महाराष्ट्रातील कबड्डीपटूंचा मोठा सहभाग याचा अभिमान; देशातील नामवंत खेळाडू सहभागी
नागपूर, दि. 28 : गावपातळीवर खेळल्या जाणाऱ्या कबड्डी या मैदानी खेळाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या कबड्डीपटूंनी आपल्या क्रीडा कौशल्याच्या बळावर सर्वाधिक विजेतेपद मिळविले आहे. यात महाराष्ट्राच्या खेळाडूंचा सहभाग अधिक असल्याने स्वाभाविकच आम्हाला याचा अभिमान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नागपूर महानगरपालिका आणि लक्ष्यवेध फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्व. रतन टाटा परिरसर, लक्ष्यवेध मैदान, नरेंद्र नगर येथे आयोजित ‘मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धे’च्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. सुप्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी, आमदार प्रवीण दटके, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, गिरीषजी व्यास, संदीप जोशी, अविनाश ठाकरे व मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चांगल्या खेळाडूंना घडविण्यासाठी विविध स्पर्धांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची असते. प्रत्येक खेळाडूला आपले कसब पणाला लावण्याची, खेळाच्या प्रदर्शनातून नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी यातून मिळते. क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. पुण्याच्या पाठोपाठ नागपूर येथील मानकापूर क्रिडा संकुलात जागतिक पातळीवरच्या क्रीडा सुविधा आम्ही उपलब्ध करुन देत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कबड्डीसारख्या मैदानी खेळाला प्रो कबड्डी लीग स्पर्धा व इतर स्पर्धांनी सर्व स्तरात पोहोचून कबड्डीपटूना मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. नागपूर येथील ही अखिल भारतीय पातळीवरची मुख्यमंत्री चषक अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावणारी आहे. इथे प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवित ही स्पर्धा यशस्वी करतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
क्रिकेटच्या या वातावरणात आपल्या देशी असलेल्या कबड्डी खेळासाठी नागपूर येथे एवढा भव्य उत्साह व भव्य आयोजन नागपूरातून यशस्वी होऊ शकते हे नागपूरचे यश व वेगळेपण असल्याचे प्रतिपादन अभिनेते स्वप्नील जोशी यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या देशी मैदानी खेळासाठी सदैव तत्पर असतात, याला प्रोत्साहन देतात हे अधिक महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
नागपूर महानगरपालिकेतर्फे ८ शाळांमध्ये क्रिंडागण विकसित करण्यात येत आहे. प्रतापनगर येथे टेबल टेनिस, एक्सलन्स सेंटर उभारण्यात येत असून दिव्यांगणानाही क्रीडा स्पर्धेत प्रोत्साहन मिळावे यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. याचबरोबर रामनगर येथील मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉन टेनिस कोर्ट साकारले जाणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
२ मार्च पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत पुरुषांचे २० संघ तर महिलांचे १६ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये देशातील अनेक नामवंत खेळाडूंच्या खेळाचा थरार अनुभवण्याची संधी नागपुरकरांना मिळणार आहे. ए मुंबाचा खेळाडू सुरेश सिंग, युपी योद्धा चा खेळाडू गौरव कुमार, हरेश कुमार, भानू तोमर, पुणेरी पलटण चा खेळाडू विशाल चौधरी, हरियाणा स्टीलर्स चा विनय तेवतिया, जयपूर पिंक पँथरचा साहुल कुमार, खेलो इंडियाचा संदेश देशमुख यांच्यासह महिलांच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू सपना खाटीया, प्रांजल, सपना, अपेक्षा टकले हे सर्व खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील.
या स्पर्धेकरिता अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनची परवानगी प्राप्त असून नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मार्गदर्शनात स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धा ऑल इंडिया कबड्डी फेडरेशनच्या अधिपत्याखाली होणार असून स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सुनील चिंतलवार व कन्व्हेनर म्हणून सचिन सुर्यवंशी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
विजेत्या संघाला २ लक्ष ५१ हजार रुपयांचे रोख पुरस्कार
पुरुष गटात प्रथम पुरस्कार विजेत्या संघाला २ लक्ष ५१ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येईल. तर द्वितीय क्रमांकासाठी १ लक्ष ५१ हजार आणि तृतीय क्रमांकाला १ लक्ष १ हजार रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. महिला गटात प्रथम क्रमांकाला १ लक्ष ५१ हजार, द्वितीय क्रमांकाला १ लक्ष १ हजार आणि तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला ७१ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
हे आहेत सहभागी संघ
पुरुष संघ :
सेंट्रल रेल्वे मुंबई, टीएमसी ठाणे, रुपाली ज्वेलर्स मुंबई, हिंदुजा हॉस्पिटल मुंबई, बीएमटीसी बंगळुरू, युवा पलटण पुणे, साई गुजरात, स्टार अॅकेडमी जबलपूर, वेस्ट बंगाल स्टेट, हरियाणा स्टेट, आंध्रप्रदेश स्टेट, युवा एकता लखीटी यूपी, कर्नाटक स्टेट, झारखंड स्टेट, छत्तीसगड स्टेट, बारामती स्पोर्ट्स, एनडी स्पोर्ट्स दिल्ली, जय हिंद वरोरा, राजपूत स्पोर्ट्स जानेफळ.
महिला संघ :
सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साई गुजरात, दिल्ली अकादमी, छत्तीसगड स्टेट, वेस्ट बंगाल स्टेट, तामिलनाडू स्टेट, टीएमसी ठाणे, बारामती स्पोर्ट्स, पेंढरा रोड छत्तीसगड, युवा कल्याण छिंदवाडा, सांगली स्पोर्ट्स, जैन क्लब वरोरा, रेंज पोलिस नागपूर, नागपूर जिल्हा, स्टार अॅकेडमी जबलपूर.
उडान खेल प्रोत्साहन योजनेद्वारे ७४ खेळाडूंना अर्थसहाय्य
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्याकरीता तथा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राष्ट्रीय गेम, राष्ट्रीय स्पर्धा, कनिष्ठ व वरिष्ठ यांच्या स्तरानुसार पदक प्राप्त ७४ पात्र लाभार्थ्यांना एकूण ५७ लक्ष ८९ हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात येत आहे. यातील प्रातिनिधीक खेळाडूना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोख रकमेचा धनादेश देण्यात आला. आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोड, रौनक साधवानी यांच्यासह अनेक प्रतिभावंत खेळाडूंचा समावेश आहे. मनपाद्वारे १० आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडूंना प्रत्येकी २ लक्ष रुपये, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असलेल्या २ खेळाडूंना प्रत्येकी १ लक्ष रुपये, राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त १५ खेळाडूंना प्रत्येकी १ लक्ष रुपये, राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग असलेल्या ९ खेळाडूंना प्रत्येकी २१ हजार रुपये आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील ३८ खेळाडूंना प्रत्येकी ५० हजार रुपये अर्थसहाय्य प्रदान करण्यात येत आहे.