मुंबई, दि. २० : राज्यातील गरजू रुग्णांना दैनंदिन रक्तसाठा, रक्तदान शिबीरे तसेच इतर बाबींची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र शासनाने www.eraktkosh.mohfw.gov.in हे संकेतस्थळ विकसित केले असून या पोर्टलवर सर्व रक्त केंद्रामार्फत माहिती अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे ई-रक्तकोष पोर्टलच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त उपलब्धतेची माहिती वेळेत मिळणार आहे. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्य रक्त संक्रमण परिषद संचलित जे. जे. महानगर रक्तकेंद्र यांच्यावतीने स्वैच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यावेळी आरोग्य मंत्री श्री. आबिटकर बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक महेंद्र केंद्रे, सर जे.जे. महानगर रक्तकेंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. हितेश पगारे यांच्यासह संबंधित डॉक्टर्स व रक्तदाते उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, रक्ताशी निगडीत थॅलेसिमिया, हिमोफिलीया, सिकलसेल व इतर आजारांच्या गरजू रुग्णांना रक्तासाठी धावपळ करावी लागू नये यासाठी रक्त उपलब्धतेविषयक अनुषंगिक माहिती www.eraktkosh.mohfw.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या वतीने आणि ई-रक्तकोष संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत व तात्काळ रक्त उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होणार आहे. सर्व नागरिकांनी या ई-रक्तकोष या संकेतस्थळाचा उपयोग करून जास्तीत जास्त रुग्णांना मोफत आणि तात्काळ रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.
राज्यामध्ये शासकीय, निमशासकीय, सामाजिक संस्था, कार्पोरेशन, खासगी अशा एकूण 395 रक्तपेढ्यांचे/रक्तकेंद्र आहेत. वारंवार रक्ताची गरज असणारे थॅलेसेमिया, सिकलसेल, हिमोफिलिया, कॅन्सर या रुग्णांसोबतच मोठ्या शस्त्रक्रियांच्या वेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना देखील वेळेत रक्त उपलब्ध करून देणे सोयीचे होणार आहे. तसेच या संकेतस्थळाद्वारे रक्तदात्यांना जवळचे रक्त केंद्र रक्तपेढी, रक्त शिबिराची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. राज्यात सुरक्षित रक्ताचा पुरेसा साठा योग्य दरात उपलब्ध होणे यासाठी राज्य रक्त संकलन परिषद नियमित कार्यरत आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालये, सामाजिक संस्था, कार्पोरेट ऑफिसेस इत्यादींच्या माध्यमातून तसेच वारंवार रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात रक्त संकलन करण्यात येते. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ या संकल्पनेतून नागरिकांना मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
0000
अर्चना देशमुख/विसंअ/