विधानपरिषद कामकाज

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार –  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई, दि. २० : – ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा  ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च, २०२५ रोजी पुरस्कार समितीची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुरस्कारासाठी शिल्पकार श्री. राम सुतार यांची २०२४ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पंचवीस लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

शिक्षणाला ‘एआय’ पूरकच ठरेल – माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. २० : भारतीय शिक्षण धोरणानुसार ‘एआय’ तंत्रज्ञान हे शिक्षणाला पर्याय नाही तर पूरक ठरेल या दृष्टीनेच शासन विचार करीत असून महाराष्ट्राचे ‘एआय’ धोरण तयार होत असून याबाबत आम्ही या धोरणात सातत्याने विचार करीत आहोत, अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी विधानपरिषदेत दिली.

“कृत्रिम बुध्दिमत्ता अर्थात एआय संदर्भात आमदार श्रीकांत भारतीय यांनी विधानपरिषद नियम ९७ नुसार या विषयावर चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेत आमदार ॲड. अनिल परब, अमित गोरखे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आदी या चर्चेत सहभागी झाले.

या विषयाला उत्तर देताना मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले की, आज जगभर एआय तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने होत आहे. त्यामध्ये निर्माण होणाऱ्या संधी, रोजगार, उद्योग आणि तंत्रज्ञान यामध्ये आपला देश मागे पडू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे एआय धोरण तयार करण्याची भूमिका घेतली. याच धोरणाला सुसंगत असे राज्याचे स्वतंत्र एआय धोरण तयार करण्यात येत असून अशा प्रकारचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या धोरणासाठी तज्ञांची समिती गठीत करण्यात आली असून त्यांच्या बैठका होत आहेत. या समितीसमोर शासनाने जे विषय ठेवले आहेत त्यामध्ये एआय आणि शिक्षणावर होणारे परिणाम हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय शिक्षण व्यवस्थेला पूरकच ठरेल, असे राज्याचे एआय धोरण आम्ही तयार करीत आहोत तसेच शिक्षणासोबतच सायबर क्राईम या विषयाचा ही यामध्ये विचार करीत असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.

000

संजयओरके/विसंअ

राज्यात यंदाच्या वर्षी ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. २० : राज्यात यंदाच्या वर्षी १८ मार्च २०२५ रोजीपर्यंत सीसीआय म्हणजेच कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून ४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण झाल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य अभिजीत वंजारी यांनी अल्पकालीन चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री रावल बोलत होते. यावेळी  सदस्य सदाभाऊ खोत, अमोल मिटकरी, परिणय फुके, अरुण लाड यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्यात कापूस खरेदी केंद्र उघडण्यात येतात आणि त्यांच्याकडूनच कापसाची खरेदी केली जाते असे सांगून मंत्री रावल म्हणाले की, यंदा कापसाला लांब धाग्यासाठी ७ हजार ५२१ रुपये तर मध्यम धाग्यासाठी ७ हजार १२१ रुपये हमीभाव देण्यात येत आहे.  कापूस खरेदीसाठी राज्यात १२४ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. कापूस खरेदीनंतर त्याच्या जिनींग आणि प्रेसिंगची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी सप्टेंबर ते सप्टेंबर असा करार प्रेसिंगवाल्यांसोबत केलेले असतात. त्यामुळे कापूस खरेदी बंद नसल्याचे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.

सोयाबीन संदर्भात बोलताना मंत्री रावल म्हणाले की, जवळपास ११ लाख २१ हजार टन सोयाबीन यंदा  खरेदी करण्यात आले आहे. त्याशिवाय तूर, मुग, उडीद, हरभरा या पिकांचीही खरेदी हमीभावाने होत आहे. या पिकांनाही चांगला हमीभाव देण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासन कायमच प्रयत्नशील असून राज्यात सिंचन क्षमतेत वाढ करण्यात येत आहे. सिंचनाच्या चांगल्या सोयी निर्माण झाल्या पाहिजेत. तसेच खासगी बाजार समित्यांच्या बाबत धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहितीही मंत्री रावल यांनी सभागृहात दिली.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत

– राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, दि. २० : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव  तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार दिसून आले आहेत. हे केसगळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत. तसेच पाण्यामुळेही झाल्याचे दिसून येत नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर साकोरे यांनी दिली.

अल्पकालीन चर्चेदरम्यान सदस्य सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डिकर साकोरे बोलत होत्या. यावेळी चर्चेमध्ये सदस्य किशोर दराडे, विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील केसगळतीचा प्रकार गंभीर असल्याचे सांगून राज्यमंत्री बोर्डिकर म्हणाल्या की, या केसगळतीचा प्रकार समोर आलेल्या प्रत्येक गावामध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या ठिकाणचे पाणी, माती, रक्ताचे नमुने तसेच गहू यांचे नमुने गोळा करण्यात आले. त्याच्या तपासणीसाठी आय सी एम आर कडे पाठवण्यात आले आहेत. आयसीएमआरचा अहवाल आल्यानंतर हे केसगळतीचे प्रकार कशामुळे घडत आहेत हे स्पष्ट होईल आणि त्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच या गावांमधील लहान मुले तसेच गर्भवती महिला यांचीही आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. तसेच राज्यात शासानामार्फत अनेक योजना राबवण्यात येत असतात. त्यामध्ये लाभार्थ्यंना धान्य वाटपापासून शिवभोजन, मध्यान्न भोजन अशा योजनांचा समावेश आहे. अशा थेट अन्न धान्य आणि खाद्यांनांशी संबंधित योजनांच्या वाटपामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचा आणि खाद्यांन्नांचे वाटप होते का नाही याची तपासणी करण्यात येते. या खाद्यांन्नांच्या तपासण्या आणखी कडक करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.  आश्रमशाळा तसेच शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या मध्यान्न भोजनाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. जर काही ठिकाणी यामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री बोर्डिकर साकोरे यांनी सभागृहात सांगितले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/