ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटर,फार्मा क्षेत्रासाठी ‘एपीआय’ उद्योगाला आवश्यक सोयीसुविधांसाठी उद्योग विभागाने पुढाकार घ्यावा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २५: ठाणे क्षेत्रात आयटी डेटा सेंटरला चालना देऊन, औषधनिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देऊन एपीआय उद्योगाला आवश्यक त्या सुविधांना प्राधान्य देण्यासाठी उद्योग विभागाने पुढाकार घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या संस्थेच्या पुढाकाराने ठाणे क्षेत्र विकासासंबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक झाली. यावेळी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया, उद्योग विभागाचे सचिव पी. अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आदी उपस्थित होते.

‘मित्रा’च्या माध्यमातून ठाणे येथे मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेतील विविध मुद्यांचा आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला. ठाणे, नवी मुंबई परिसरात आयटी व डेटा सेंटर वाढविण्यासाठी चालना देणे त्यासाठी एमआयडीसीमध्ये विशेष भुखंड निश्चित करून समर्पित डेटा सेंटर पार्क विकसीत करणे याविषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. उद्योग विभागाने यासंदर्भात डेटा सेंटर पार्कसाठी अधिसूचना काढण्याच्या कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

औषधनिर्मिती लागणारे एपीआय (ॲक्टिव्ह फार्मसिटीकल मॉलिक्युल) उद्योग ठाणे भागात मोठ्या प्रमाणावर असल्याने या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ड वर्ग उद्योगांसाठी लागू असलेल्या सवलती एपीआय उद्योगांना लागू कराव्यात, एमआडीसीने भुखंड द्यावेत आदी विषयांवर चर्चा झाली. एमएमआर क्षेत्रात ३० लाख नवीन घरांची निर्मिती यासंदर्भातही याबैठकीत चर्चा झाली.
००००