अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

प्रादेशिक पर्यटन योजना निधीतून अगस्ति ऋषी मंदिर सभामंडप आणि संरक्षक भिंत कामांचे भूमिपूजन

शिर्डी, दि. २६ –  सामाजिक दायित्व निधीतून अगस्ति ऋषी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, राज्य शासन मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

प्रादेशिक पर्यटन योजनेतून अकोले येथील अगस्ति ऋषी मंदिराच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सभामंडप आणि संरक्षक भिंतीच्या कामांचे भूमिपूजन श्री. झिरवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. पुष्पाताई लहामटे, नगरविकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, अगस्ति ऋषी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ, विश्वस्त परबत नाईकवाडी, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब भोर, ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, माजी नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी, देवस्थानचे व्यवस्थापक रामनाथ मुतडक आदी उपस्थित होते.

अगस्ति महाराजांचे दर्शन व महापूजेचा लाभ घेण्याने आनंद झाल्याचे नमूद करून मंत्री झिरवाळ म्हणाले, अगस्ति ऋषींची महती संपूर्ण देशभर पसरलेली आहे. प्रभू रामचंद्रांनी या आश्रमात तीन दिवस मुक्काम केला होता. असे पवित्र स्थान देशभरात अन्यत्र कुठेही नाही, असे त्यांनी सांगितले.

दूध भेसळीविरोधात शासनाने कठोर पावले उचलली असून मुंबईतील चार नाके सील करण्यात आले आहेत. एकूण ९८ टँकर तपासण्यात आले, त्यापैकी काही परत पाठवण्यात आले.  पनीर व खव्यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार लहामटे म्हणाले, शासनाकडून दूध भेसळ रोखण्यासाठी तसेच तरुणांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. मंदिराच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही.

उपसचिव विजय चौधरी म्हणाले, अन्न व औषध प्रशासन विभागात नुकतीच २८० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यामध्ये अकोले तालुक्यातील आठ उमेदवारांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. के. डी. धुमाळ यांनी केले.

तत्पूर्वी, महाशिवरात्री निमित्त पहाटे तीन वाजता मंत्री नरहरी झिरवाळ  यांनी सपत्नीक महापूजा केली.