावर छापा टाकला असून सर्व साठा जप्त केला आहे. त्याचप्रमाणे पुढील उत्पादन प्रक्रिया थांबवून उत्पादनास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

बीबीसी वृत्तचित्रवाहिनीद्वारे २१ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द मिडीया रिपोर्टमध्ये सांगितल्या प्रमाणे ट्रामाडोल, टॅपेंटाडेल, केरेसोप्रोडॉल यासारख्या ओपीओइड्स भारतामध्ये उत्पादित केल्या जात असून त्या नायजेरिया, घाना इ. आफ्रिकन देशांमध्ये निर्यात केल्या जातात. त्याठिकाणी त्यांचा मनोरंजनाच्या उद्देशाने गैरवापर केला जातो. या रिपोर्टमध्ये महाराष्ट्र राज्यातील ‘एव्हिओ (Aveo)’ या औषध निर्मात्या कंपनीचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचे दर्शविण्यात आले असून ती कंपनी आफ्रिकन देशामध्ये टेपेंटाडॉल निर्यात करण्याच्या प्रक्रियेत आहे.

औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा १९५० अंतर्गत सदर कंपनीस यापूर्वीच कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आणि कोणतीही भीती न बाळगता नि:पक्षपातीपणे कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल.

भारत सरकारने २१ फेब्रुवारी रोजी सर्व राज्यांना निर्यात विषयक ना हरकत प्रमाणपत्र आणि टॅपेंटाडेल, केरेसोप्रोडॉल व त्यांच्या अशा सर्व उत्पादनांची निर्मिती करण्याची परवानगी मागे घेण्याचे निर्देशित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वीच वरील मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई करण्यास सुरूवात केलेली आहे.

महाराष्ट्र शासन हे भारत सरकारच्या समन्वयाने अशा प्रकारे देशाची आणि राज्याची बदनामी करणाऱ्या तसेच सर्व विघातक कार्य करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्यासाठी सज्ज आहे. भारत सरकारच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी अशा औषधांची त्वरित तपासणी करणे, त्यांचे उत्पादन थांबविणे तसेच निर्यातीस प्रतिबंध करणे याबाबतचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले असल्याचे ही आयुक्त श्री. नार्वेकर यांनी कळविले आहे.
००००