मुंबई, दि. ५ : वस्त्रोद्योग विभागाने वस्त्रोद्योगासाठी अनुदान व्यवस्थापन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ई-टेक्सटाईल पोर्टलचा दुसरा टप्पा विकसित केला आहे. हा टप्पा वस्त्रोद्योगासाठी डिजिटल क्रांती ठरणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.
मंत्रालयात ई-टेक्सटाईल पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याच्या मोबाईल ॲपचे उद्घाटन व टेक्सकनेक्ट मासिकाचे प्रकाशन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाले. यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव विरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त संजय दैने, रेशीम संचालनालयाचे संचालक विनय मून, उपसचिव श्रीकृष्ण पवार, रेशीम विभाग उपसचिव श्रद्धा कोचरेकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, आयसीआयसीआय बँकेच्या सहकार्याने विकसित केलेल्या या पोर्टलद्वारे आता अनुदान प्रक्रियेस गती देण्यात येत असून अधिक पारदर्शकता आणि विस्तारित सेवा याद्वारे मिळणार आहेत. या सेवांमध्ये तांत्रिक वस्त्रोद्योग, लघु वस्त्रोद्योग, हातमाग, रेशीम उद्योग तसेच संबंधित घटकांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे ई-टेक्सटाईल पोर्टल आता तांत्रिक वस्त्रोद्योग, हातमाग आणि रेशीम उद्योगासह सर्व प्रमुख वस्त्रोद्योग क्षेत्रांना चालना मिळेल. या विस्तारामुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रत्येक भागधारकाला जलद, पारदर्शक आणि प्रभावी डिजिटल प्लॅटफॉर्मचा लाभ मिळणार असल्याचेही वस्त्रोद्योग मंत्री श्री. सावकारे यांनी सांगितले.
0000
मोहिनी राणे/ससं/