मुंबई, दि.18 : सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींसाठी केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करुन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ या पोर्टलवर नोंदणी करावी. या संकेतस्थळावर आपला प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील युवांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी केले आहे.
अर्ज कसा करायचा
या योजनेच्या दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करुन इच्छिणाऱ्या उमेदवारांनी http://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर आपला प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज सादर करावा, उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. या अंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. या सोबतच त्यांना दरमहा पाच हजार रुपयेही मिळतील या शिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर सहा हजार रुपये एकरकमी अनुदान दिले जाईल.
या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. उमेदवारांना इंटर्नशिप संधीसाठी http://pminternship.mca.gov.in/ पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. तसेच या योजनेत अर्ज करतांना काही अडचणी आल्यास मुंबई शहरचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण समन्वयक अजय कांबळे यांना 8689872404 या क्रमांकावर संपर्क साधावा, मुंबई उपनगर साठी उमेदवारांना मार्गदर्शनासाठी, जिल्हा समन्वयक परशा अपंडकर (9756786578) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन सहायक आयुक्त, मुंबई शहर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत 12 वी पास, आयटीआय पास व पदवीधर युवकांसाठी अक्सेंचर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन (इंडिया) लिमिटेड, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लिमिटेड, अशोका बिल्डकॉन लिमिटेड, एशियन पेंट्स लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड,अॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, डीबीएस बँक इंडिया लिमिटेड, आयसीआयसीआय प्रुडेंशियल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड, माझागॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यासारख्या नामवंत कंपन्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेतंर्गत 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाईल. कोणत्याही ठिकाणी नोकरी करीत नसलेल्या युवकांसाठी ही योजना असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व उपनगरचे सहायक आयुक्त शैलेश अर्जुनराव भगत यांनी केले आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ