अमरावती, दि. 27 (जिमाका) : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी राज्यात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार आहे. तसेच प्रयोगशाळेत प्रलंबित असलेल्या अन्न चाचणी विहित मर्यादेत करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज येथे दिले.
श्री. झिरवाळ यांनी आज अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य विभागांचा आढावा घेतला, यावेळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर आयुक्त रामदास सिद्धभट्टी, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहआयुक्त सचिन केदारे, मिलिंद काळेश्वरकर, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, प्रमोद पाटील, देवानंद वीर, गजानन हिरके, तहसीलदार वैशाली पाथरे, प्रज्ञा काकडे उपस्थित होते.
श्री. झिरवाळ म्हणाले, अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी लवकरच मोबाईल लॅब देण्यात येणार आहे. यामुळे अन्नाची तपासणी करण्यास गती येईल. अन्न प्रशासन विभागाने अन्न परवाना आणि नोंदणीची तपासणी करावी. औषध प्रशासनाने शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा वेळोवेळी तपासावा. त्यासोबतच दुधातील भेसळ रोखण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात. दुधाच्या गुणवत्तेचे निकष ठरविण्यासाठी पशुपालकांकडील दुधाचे नमुने तपासण्यात यावे. पशुपालक ते दुधाची विक्री या साखळीमध्ये भेसळ होत असल्यास त्यावर त्वरीत कार्यवाही करावी. जनावरांच्या चाऱ्यातील विविधता तपासावी. चाऱ्यामुळे दुधातील स्निग्धतेच्या प्रमाणात फरक पडत असल्यास उत्कृष्ट चाऱ्याच्या लागवडीवर भर देण्यात यावा. दुग्धजन्य पदार्थ, मिठाईची निर्मिती आणि विक्रीची कसून तपासणी करावी. अन्न सुरक्षेसाठी अंगणवाडी सेविका, तसेच शाळेत स्वयंपाक करणाऱ्या महिलांना फोस्टॅक या अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्राचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
समाज कल्याण व आदिवासी विभागाच्या वसतिगृहांना ‘हायजिन रेटिंग’ प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्हा शासकीय रुग्णालय व पीडीएमसी, तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल परिसरांमध्ये ‘इट राईट कॅम्पस’ दर्जा मिळवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात. सौंदर्य प्रसाधनात वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या दर्जा तपासणीवर भर द्यावा. दैनंदिन वापरात असणाऱ्या महिलांच्या टिकल्या व धार्मिक कार्यात वापरण्यात येणारे कुंकू यांची गुणवत्ता योग्य राखली जाईल याची दक्षता घ्यावी. यासंदर्भातील उपायोजनांबाबत त्वरीत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
समाज कल्याण विभागाने लाभार्थ्यांना थेट लाभ पोहोचवताना येणाऱ्या अडचणींवर त्वरीत कार्यवाही करावी. लाभार्थ्यांच्या मोबाईल आधारकार्डशी लिंक झाले नाहीत, यातील अडचणी तपासून लाभ मिळवून द्यावा. तसेच पारधी समाजातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘पारधी कॅम्प’ आयोजित करावा. विविध संस्थांच्या मदतीने पारधी वस्तीमध्ये जनजागृती करावी असे निर्देश दिले.
मंत्री श्री. झिरवाळ यांनी बडनेरा येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.