भोकरदनमधील कैलास बोराडेंना झालेली मारहाणीची घटना अमानुष

गुन्हेगारांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई, दि.५: जालना जिल्ह्यातील भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाणीची घटना दुर्देवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील गुन्हेगारांना पाठीशी न घालता त्यांना ‘मकोका’ लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

भोकरदनमधील कैलास बोराडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दा सदस्य शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणाले, यासंदर्भात मी जालनाच्या पोलिस अधीक्षकांशी बोललो आहे. जालन्याचे पालकमंत्री त्या ठिकाणी भेट देणार आहेत. बोराडे यांना झालेली मारहाण अतिशय अमानुष आहे. त्या घटनेचा व्हिडीओ बघितल्यावर अंगावर शहारा येतो इतकी अमानुष पद्धतीने मारहाण झाली आहे.

मारहाणीत जखमी झालेल्या बोराडे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. त्यानुसार त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. मी देखील बोराडे यांच्याशी फोनवरून बोललो होतो. त्यांची विचारपुस केली सरकार तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाहीही त्यांना दिली. या घटनेतील गुन्हेगारांना अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यांना ‘मकोका’ लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
००००