कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील ‘टीडीआर’ गैरव्यवहाराबाबत दंडात्मक कारवाई- मंत्री उदय सामंत

विधानसभा प्रश्नोत्तर

कल्याण – डोंबिवली महापालिका हद्दीतील टीडीआरगैरव्यवहाराबाबत दंडात्मक कारवाईमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : कल्याण – डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील मौजे गावदेवी येथील जमिनीबाबत जमीन विकास हक्क हस्तांतरणात (टीडीआर) गैरव्यवहार झाल्याची चौकशी ठाणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या जमिनीच्या ‘टीडीआर’ गैरव्यवहारप्रकरणी ७ कोटी वसुलीची दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील जमीन विकास हक्क हस्तांतरण बाबत सदस्य किसन कथोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री श्री.सामंत म्हणाले, या गैरव्यवहारप्रकरणी दोन तलाठ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हाही दाखल करण्यात आला असून विष्णू नगर पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

पुणे शहरात पालिकेच्या पथ विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट – मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. २१ : पुणे शहरात महानगर पालिकेच्या पथ विभागामार्फत रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. शहरातील प्रत्येक कामाचे ‘ थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात येणार असून त्यानंतरच देयकांची अदायगी करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

पुणे शहरातील वारजे माळवाडी येथील कामाबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य बापू पठारे यांनी सहभाग घेतला.

चर्चेच्या उत्तरात मंत्री सामंत म्हणाले, पुणे महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या कामांचे मेसर्स इआयएल कंपनी मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येत आहे. पथ विभागामार्फत पुणे शहरात पहिल्या टप्प्यात ८ कोटी ३० लाख रुपयांच्या कामामध्ये ४ कामे पूर्ण करण्यात आली असून तीन कामे प्रगतीपथावर आहे.  तसेच दुसऱ्या टप्प्यातील ३ कोटी ७० लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहे. यामधील काही कामांना कार्यादेश देण्यात आले असून काही निविदा स्तरावर आहे.

नियमानुसार डांबरीकरणाची कामे केलेल्या तीन वर्षे आणि सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्याबाबत पाच वर्ष कंत्राटदारांना डागडुजीचे दायित्व असते. त्यानुसार पथ विभागामार्फत झालेल्या कामांमध्ये निकृष्टता असल्यास संबंधित कंत्राटदाराकडून त्याची दुरुस्ती करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/