मुंबई, दि. 27 : शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्याबरोबरच विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्य सामाईक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा यासाठी ‘अटल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या विशेष उपक्रमात आतापर्यंत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या उपक्रमाअंतर्गत मॉक टेस्ट्स आणि सायकोमेट्रिक टेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येतो. तसेच या सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर त्या विषयातील शैक्षणिक संधी आणि प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जाताना येणारा ताण कमी होईल आणि शैक्षणिक वाटचालीत पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या उपक्रमात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
सायकोमेट्रिक टेस्टद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व त्यांच्या क्षमतांनुसार योग्य शैक्षणिक आणि व्यावसायिक विषयांची निवड करण्यास मदत होईल. हा उपक्रम केवळ परीक्षा तयारीपुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना शैक्षणिक करिअरला प्रोत्साहन देणारा आहे, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
या उपक्रमात राज्यातील विविध महाविद्यालयांचा सहभाग असून कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या विद्या शाखांचा समावेश आहे. यासाठी विविध माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येत आहे. आतापर्यंत १ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. यामध्ये ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी सराव करता यावा आणि विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक, माहिती उपलब्ध व्हावी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी, https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
००००
काशीबाई थोरात/विसंअ/