नागपूर विद्यापीठात इन्क्युबेशन सेंटर लवकरच – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. २० : राज्य शासनाने नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाला पाच कोटी रुपये मंजूर केले होते, त्यापैकी ३ कोटी ७४ लाख रुपये आधीच वितरित करण्यात आले आहेत. हे इन्क्युबेशन सेंटर एलआयटी (लक्ष्मी नारायण तांत्रिक संस्था) येथे स्थापन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तर तासात दिली.
श्री. पाटील म्हणाले की, एलआयटीला हे इन्क्युबेशन सेंटर उभारण्यासाठी काहीसा वेळ लागतोय. तथापि, उर्वरित निधीही लवकर वेळी दिला जाईल. विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
0000
संजय ओरके/वि.स.अ
फेरछाननीनंतर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. २० : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आतापर्यंत ५३,४२९ विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ देण्यात आला आहे. छाननीमध्ये नाकारल्या गेलेल्या सुमारे ४९,९९९ विद्यार्थ्यांच्या तक्रारींवरही फेरछाननी करून परीक्षा शुल्क माफीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीबाबत विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला होता, त्यास उत्तर देताना मंत्री श्री.पाटील यांनी माहिती दिली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले की, दुष्काळ घोषित झाल्यानंतर एकूण १२ प्रकारच्या सवलतीं देण्यात येतात. यात विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा समावेश आहे. मात्र, बऱ्याच वेळा हे फॉर्म विविध कारणांमुळे नाकारले जातात. यात विद्यार्थ्यांच्या क्षेत्राचा दुष्काळग्रस्त महसूल मंडळामध्ये समावेश नसणे, हे प्रमुख कारण असते. जे विद्यार्थी रिपीटर असतात, त्यांचे फॉर्म तसेच नाकारले जाण्याची शक्यता असते. याशिवाय, काही विद्यार्थी इतर शासकीय सुविधांचा लाभ घेत असल्यास, त्यांचे अर्जही रद्द होत असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले.
000
संजय ओरके/विसंअ/
समग्र शिक्षा योजनेमार्फत ४,८६० शिक्षक पदांची लवकरच पदस्थापना – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. २०: समग्र शिक्षा योजनेतंर्गत ४,८६० शिक्षक पदांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यात दिव्यांग विशेष शिक्षकांच्या २१८ पदांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पदस्थापना येत्या दीड- दोन महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानपरिषद सदस्य ॲड.निरंजन डावखरे, किरण सरनाईक यांनी राज्यातील दिव्यांग शिक्षक कर्माच्यांच्या समायोजनासंदर्भात प्रश्न विचारला होता.
शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे यांनी स्पष्ट केले की, या भरती प्रक्रियेसाठी शिक्षण संचालक यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि छाननी केली जाईल. त्यानंतर येत्या दीड महिन्याच्या आत सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या विशेष शाळा दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून कार्यरत असून, त्यासाठी अधिक पदे उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित विभागाला पाठवण्यात आल्या आहेत. भविष्यात यासंदर्भात एक समिती नेमली जाणार असून, त्याच्या शिफारशीनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी संगितले.
000
संजय ओरके/वि.स.अ
पोषण आहारातून विद्यार्थ्यांना त्रास झाल्याप्रकरणी पुन्हा चौकशी करणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 20 : अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील मौजे आडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहारातून 31 विद्यार्थ्यांना त्रास झाल्याप्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. त्यावर मंत्री श्री.दादाजी भुसे यांनी पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. सदस्य परिणय फुके यांनी यासंदर्भातील मूळ प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत माहिती देताना शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले, आडगाव येथे विद्यार्थ्यांना पोषण आहारातून झालेल्या त्रासाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. कांदा-लसूणच्या पेस्टची मुदत संपलेली होती, नवीन साहित्य आलेले असतानाही मुदत संपलेली पेस्ट वापरण्यात आली. यामुळे संबंधित शाळेतील स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. संबंधित मुख्याध्यापक यांना निलंबित करुन विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच पुरवठादाराला एक लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
यासंदर्भात राज्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसंदर्भात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येत असल्याचेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ
औषधांच्या किमतीमध्ये तफावत आढळल्यास चौकशी करुन कारवाई – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. 20 – पुणे शहरात प्रत्येक मेडिकलदुकानामध्ये एकच औषध वेगवेगळ्या कंपनीची उपलब्ध असून विविध मेडिकल दुकानात वेगवेगळ्या दराने मिळत असल्याबाबत तक्रार प्राप्त नाही. मात्र अशी तफावत आढळून आल्यास त्याची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य श्रीमती उमा खापरे यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. सदस्य श्री.प्रवीण दरेकर यांनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले, केंद्र शासनाच्या औषध किंमत नियंत्रण आदेश, 2013 अन्वये औषधांच्या किंमती नियंत्रित केल्या जातात. एमआरपी पेक्षा अधिक किंमतीत कुणीही औषध विक्री करू शकत नाही. त्यांना मिळणाऱ्या कमिशनमधून ते दर कमी जास्त करू शकतात. खाजगी रुग्णालयात जेनेरिक औषध दुकान सुरू करण्याबाबत निश्चित विचार केला जाईल, असे सांगून डॉक्टरांना जेनेरिक किंवा इतर ब्रँडचे औषध याबाबत स्पष्ट उल्लेख करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही मंत्री श्री.झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
00000
बी. सी. झंवर/विसंअ
राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत लवकरच बैठक – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २० : राज्यात ३५८ तालुक्यांमध्ये १०० तालुका क्रीडा अधिकारी पदे मंजूर असून इतर तालुक्यांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे कार्यभार आहे. पद निर्मितीचा आणि आकृतीबंधाचा प्रस्ताव शासनाच्या पातळीवर विचाराधीन असून लवकरच तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अधिकारी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाबाबत सर्व संबंधित सदस्यांसमवेत लवकरच बैठक आयोजित करून चर्चा करण्यात येईल, असे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अमोल मिटकरी यांनी तेल्हारा (जिल्हा अकोला) येथील तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सदाशिव खोत, शिवाजीराव गर्जे, विक्रम काळे, कृपाल तुमाने, उमा खापरे आदींनी सहभाग घेतला.
मंत्री श्री.भरणे म्हणाले, तालुका क्रीडा संकुल येथे सुविधा अपुऱ्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तथापि लवकरच तीन कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांमध्ये संरक्षण भिंत, इनडोअर हॉल, विद्युतीकरण, ड्रेनेज व्यवस्था, रेन वॉटर हार्वेस्टिंग, क्रीडा साहित्य आदी सुविधा निर्मितीचे अंदाजपत्रक तयार केले जाईल तसेच राज्य क्रीडा विकास समितीसमोर मान्यतेसाठी ठेवून हा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी क्रीडा मंडळे चांगले काम करीत असतील तेथे क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीचे काम त्यांना देण्याबाबत बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. भरणे यांनी सांगितले. शासकीय इमारतींच्या बांधकाम आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासंबंधीचा दर हा २०१४ सालचा आहे. हा दर बदलण्याची शिफारस करण्यात आली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
0000
बी.सी. झंवर/विसंअ/