बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव

‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : राजमाता महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना कर्तृत्व व कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळाले असून त्यांचा महिलांनी लाभ घ्यावा. तसेच बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज येथे दिली.

ग्रामविकास व पंचायत राज विभाग, उमेद या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे जिजामाता प्रेक्षागार क्रीडा व व्यापारी संकुल येथे राजमाता विभागस्तरीय सरस तथा बुलढाणा जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीचा शुभारंभ केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, अतिरिक्त मख्य कार्यकारी अधिकारी बि.एम. मोहन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, आशिष पवार, विक्रांत जाधव, राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे, मुख्य लेखाधिकारी प्रकाश राठोड आदी उपस्थित होते.

 

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, केंद्र व राज्य शासन विविध योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी काम करीत आहे. जोपर्यंत महिला स्वावलंबी होणार नाही तोपर्यंत देशाचा संपूर्ण विकास होणे शक्य नाही. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तरच तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते. त्यामुळे महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून खाद्यपदार्थ, सजावटी वस्तू, साहित्य निर्मिती, खेळणे अशा विविध उत्पादनाची निर्मिती करावी. उत्पादीत केलेले वस्तू, पदार्थांची विक्री स्थानिक ठिकाणी, तालुका व शहरी भागात विक्री करावी. केवळ वस्तू उत्पादनावर भर न देता वस्तूची पॅकींग, मार्केटिंग व ब्रॅडींगवर भर द्यावा. यासाठी घरोघरी जाऊन आपल्या मालाची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचवावी, असेही ते यावेळी म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यासाठी 63 हजार घरकुल मंजूर झाले असून यामुळे जिल्ह‌्यातील पात्र गरजू लाभार्थांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार असून कोणीही घरापासून वंचित राहणार नाही. तसेच बचत गटासाठी शासन अल्पदरात कर्ज उपलब्ध करुन देत आहे. तसेच बचत गटांचा समूह तयार करुन मोठे उद्योग निर्मितीसाठी केंद्र शासनामार्फत 50 लाखापर्यंत कर्ज पुरवठा बचत गटांना दिल्या जात आहे. याचा लाभ महिलांनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले की, राजमाता महोत्सव विक्री व प्रदर्शनी महिला बचत गटासाठी पर्वनी असून उत्पादीत केलेल्या वस्तू व पदार्थ ग्राहकापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. महिलांनी खाद्य पदार्थ निर्मिती करण्यापर्यंत सिमींत न राहता लोकांच्या आवडीनुसार वस्तू तयार कराव्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांनी राजमाता महोत्सव प्रदर्शनीतील विविध स्टॉल्सला भेटी देऊन स्टॉलधारक महिलाभगिनींशी संवाद साधला. येथे गृहपयोगी वस्तू, मिलेट्स उत्पादने, बांबूच्या वस्तू, धान्य, विविध शासकीय दालने, विविध खाद्यपदार्थ आदी स्टॉल्स लावण्यात आले असून हा महोत्सव दि. 4 मार्चपर्यंत सुरु राहणार आहेत. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे यांनी प्रास्ताविक केले. चारुशिला माळोदे व गजानन कंकाळे यांनी संचालन तर आभार आशिष पवार यांनी मानले.

राजमाता महोत्सवात बचत गटांची उत्पादने, खाद्यपदार्थ, वस्तू यांची 150 हून अधिक दालने असून, रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या भव्य प्रदर्शनी व विक्री महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

0000000