संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे यथोचित स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 5 : संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे यथोचित स्मारक उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये सांगितले.
सदस्य निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ, भावना गवळी, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची जागा कमी पडत असल्यास या स्मारकासाठी नजिकची आणखी काही जमीन अधिग्रहित करण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक, शूर सेनापती, शौऱ्याचे प्रतिक होते. त्यांच्या पराक्रमाला साजेल असे स्मारक उभारण्याचा मानस आहे. छत्रपती संभाजी महारांजांच्या शौऱ्याविषयी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले “देश धरमपर मिटने वाला। शेर शिवाका छावा था।। महा पराक्रमी परम प्रतापी। एकही शंभू राजा था॥” अशा शब्दात त्यांनी शौर्य वर्णन केले.
कर्नाटक येथील होदिगेरी येथील शहाजी महाराजांच्या समाधी परिसराची डागडुजी करून याठिकाणाचा विकास करण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार त्यास राजी नसल्यास किंवा त्यांना ते शक्य नसल्यास सदर जागेचे महाराष्ट्र शासन स्वतः सुशोभिकरण करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड, पिंपळगाव, नांदगाव, येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेमध्ये सांगितले.
मंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली होती. या समितीने नाशिक ऐवजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असेलेला जिजामातांचा वाडा 350 वर्षापूर्वी जसा होता तसा उभा करण्यात येणार आहे आणि त्याठिकाणीही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. सिंदखेड राजा येथील जिजामातांचे जन्मस्थान विकसित करण्यात येणार आहे, उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.
0000
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५४ वसतिगृहे सुरु; मुख्यमंत्र्याकडून इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे कौतुक
मुंबई, दि. 5 : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात 54 वसतीगृहे सुरु करण्यात आली आहेत. तर आणखी 18 वसतिगृहे येत्या जूनअखेर सुरू होतील, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली. तसेच वर्षभरात 54 ओबीसी वसतीगृह सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री. सावे यांचे सभागृहात अभिनंदन केले.
विधानपरिषदेत सदस्य अभिजीत वंजारी यांनी ओबीसी वसतिगृह आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरावेळी ते बोलत होते.
मंत्री सावे म्हणाले की, राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित 72 वसतिगृहांपैकी 54 वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये 26 मुलांची आणि 28 मुलींची वसतीगृहे आहेत. उर्वरित वसतीगृहे या शैक्षणिक वर्षांपासून सुरु होतील. याशिवाय, ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. मुंबई, आणि महानगर परिरसरातील इमारतीसाठी शासनाने भाडे वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित 18 वसतिगृहे येत्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच जून-जुलैमध्ये सुरू होतील. सर्व वसतिगृहे स्वमालकीची असावीत यासाठीही विभाग प्रयत्नशील आहे. तसेच वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा निधी थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. यंदाच्या वर्षी बँक खात्यांमधील काही त्रुटीमुळे हा निधी वितरणास वेळ लागला आहे. परंतू पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निधी वेळेत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असेही श्री. सावे यांनी सांगितले.
0000
हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/
वरळी येथील शासकीय वसाहत इमारतींच्या संरचनात्मक परीक्षण दुरूस्तीची कामे प्रगतीपथावर – दुग्धविकास विकास मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 5 : वरळी येथील शासकीय वसाहतीतील इमारतींचे संरचनात्मक परीक्षण कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वरळी यांचेमार्फत करण्यात आले असून, त्यानुसार इमारतींच्या देखभाल दुरूस्तीकरिता व धोकादायक पाण्याची टाकी निष्कासित करण्यात आली आहे. दुरूस्तीची कामे सुरु असल्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य सुनिल शिंदे, मिलिंद नार्वेकर यांनी वरळी दुग्धशाळा वसाहतीच्या पुनर्विकासाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
दुग्धविकास मंत्री श्री.सावे म्हणाले, दुग्धशाळेतील कर्मचाऱ्यांना मोफत घरे देण्याबाबत शासनाचे कोणतेही धोरण नसून वरळी वसाहतीतील इमारती कमकुवत झाल्याने इमारतीतील कर्मचाऱ्यांना पर्यायी सोय म्हणून वरळी येथील उपलब्ध असलेल्या पर्यवेक्षीय तसेच कामगार वसाहतीतील शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे श्री.सावे यांनी सांगितले.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य विक्रम काळे, प्रवीण दरेकर, सुनील शिंदे, भाई जगताप अभिजित वंजारी यांनी चर्चेत सहभाग घेतला.
0000
राजू धोत्रे/विसंअ/