मुंबई, दि. १८ : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्रुटी पूर्तता शिबिराचे आयोजन २५ मार्च २०२५ रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, मुंबई शहर, पंचशील एम-१, तळमजला, सिद्धार्थ गृहनिर्माण संस्था, माटुंगा लेबर कॅम्प, वाल्मिकी रोड, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे. या शिबिराचा अधिकाधिक लाभ घेण्यात यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, मुंबई शहरतर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करून जातीचा दाखला आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
ज्या विद्यार्थी किंवा अर्जदार यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी त्वरित संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज दाखल करावा. www.bartievalidity.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत समितीकडे सादर करणे आवश्यक आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश प्रक्रियेस लवकरच सुरुवात होत आहे. त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र नसेल, तर विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते. यासाठी आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या त्रुटी पूर्तता शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष धनंजय निकम, सदस्य सलिमा तडवी, संशोधन अधिकारी व सदस्य सचिव सुनिता मते यांनी केले आहे.
०००
शैलजा पाटील/विसंअ/