विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी साधला ग्रामस्थांशी संवाद
छत्रपती संभाजीनगर दि.28: – शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचविणे तसेच शासकीय योजने बाबत माहिती देणे या उद्देशाने विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर अंतर्गत एक दिवस गावकऱ्यासोबत या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत आज आदर्श गाव किनगाव येथे करण्यात आला.
फुलंब्री तालुक्यातील आदर्श गाव किनगाव येथे एक दिवस गावकऱ्यासोबत हा नावीन्यपूर्ण उपक्रम विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागातील पंचायत समिती मधील एका गावात राबविण्यात येत आहे. यावेळी आ. अनुराधाताई चव्हाण, सरपंच मनिषा चव्हाण, उपसरपंच किशोर चव्हाण, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपायुक्त विकास सुरेश बेदमुथा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक शिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, पुणे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण सुवर्णा जाधव, जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश पाटील, गटविकास अधिकारी उषा मोरे, कार्यकारी अभियंता बांधकाम सुखदेव काकड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय फुंसे, कार्यकारी अभियंता सिंचन विजय कांबळे, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा शेळके, ग्रामपंचायत अधिकारी अरुण चित्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बागडे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या दोन खोल्याचे लोकार्पण करण्यात आले. विभागीय आयुक्त दिलीप गावडे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आदर्श गाव किनगाव येथील प्राथमिक शाळेत भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पशुसंवर्धन दवाखाना यांची पाहणी केली. गावाने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. गावातील कुटुंबांना ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या करण्यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त विकास सुरेश बेदमुथा यांनी केले. श्री. वेदमुथा यांनी एक दिवस गावकऱ्यांसोबत या उप्रक्रमाबाबत माहिती दिली.
अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांशी संवाद व्हावा. नाळ जुळावी, सर्व यंत्रणा गावात आली. मराठवाड्यातील 76 गावात हा उपक्रम राबविणार आहे. छोट्या अडचणी, प्रत्येक गावात काय अडचण आहे हे जाणून घेणार, गाव सुखी समृद्ध व्हावे याच उद्देशाने उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. शाळा, दवाखाना, पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट.
राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उप्रकम चांगला आहे. किनगावात यापुर्वीदेखील योजनां प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. शेतीतून चांगले उत्पन्न शेतकरी घेत आहेत. पालकांचे आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष आहे. आपल्या मुलांनी चांगला अभ्यास केला तर ते निश्चितपणे पुढे जातील, गरिबी कमी करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शालेय विद्यार्थ्यांनी पुस्तकासोबत इतरही वाचन करायला पाहिजे. आपली संस्कृती, प्रथा, परंपरा, जपल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
आमदार अनुराधा चव्हाण म्हणाल्या की, भारत हा खेड्यांचा देश आहे, खेडी समृद्ध करणे गरजेचे आहे. एक दिवस गावाकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवितांना लोकप्रतिनिधी व अधिकारी या रथाची दोन चाके आहेत. रथाची दोन्ही चाके एकत्रित आली तर रथ पुढे घेऊन जाता येईल, यासाठी समन्वय महत्वाजेचा आहे. समन्यातून योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल. योजनांचा तळागळातील व्यक्तींना लाभ व्हावा. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्व एकत्रितपणे काम करू, असे त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त गावडे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत ठराविक कालावधीत पोहचविण्याच्या अनुषंगाने “एक दिवस गावक-यांसोबत (ग्राम दरबार)” हा नाविन्यापूर्ण उपक्रम छत्रपती संभाजीनगर विभागात राबविण्यात येणार आहे. विभागातील आठ जिल्ह्यातील 76 तालुक्यातील प्रत्येकी एका गावात 28 फेब्रुवारीपासून उपक्रमाची सुरूवात होणार असून गावागावात जाऊन अधिकाऱ्यांचा नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद होईल. प्रत्येक आठवड्यात दर बुधवारी यंत्रणा एका गावात जाणार आहे.
पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी किनगावची यशोगाथा सांगितली. 2009-10 मध्ये गावात विकास कामाला सुरुवात झाली. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वांना व्हावा. हिवरेबाजार हे आदर्श गावचे मॉडेल आहे. त्याच धर्तीवर काम करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग असल्याचे ते म्हणाले.
यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.