दक्षिण कोरियाच्या ‘एचएस ह्युसंग कंपनी’ची नागपूरमध्ये १ हजार ७४० कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाशी सामंजस्य करार

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान 1 हजार 740 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली.

कंपनीने ही गुंतवणूक नागपूरच्या बुटीबोरी येथे ॲडव्हान्स्ड मटेरियल्स उत्पादन क्षेत्रात केली असून यामुळे 400 स्थानिक रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

‘ह्युसंग कंपनी नागपूरच्या बुटीबोरी येथे नवीन अध्याय सुरू करत असून, कंपनी पुणे आणि छत्रपती संभाजीनगर सोबतच आता नागपुरात आपल्या कार्याचा विस्तार करत असल्याचे पाहून आनंद होत आहे. महाराष्ट्रात यापुढेही अनेक प्रकल्प गुंतवणूकीसाठी पुढे येत राहतील, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या सामंजस्य करार प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, ह्युसंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सी इयान ली, वरिष्ठ सल्लागार कॅ. शिवाजी महाडकर, संचालक मनोजित साह, उपव्यवस्थापक नीरज हांडा उपस्थित होते.

ह्युसंग कंपनीविषयी:

ह्युसंग समूह ही दक्षिण कोरियन कंपनी असून टेक्सटाईल्स, केमिकल्स, अवजड उद्योग, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. ही कंपनी कार्बन फायबर, अरामिड फायबर, टायर कॉर्ड, ऑटोमोटिव्ह सीट बेल्ट यार्न, हाय-स्ट्रेंथ इंडस्ट्रियल यार्न आणि फॅब्रिक्स यांच्या उत्पादनात आघाडीवर आहे.

ह्युसंग कॉर्पोरेशन इंडिया प्रा.लि.ची हरियाणा, मुंबई, पुणे आणि चेन्नई येथे कार्यालये आहेत.

पुणे येथील प्रकल्प 2015 पासून कार्यरत असून येथे 350 कर्मचारी आहेत. या कंपनीची ₹845 कोटींची वार्षिक उलाढाल आहे. छत्रपती संभाजीनगर येथील औरिक -शेंद्रा येथे ही कंपनी 2018 पासून कार्यरत असून येथे 500 कर्मचारी काम करत आहेत. याठिकाणीही कंपनीची वार्षिक उलाढाल ₹1 हजार 650 कोटी रुपयांची आहे.

000

संजय ओरके/विसंअ/