मोठ्या इमारतीमधील तात्पुरत्या बांधकामाबाबत दक्षता घेणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २१ : मुंबईतील सिद्धार्थ नगर येथील घटनेनंतर अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी तात्पुरत्या बांधकामांवर अधिक काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात मोठ्या इमारतींशी संबंधित तात्पुरत्या व्यवस्थांमध्ये अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबतचा सदस्य डॉ. ज्योती गायकवाड यांनी प्रश्न उपस्थित केला, तर सदस्य अमीन पटेल यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
उद्योग मंत्री सामंत म्हणाले, मुंबईतील सिद्धार्थ नगर येथे मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांसाठी उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरूपातील पाण्याची टाकी फुटल्याची घटना घडली. पाणी भरत असताना पाण्याचा दाब वाढल्यामुळे टाकी फुटल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेत नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले.
संबंधित ठेकेदाराने मृत मुलीच्या कुटुंबाला अडीच लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली आहे, तसेच जखमींवरील उपचाराचा खर्चही उचलला आहे.महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे की, ही टाकी तात्पुरत्या स्वरूपाची होती आणि कामगार कॅम्पसाठी तयार करण्यात आली होती. मृत मुलगी किंवा जखमींपैकी कोणीही महानगरपालिकेचे कर्मचारी नव्हते असेही त्यांनी सांगितले.
००००
शैलजा पाटील/विसंअ
मुंबईतील रस्त्यांबाबत उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २१ : मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, अशी माहिती उद्येाग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी अध्यक्ष राहुल नार्वेकर सदस्य अमित साटम, अमित देशमुख, आदित्य ठाकरे, योगेश सागर, मुरजी पटेल,अमीन पटेल, वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असून काही कामांमध्ये तडे आढळून आल्याने संबंधित कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे. दोषयुक्त कामाचे प्रमाण एकूण कामाच्या ०.४ टक्के इतके असून, दोषयुक्त कामांसाठी कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर प्रत्येकी ३.३७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोषयुक्त काम कंत्राटदाराकडून स्वखर्चाने नव्याने करून घेतले जात आहे. तसेच, पर्यवेक्षण करणाऱ्या ९१ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवण्यात आला आहे.
या रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचेही उद्येाग मंत्री सामंत यांनी सांगितले.
0000
शैलजा पाटील/विसंअ
मुंबईतील सर्व होर्डिंगचे तीन महिन्यात ऑडिट पूर्ण करणार – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २१ : मुलुंड टोल नाक्यावरील होर्डिंग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) असून, महानगरपालिकेची परवानगी घेण्याच्या अटीवर एमएसआरडीसीने एजन्सीला होर्डिंग लावण्याची परवानगी दिली होती. मात्र, संबंधित एजन्सीने महानगरपालिकेकडून परवानगी न घेताच होर्डिंग लावल्यामुळे महापालिकेने कारवाई केली आहे. मुंबईतील सर्व होर्डिंगचे समग्र लेखा परीक्षण तीन महिन्यांत पूर्ण केले जाणार असून, त्याबाबतचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर करण्यात येईल, असेही मंत्री सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केले आहे.
याबाबतचा प्रश्न सदस्य अमित साटम यांनी उपस्थित केला तर सदस्य योगेश सागर, पराग अळवणी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री सामंत म्हणाले, मुलुंड टोलनाक्यावरील जाहिरात फलक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा प्रक्रियेद्वारे उभारले आहेत. मात्र या जाहिरात फलकांबाबत महानगरपालिकेने तपासणी केली असता, संबंधित फलकांसाठी मुंबई महानगरपालिकेची मान्यता घेण्यात आलेली नसल्याचे आढळून आले असल्याने जाहिरात फलकांवर प्रदर्शित जाहीरातींचे त्वरित काढून टाकण्यात आला आहे. मुलुंड टोल नाक्यावरील होर्डिंगवर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती प्रसारित होणार नाही. परवानगीशिवाय माहिती प्रसारित केल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाईल.
****
शैलजा पाटील/विसंअ/
ठाणे जिल्ह्यातील हाऊसिंग सोसायटी इमारतीवरील मोबाईल टॉवर काढणार – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २१ : ठाणे जिल्ह्यातील मौजे मांडा येथील श्री. विनायक आशिष को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या इमारतीवर इंडस कंपनीने मोबाइल टॉवरची उभारणी केली आहे. या टॉवरमुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार येथील नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. त्यानुसार या इमारतीवरील टॉवर काढून टाकण्याची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
या मोबाईल टावर कारवाई बाबत सदस्य नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य भास्कर जाधव, कृष्णा खोपडे, वरुण सरदेसाई यांनीही सहभाग घेतला.
या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री सामंत म्हणाले, मोबाईल टॉवर उभ्या करणाऱ्या इंडस कंपनीने रहिवाशांचा विरोध जुगारून महापालिकेद्वारा सील केलेल्या टॉवरचा सील तोडून विनापरवानगी प्रक्षेपण सुरू केले. ही बाब कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या निदर्शनास येताच पालिकेने सदर टॉवर अनधिकृत घोषित करून निष्कासित करण्याची कारवाई सुरू केली आहे. आता या टॉवरला काढून टाकण्याचीच कारवाई करण्यात येणार आहे.
0000
नीलेश तायडे/विसंअ/