‘ट्रेड सर्टिफिकेट’ प्राप्त न केलेल्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १९ : केंद्रीय मोटार वाहन कायदा व नियमानुसार वाहनांची नोंदणी करण्यासाठी वाहन वितरक आणि उत्पादक यांनी व्यवसाय प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. केद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांच्या विक्री, व्यापार किवा प्रदर्शनामध्ये गुंतलेले प्रत्येक विशिष्ट प्रतिष्ठान, शोरूम किंवा डिलरशीप संबंधित नोंदणी प्राधिकरणाकडून स्वतंत्र व्यापार प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे. ट्रेड सर्टिफिकेट प्राप्त न केलेले वाहन वितरक व उत्पादक यांनी अशी वाहने विकल्यास ते मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १९२ नुसार दंडास पात्र असणार आहे. अशा वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.

प्रितपाल सिंग अँड असोसिएट, गुरुग्राम यांनी मेसर्स ओला इलेक्ट्रीक मोबालिटी लिमिटेड या कंपनीने एकच ट्रेड सर्टिफिकेट घेऊन राज्यातील विविध ठिकाणी ‘ शोरूम व स्टोअर कम सर्व्हिस सेंटर’ उभारण्यात आले असल्याबाबत तक्रार केली आहे. या तक्रारीबाबत तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.

मंत्री सरनाईक यांच्या आदेशानुसार विशेष तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य, पश्चिम, पूर्व), बोरीवली व पुणे या कार्यालयाच्या अंतर्गत ट्रेड सर्टिफिकेटबाबत ३६ वाहन विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून ३४ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

0000

नीलेश तायडे/विसंअ/