विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देणार : कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नाशिक, दि.15 मार्च , 2025 (जिमाका वृत्तसेवा):  मुले ही  राष्ट्राची संपत्ती असून, त्यांना उत्तम शिक्षण व संस्कार शालेय जीवनापासून मिळाल्यास ते सर्व क्षेत्रात आपले नाव नक्कीच उज्ज्वल करतील असा विश्वास व्यक्त करीत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणासाठी आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील,असे प्रतिपादन कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले.

इगतपूरी तालुक्यातील भंडारदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एम्पथी फाउंडेशन चे विश्वस्त मितुल दमाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. सुंदरेश्वरम, लायन्स क्लब ऑफ बॉम्बे अपटाऊनचे नीरव ठक्कर, जगदीश ठक्कर मुख्याध्यापक  रामदास कवठे, सरपंच संगीता घोरपडे यांच्यासह शिक्षक, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. कोकाटे म्हणाले की, भविष्यातील मोठे अधिकारी व सुजान पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शासनाकडून मिळालेल्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत त्यांना उत्तम ज्ञानार्जन शिक्षकांनी करावे. एम्पथी फाउंडेशनचा उपक्रम सुस्त्य असून नाशिक जिल्ह्यात 65 शाळा त्यांनी निर्माण केल्या आहेत. महाराष्ट्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने कळसूबाई शिखर येथे रोप वे साठी 250 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या भागात स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच भव्य स्मारक येथे बांधण्यात येणार आहे.  आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या दृष्टीने साकुर फाटा ते टाकेद पर्यन्तच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार असून येत्या आठ दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना स्थानिक स्तरावर रोजगार निर्माण करण्यासह शेतकऱ्यांचे वीज, पाणी हे प्रश्न कायम स्वरुपात निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले.

यावेळी एम्पथी फाउंडेशन चे  विश्वस्त श्री. दमाणी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कृषीमंत्री श्री.कोकोटे यांनी फित कापून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे लोकर्पण केले व शिक्षकांना इमारतीच्या चावीचे प्रदान केले. शालेय विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांवच्या हस्ते स्कूलबॅगचे वितरण करण्यात आले. मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या रोहित मदगे या युवकाचा सत्कार कृषीमंत्री श्री. कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.
0000000