कोल्हापूर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव, क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधी मिळावा म्हणून प्रयत्न करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्हा आणि विभागीय क्रीडा कार्यालयाच्या कामकाजाचा घेतला आढावा

कोल्हापूर, दि.२४ : जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव असून खेळाडूंना आवश्यक सुविधा त्या त्या ठिकाणी मिळाव्यात असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्ह्याने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके देशाला मिळवून दिली आहेत. जिल्ह्यातून तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, स्वप्निल कुसाळे, वीरधवल खाडेसारखे अनेक खेळाडू देशासाठी प्रतिनिधीत्व करतात. त्या तुलनेत जिल्ह्यात आवश्यक सुविधा गरजेच्या आहेत. यासाठी क्रीडा संकुल अद्ययावत असणे गरजेचे असून आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. त्यांनी जिल्हा क्रीडा व विभागीय क्रीडा विभागाच्या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात घेतला.

या बैठकीला आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच सर्व तालुक्यांचे तालुका क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. आबिटकर म्हणाले, जिल्ह्यात असणाऱ्या केंद्र व राज्य शासनाच्या क्रीडा प्रबोधिनी यांनी परस्पर समन्वयातून कामे करावीत. कोल्हापूर जिल्हा कुस्तीसाठी जगभर ओळखला जातो. त्याचबरोबर जलतरण, नेमबाजी, खो-खो या खेळात येथील खेळाडूंचे मोठे प्राविण्य आहे. त्यासाठी येथील सर्व क्रीडा संकुले अद्ययावत असणे आवश्यक आहे. यासाठी चांगल्या गुणवत्तेची क्रीडा संकुले व्हावीत तसेच खेळाडूंना आवश्यक राहण्यासाठी सुविधा निर्माण व्हाव्यात. जिल्ह्यातील क्रीडाविषयक विकास कामांमधील प्राधान्यक्रम ठरवून खेळाडुंसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने हाती घ्या. याबाबत यादी तयार करून क्रीडा विभाग, खेळाडू तसेच लोकप्रतिनिधी यांनी विचारविनिमय करून ज्या बाबी प्राधान्याने करणे आवश्यक आहेत, त्या लवकर हाती घ्या. जिल्ह्यातील सर्व क्रीडा संकुले वेळेत पूर्णत्वास नेऊन खेळाडूंना आवश्यक असणाऱ्या घटकांचा प्राधान्याने विचार करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या बैठकीत दिल्या.

श्री. आबिटकर म्हणाले, शहरातील हॉकी स्टेडियमवरील सर्व भौतिक सुविधांचा उपयोग चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी तातडीने बैठक घेऊन नियोजन करा. विविध असोसिएशन मार्फत क्रीडांगण उपयोगात आणता येईल का यासाठी प्रयत्न करा. याचबरोबर जिल्ह्यातील तालुका, जिल्हा क्रीडा संकुल तसेच विभागीय क्रीडा संकुल लवकरात लवकर सुरू होतील यासाठीही नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासाठी प्रत्येक तालुक्यातील, जिल्हा स्तरावरील तसेच विभागीय स्तरावरील क्रीडा संकुलासाठी चांगल्या सुविधांचा अंतर्भाव असणारा आराखडा तयार होईल यासाठी नियोजन करा. स्थानिक आमदार तालुक्याच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष असून या सर्व क्रीडा संकुलांबाबत त्यांना आवश्यक माहिती द्या. त्यांच्या सूचना विचारात घेऊन, त्यांच्या मदतीने सर्व कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील होणाऱ्या क्रीडा संकुलाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी यावेळी उपस्थित आमदार अशोक माने यांनी सूचना केल्या. यातील जागेचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून पुढील दोन आठवड्यात जागेचा प्रश्न मार्गी लावू, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. या बैठकीत जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी जिल्ह्यातील क्रीडा विषयक स्पर्धा, योजना तसेच क्रीडा प्रबोधिनीबाबत आढावा दिला.

जलतरण तलावाच्या कामकाजाच्या अनुषंगाने दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश

विभागीय क्रीडा संकुलाचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला. क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांनी विभागीय क्रीडा संकुल तसेच विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा दिला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागीय क्रीडा संकुलामधील जलतरण तलावाच्या कामकाजाच्या अनुषंगाने दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. जलतरण तलावाबाबत असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी महापालिका, क्रीडा संघटना यांच्याबरोबर क्रीडा विभागाने बसून विषय मार्गी लावा. आवश्यकता पडल्यास यामध्ये दोषींवर तातडीने कारवाई करा. यामध्ये आयआयटी पवई व सार्वजनिक बांधकामाच्या अहवालाची तपासणी करून दोषींवर कारवाई करण्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये संबंधित वास्तुविशारद, पुरवठादार तसेच जबाबदार अधिकारी यांच्यावर चुकीचे कामकाज झाले असल्यास कारवाई करण्यात यावी असे ते पुढे म्हणाले.

विभागीय क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यात समितीच्या मार्फत वास्तुविशारदाची नियुक्ती करून क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या सुविधांसाठी तयार केलेला रुपये १५६ कोटींचा प्रस्ताव या आठवड्यात शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे उपसंचालक श्री. पाटील यांनी सांगितले. विभागीय क्रीडा संकुलात वाढीव सुरक्षा भिंत, कबुतरांचा शिरकाव बंद करण्यासाठी, शूटिंग रेंज आणि क्रीडांगणावर विद्युत रोषणाई साठी, धावपट्टी आणि फुटबॉल अद्यावतीकरणासाठी एकूण ६९ लाख रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजनला सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी बैठकीत दिल्या.

०००००००