श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत् विकास आराखडा तयार करा – सभापती प्रा.राम शिंदे

अहिल्यानगर, दि. २७- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांचे  जीवन आणि त्यांच्या कार्याचे सर्व पैलू देशवासियांना एकाच ठिकाणी पाहता व अनुभवता यावेत यासाठी श्री क्षेत्र चौंडी विकासाचा सर्वसमावेशक असा बृहत् विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले.

चौंडी येथे श्री क्षेत्र चौंडी बृहत् विकास आराखड्याच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत प्रा.शिंदे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर उपस्थित होते.

प्रा. राम शिंदे म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन आणि कार्य हे निःस्वार्थ सेवा, प्रशासनिक कुशलता आणि धार्मिक सहिष्णुतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांचे कार्य समाजातील प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठीच्या विकास आराखड्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच  बैठक घेणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने या विकासाचा सुंदर, आकर्षक व नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या जीवनात कृषी, व्यापार विकास, आदर्श राज्यकारभार, धार्मिक स्थळांचा विकास व संवर्धन आदी बाबींना प्राधान्य दिले. देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या जीर्णोद्धाराचे कार्यही त्यांनी केले. त्यांच्या देशभरातील कार्याचा इतिहास एकत्र करून ऐतिहासिक वारसा व आध्यात्मिक भावनेची जपणूक होईल यादृष्टीने त्याची प्रतिकात्मक स्वरूपात संग्रहालयातून मांडणी करण्यात यावी.

चौंडी येथील विकास कामातून अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा सर्वदूर पोहोचण्याबरोबरच पर्यटनाला अधिक चालना मिळून रोजगार निर्मिती होण्याच्यादृष्टीने विविध बाबींचा आराखड्यात समावेश करावा. विकासकामांसाठी चौंडी परिसरात असलेल्या शासकीय जमिनीची पाहणी, मोजणी करून त्याचा नकाशा तातडीने तयार करण्यात यावा. याठिकाणी बाराही महिने पाण्याची उपलब्धता राहील यासाठी नदी पुनरुज्जीवन व संवर्धनाचा समावेश आराखड्यात करण्यात यावा. चौंडीकडे येणारे रस्ते प्रशस्त व मोठे राहतील याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

दरवर्षी ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनामित्त चौंडी येथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीही उत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने करण्यात येणारी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असेही ते म्हणाले.

यावेळी विस्तृत व व्यापक चोंडी विकास प्रकल्प बृहत् विकास आराखडा १० मार्चपर्यंत तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. बृहत् विकास आराखडा तयार होताच मुख्यमंत्री महोदयांसमवेत या विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

तसेच श्री क्षेत्र चोंडी येथे चालू असलेली सर्व विकासकामे दोन महिन्यात पूर्ण करण्याची सूचनादेखील प्रा.शिंदे यांनी दिल्या.

बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चौंडी येथील विकास कामांना गती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन आणि कार्याचा आदर्श जनतेसमोर असावा  व नवीन पिढीला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी या उद्देशाने चौंडी या गावाचा विकास करण्याच्यादृष्टीने अनेक विकास कामे हाती घेण्यात आलेली आहेत.

सद्यस्थितीत प्रादेशिक पर्यटन योजना व ग्रामविकास विभागाच्या  ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभुत सुविधा पुरविणे या दोन योजनांतर्गत मौजे चौंडी, ता. जामखेड. जि. अहिल्यानगर येथे एकुण रु. २४ कोटी ११  लक्ष रकमेच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.

प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत ९ कोटींची कामे  पूर्ण झाली आहेत. यापैकी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मगाव चौंडी येथील गढीचे नूतनीकरण करणे,  नक्षत्र उद्यान,  संरक्षण भिंत बांधणे,  चौंडी येथे उद्यानातील गढी व परिसरातील शिल्प,  मुख्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण आहेत. तर संग्रहालय,  सिना नदीवर पश्चिम बाजूस घाटाचे बांधकाम करणे आदी कामांना मंजुरी मिळाली आहे.

ग्रामविकास विभागाकडील  मौजे चौंडी  येथे अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान येथे संग्रहालय बांधकाम करणे,  अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान नदीकाठी घाट बांधकाम व सुशोभिकरण करणे,   अहिल्यादेवी होळकर जन्मस्थान येथे दोन स्वागत कमानींचे बांधकाम करणे या कामांसाठीदेखील निधी मंजूर झालेला आहे.

चौंडी  परिसराच्या विकासासाठी शासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांना गती देण्यासाठी व्यापक विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या.

००००