कोअर वन क्षेत्रात तृणधान्य भक्षक प्राण्यासाठी कुरण निर्मितीस प्राधान्य – वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. 5 :- वाघांचा अधिवास असलेल्या कोअर वन क्षेत्रात तृणधान्य भक्षक प्राण्यांना मुबलक प्रमाणात अन्न मिळाल्यास हिंस्र वन्य प्राणी आणि मानव संघर्ष टाळता येणे शक्य आहे. यासाठी कोअर वन क्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांसाठी कुरण निर्मिती करण्यास प्राधान्य देण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य
नरेंद्र भोंडेकर, नाना पटोले, राजू कारेमोरे, आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला
वन मंत्री नाईक म्हणाले, हिंस्र प्राण्यांना त्यांच्या अधिवासात त्यांचे भक्ष मिळाल्यास ते त्या क्षेत्रातून बाहेर जाणार नाहीत. त्यांच्या अधिवास क्षेत्रात तृणभक्षक प्राण्यांचा वावर वाढविण्यासाठी अशा प्राण्यांकरिता तेथे कुरण निर्मिती आवश्यक आहे. अशा कोअर वन क्षेत्रात वन विभागामार्फत फणस, जांभूळ, सिताफळ आदी झाडांचे लागवड करून तृणभक्षक प्राण्यांसाठी अन्नाची उपलब्धता करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
राज्याच्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पांमुळे राज्यात वाघांची संख्या वाढली आहे. विविध राज्यांमध्ये तेथील उद्योग घटकांनी प्राणी संग्रहालयात ठेवण्यासाठी वाघाची मागणी केल्यास राज्यातील व्याघ्र संरक्षण प्रकल्पामध्ये असलेले वाघ अशा प्राणी संग्रहालयात देण्याबाबत केंद्राकडे परवानगी मागण्यात आली आहे, असेही वनमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.
जंगलाच्या शेजारील गावातील ग्रामस्थांचे वनावरील अवलंबन कमी व्हावे याकरिता डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना राबविण्यात येत असून या योजनेद्वारे ग्रामस्थांना रोजगार प्रशिक्षण, गॅस वाटप, बायोगॅस, सोलर दिवे, सौर कुंपण, फेनसिंग असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच या योजनेअंतर्गत संरक्षित क्षेत्रालगतच्या गावातील शेतकऱ्यांना सौर कुंपण देण्याची बाब समाविष्ट करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
माटोरा येथील संरक्षित वनामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या दोन घटना घडल्या असून मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसास प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात आले असून प्रचलित नियमातील तरतुदीनुसार प्रत्येकास उर्वरित पुढील 15 लाख रुपये देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे वनमंत्री यांनी सांगितले.
वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष टाळणे यासंदर्भात अधिक उपाययोजना करण्याबाबत सर्व संबंधितासमवेत अधिवेशन दरम्यान बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिल्या.
०००००
बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. 5 :- बोगस औषध खरेदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. बोगस औषधी खरेदीसंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
सदस्य सुनील प्रभू यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली केली होती. या चर्चेत सदस्य नाना पटोले, अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, याप्रकरणी केलेल्या तपासामध्ये मे. मिनिस्टल कॉम्बिनेशन ही उत्तराखंडची औषधे कंपनी अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आले. या उत्पादकांनी उत्पादित केलेल्या औषधांचा साठा विश्लेषणार्थ घेऊन चाचणी करण्यात आली. चाचणीअंती या कंपनीकडून उत्पादित औषधे बनावट असल्याचे आढळून आले. या बनावट औषधांचा पुरवठा करणाऱ्या पेढ्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. या पेढ्यांचे परवाने 30 सप्टेंबर 2024 पासून रद्द करण्यात आले आहेत. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या चर्चेच्या उत्तरात सहभाग घेताना सांगितले.
०००००
एकनाथ पोवार/विसंअ
शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी समितीच्या अहवालानंतर संबंधितांवर कारवाई – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 5 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुतीसाठी एका 26 वर्षीय महिलेला 11 फेब्रुवारी 2025 रोजी दाखल करण्यात आले. प्रसुतीनंतर अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्यामुळे महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य मोहन मते यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
लक्षवेधी सूचनांच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले, अशा प्रकरणी डॉक्टर किंवा रुग्णालय यांच्याकडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला आहे का? याबाबत तपासणी करण्यासाठी 26 मार्च 2010 च्या शासन निर्णय अन्वये जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेमार्फत सदर प्रकरणाचे संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.
000
कंपनीतील दुर्घटनांसंदर्भात कायद्यात सुधारणा करणार – कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर
मुंबई, दि. 5 : कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांसंदर्भात कामगारांच्या हितासाठी कामगार विभागाला अधिकाधिक अधिकार मिळावेत. यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी औद्योगिक वसाहतीत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत झालेल्या ऑपरेटरच्या मृत्यूप्रकरणी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री राजू तोडसाम, नाना पटोले, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर यांनी सहभाग घेतला.
कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, कंपन्यांमध्ये दुर्घटना होऊन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, जखमी झाल्यास अशा दुर्घटनेमध्ये कामगार विभागाचे अधिकारी तेथे जाऊन याप्रकरणी तपासणी करतात. तपासणीअंती अहवाल सादर करतात. कामगार विभागाच्या माध्यमातून न्यायालयात खटला दाखल करता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ऑपरेटरच्या वारसाला कारखाना व्यवस्थापनाद्वारे सानुग्रह अनुदानाची 70 लक्ष रुपये रक्कम देण्यात आली आहे. तसेच मृत कामगाराच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत, गट विमा व उपदानाची रक्कम लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कळविले आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांबाबत कामगार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर येथे आढावा घेण्यात येईल. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा किंवा नवीन कायदा करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
0000
निलेश तायडे/विसंअ/
जीबीएस आजाराबाबत व्यापक जनजागृती राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. 5 : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नसून शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास होतो, असे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या आजाराबाबत राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले असून मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
‘जीबीएस’ आजाराबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर, मनोज जामसुतकर,चेतन तुपे, सिद्धार्ध शिरोळे, नाना पटोले यांनीही सहभाग घेतला.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, राज्यात पुणे जिल्ह्यात 9 जानेवारी 2025 रोजी पहिला जीबीएस चा संशयित रुग्ण आढळला. 3 मार्च 2025 पर्यंत 222 संशयीत रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 193 रुग्णांचे निदान झाले आहे. सद्यस्थितीत जीबीएस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत नाही. जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हा आजार समाविष्ट करण्यात आला असून गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.
पुणे येथे नियमित सर्वेक्षण सुरू असून बाधित भागातील 89 हजार 514 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मी स्वतः पुणे जिल्ह्यात भेट दिली आहे. बाधित भागातील विहिरीच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रभावित भागातील पाण्याचे क्लोरिनेशन करण्यात आले आहे. राज्यात विविध माध्यमांद्वारे या आजाराविषयी माहिती देण्यात येत असून, लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.
*****
शैलजा पाटील/विसंअ/