मुंबई, दि. 6 : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या संस्कृतीची व परंपरेची ओळख व्हावी, कोकणातील प्रसिद्ध कोळी गीत नृत्य परंपरा सर्वजनास माहिती व्हावी, या उद्देशाने सन 2025 चा कोळी गीत नृत्य महोत्सव दांडेश्वर शंकर मंदिर प्रांगण, खारदांडा, बांद्रा येथे येथे दि. 7 मार्च ते 9 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागावे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात स्थानिक व कोकणातील विविध गायक कलाकार व कोळी गीतासाठी प्रसिद्ध कलापथक आपली कला सादर करणार आहेत. शुक्रवार दि. 7 मार्च 2025 रोजी खार येथील स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी, दांडा कोळी ब्रास बँड पथकाचे मास्तर हरेश पाटील कला सादर करणार आहेत तर दर्याचा राजा या प्रसिद्ध कलापथकाचे श्री अरुण पेदे आणि वेसावकर मंडळी सादरीकरण करतील. शनिवार दि. 8 मार्च 2025 रोजी स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी डोंगरीकर ब्रास बँड पथक मास्तर उपकार डोंगरीकर ब्रास बँड सादर करतील, नाखवा माझा दर्याचा राजा या नावाजलेल्या मंडळाचे दत्ता भोईर आणि उरणकर मंडळी आपली कला सादर करतील.
या महोत्सवाचा समारोप रविवार 9 मार्च 2025 रोजी होणार असून स्थानिक कोळी गीत -नृत्य मंडळी -स्वरांजली ब्रास बँड पथकाचे मास्तर प्रणय पाटील आपली कला सादर करतील. तसेच सुप्रसिद्ध वेसावकर आणि मंडळीचे सचिन चिंचय आणि मंडळी आपली कला सादर करतील.
हा कोळी गीत नृत्य महोत्सव रसिक प्रेक्षकासाठी विनामूल्य आहे. श्री दांडेश्वर शंकर मंदिर प्रांगण, खार दांडा, बांद्रा येथे होणाऱ्या महोत्सवात सहभागी कलाकारांच्या कलापथकाच्या, संगीत नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कलारसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
0000
संजय ओरके/विसंअ