मुनावळे येथील जलक्रीडेसाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.15 – जावली तालुक्यातील मुनावळे या ठिकाणी जलक्रीडा पूर्ण क्षमतेने सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
दौलत नगर येथील शासकीय विश्रामगृह झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी शशीकांत माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह पर्यटन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
मुनावळे येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सर्व सुविधा निर्माण केलेल्या आहेत. या ठिकाणी जलक्रीडासाठी आधुनिक बोटी आहेत. मुनावळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत यासाठी विविध समाज माध्यमांचा वापर करून या पर्यटन स्थळाची प्रसिद्धी करावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री देसाई यांनी दिले.
मुनावळे येथे पर्यटक येण्यासाठी ठीक ठिकाणी होर्डिंग लावावेत, त्याचबरोबर कास कडून मुनावळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम तातडीने करावे. प्रसिद्धीसाठी एजन्सीची नेमणूक करावी, असेही निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
हेळवाक तालुका पाटण येथील जल पर्यटनाचा पहिला टप्पा लवकरात लवकर सुरू करावा. यासाठी तात्पुरत्या बोट क्लबची उभारणी करावी. विविध विभागांनी पहिला टप्पा सुरू होण्यासाठी तात्काळ ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री देसाई यांनी केल्या.
00000