लातूर, दि. २८ : शहरातील बार्शी रोड परिसरात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथीच्या लातूर विभागीय कार्यालयासह इतर इमारतींचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामांची पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज पाहणी केली. तसेच या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कुमार मीना, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, सारथीचे राहुल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
‘सारथी’च्या लातूर विभागीय कार्यालय, मुला-मुलींसाठी वसतिगृहे, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण केंद्र आदी इमारतींची उभारणी बार्शी रोडवरील महिला आयटीआय परिसरात केली जात आहे. या कामासाठी राज्य शासनाने १७२ कोटी ८६ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या सर्व इमारतींचे बांधकाम गतीने सुरु असून या कामांची पालकमंत्री ना. भोसले यांनी पाहणी केली. तसेच इमारतींविषयी सविस्तर माहिती जाणून घेवून सर्व संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.