दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, दि. २१ : दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षावर झालेल्या तक्रारीसंदर्भात सहकार संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 अन्वये चौकशी सुरू आहे. ही चौकशी दोन महिन्यांत पूर्ण होईल आणि त्यामध्ये ते दोषी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिले.
विधानपरिषद सदस्य श्रीकांत भारतीय, शशिकांत शिंदे यांनी सह्याद्री बँकेत झालेल्या अनियमितेची चौकशी करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
सहकार मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी या प्रकरणात अधिनयमाच्या कलम 83 आणि कलम 88 अशा दोन्ही चौकशा सुरू करण्यात आल्या होत्या, परंतु कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत कलम 88 ची चौकशी सुरू करण्यासाठी आधी कलम 83 ची चौकशी पूर्ण करणे आवश्यक असते. कलम 83 ची चौकशी अर्धवट राहिल्यामुळे ती रद्द करून सध्या नव्याने चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री.पाटील म्हणाले की, चौकशी प्रक्रियेत दोषी आढळणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. अशा कारवाईसाठी नियमानुसार वेळ आणि प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
संजय ओरके/विसंअ
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पंधराशे रिक्त पदांसाठी १० एप्रिल रोजी जाहिरात; ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार करणार – सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. २१: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी 450 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. आणखी 1,500 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदभरतीसाठी येत्या 10 एप्रिलला जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य प्रसाद लाड यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री आबिटकर यांनी ही माहिती दिली या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री संजय खोडके, ॲड. अनिल परब, सुनील शिंदे, विक्रम काळे, श्रीमती चित्रा वाघ आदींनी सहभाग घेतला.
मंत्री आबिटकर म्हणाले की, प्रादेशिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागात नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. एमबीबीएस आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक वर्ष ग्रामीण भागात सेवा देणे बंधनकारक असेल, असा निर्णय अंमलात आणला जाईल.
महानगरपालिका आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर देताना मंत्री आबिटकर म्हणाले, औषध वितरणात येणाऱ्या अडचणी दूर करून वेळेवर औषधे उपलब्ध होण्यासाठी महत्त्वाचे आदेश दिले जातील. आरोग्य सुविधांची गुणवत्ता राखण्यासाठी औषधांची एनएबीएल नामांकित प्रयोगशाळांमध्ये तपासणी अनिवार्य केली जाणार आहे. राज्यात वैद्यकीय वस्तू खरेदीसाठी स्थापलेल्या प्राधिकरणाबाबतही त्यांनी माहिती दिली. हा निर्णय औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि भ्रष्टाचार टाळण्यासाठी घेतला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. दर्जेदार औषधे आणि वैद्यकीय उपकरणे कमी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी पुढील टप्प्यात कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.
दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका गोल्डन अवरमध्ये रुग्णांना अतिशय उपयुक्त ठरत आहेत. आता १८०० वाहने प्रस्तावित असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. अपघातप्रवण ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर वाढविणे तसेच तेथे रुग्णवाहिका ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. रुग्णालयांमधील उपहारगृहे चांगली करण्याबाबतही लवकरच धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
***
बी.सी.झंवर/विसंअ
०००
ठाणे शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळण्यासाठी नियोजन – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई,दि.२१: ठाणे शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येला आवश्यक असलेला पाणीसाठा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी नियोजन केले आहे. ठाणे शहराला 1230 MLD (मिलियन लिटर प्रति दिवस) पाण्याची गरज भासेल, याचा अंदाज घेत पाणीपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत सांगितले.
ठाणे शहराला वाढत्या लोकसंख्येनुसार पुरेसे पाणी मिळण्यासंदर्भात सदस्य अॅड निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री श्रीमती मिसाळ बोलत होत्या.
नगरविकास राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या,ठाणे शहरासाठी स्वतंत्र जलसाठा निर्माण करण्याच्या उद्देशाने काळू धरण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एम एम आर डी ए मार्फत 350 कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर करण्यात आले असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे शहराला अधिक प्रमाणात पाणी मिळू शकणार आहे.
ठाणे महापालिकेने पाणीपुरवठा वाढवण्यासाठी विविध स्तरांवर नियोजन केले असून, मिरा-भाईंदर, मुंबई महानगरपालिका, तसेच एम. आय. डी. सी. कडून वाढीव कोटा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, नवीन धरण प्रकल्पाद्वारे शहराला दीर्घकालीन उपाययोजना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ठाणेकरांना भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी नियोजन आणि निर्णय प्रक्रिया वेगाने सुरू आहे, असे श्रीमती मिसाळ यांनी यावेळी सांगितले.
0000
राजू धोत्रे/विसंअ
नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड प्रणाली – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २१ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांना अधिक चांगल्या व जलद सेवा पुरविण्यासाठी इंटिग्रेटेड संगणक प्रणाली विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के, राज्य शासनाकडून २५ टक्के आणि संबंधित महानगरपालिकेकडून २५ टक्के निधी खर्च केला जातो, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
विधानपरिषद सदस्य सर्वश्री अमित गोरखे, सत्यजित तांबे यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत होत असलेल्या प्रकल्पाबाबत सूचना मांडली होती.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, यापूर्वी मे.प्रॉबिटी सॉफ्ट लि. या संस्थेकडून सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले होते. तसेच मे.टेक ९ सर्व्हिसेस या संस्थेला देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले होते. मात्र हे सॉफ्टवेअर इंटिग्रेटेड नसल्याने स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मे.अटॉस इंडिया प्रा. लि. यांना हे काम देण्यात आले आहे.
या सॉफ्टवेअरमध्ये डिजिटल डॅशबोर्ड, डिजिटल सिग्नेचर व अत्यंत संरक्षित लॉगिन सुविधा असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकल्पाचे काम मे २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रॉपर्टी टॅक्ससंदर्भात राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले की, या नवीन सॉफ्टवेअरच्या साहाय्याने थ्रीडी सर्व्हेद्वारे जवळपास साडेपाच लाख मालमत्तांची नोंदणी करण्यात आली आहे.
000
संजय ओरके/विसंअ/
कोरेगाव नगरपंचायत विकास कामांमध्ये गैरव्यवहारप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू – राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई, दि. २१ : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सातारा यांच्या स्तरावर चौकशी करण्यात येत असून त्यांच्या अहवालानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी, नगरपंचायतीने एकाच कामाची दोन वेळा देयके अदा केलेली नसल्याचे स्पष्ट केले.
***
ब्रिजकिशोर झंवर/विसंअ
०००