कौशल्य विभागाच्या माध्यमातून जर्मनीतल्या उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रातले तरुण ठसा उमटवणार –  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

जर्मनीत होणाऱ्या कौशल्य परिषदेसाठी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांना निमंत्रण

मुंबई  दि. २१ : जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्याच्या आर्थिक आणि राजकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत रोजगाराच्या संधी बाबत सकारात्मक चर्चा झाली असून महाराष्ट्रातील तरुण लवकरच जर्मनीत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणार असा विश्वास कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे.

जर्मनीच्या बाडेन वुटेनबर्ग राज्यातील आर्थिक आणि राजकीय विभागाच्या संचालकांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याशी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून आणि कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जर्मनीतले उद्योग आणि आवश्यक कुशल मनुष्यबळ या विषयावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार,कौशल्य विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख आणि महाराष्ट्र रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर यावेळी उपस्थित होत्या.

राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार करण्यात आला आहे. त्यानुसार या करारान्वये आवश्यक बाबींची पूर्तता सध्या केली जात आहे. या अनुषंगाने बाडेन वुटेनबर्ग राज्यातील उद्योग क्षेत्रातील तज्ञ 16 ते 22 मार्च दरम्यान हे शिष्टमंडळ विविध व्यावसायिक आणि औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना भेटी देत आहेत. त्याचबरोबर बाडेन वुटेनबर्गचे आर्थिक आणि राजकीय संचालक ही कराराला गती देण्याचा प्रयत्न करत आहेत.  बाडेन वुटेनबर्ग राज्याचे आर्थिक आणि राज शिष्टाचार विभागाचे संचालक मार्क शुवेकर, कुशल कामगार विभागाचे वरिष्ठ सल्लागार शेमजा एसेल, भारतातील जर्मनीचे उच्चाधिकारी अचीम फॅबिग आणि क्रिस्तोफ रँडरोफ तसेच आर्थिक आणि राजकीय सल्लागार अशुमी श्रॉफ यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

महाराष्ट्रातल्या तरुणांना जर्मनीत रोजगारासाठी कोणतीही अडचण येणार नाही : मनिषा वर्मा

जर्मनीच्या शिष्टमंडळासोबत बैठकीबाबत कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनीषा वर्मा म्हणाल्या की, आम्ही सातत्याने बाडेन वुटेनबर्ग इथल्या विविध अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना आवश्यक असलेली माहिती पूर्तता करत आहोत. जर्मनीच्या शिष्टमंडळासोबत आमची सविस्तर चर्चा झाली असून महाराष्ट्रातल्या तरुणांना जर्मनीत रोजगारासाठी कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी विभागामार्फत घेत आहोत. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात बाडेन वुटेनबर्ग राज्यात कौशल्य विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांना  या परिषदेचे निमंत्रणही या शिष्टमंडळाने दिल्याची माहिती सचिव मनीषा वर्मा यांनी दिली.

महाराष्ट्रातील 880 तरुणांना जर्मन भाषेचे शिक्षण

कौशल्य विभागाच्या  माध्यमाने  महाराष्ट्रातील तरुणांना जर्मनीत रोजगाराची संधी देण्यात येत असून 880 विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे धडे देण्यात येत आहे.  शालेय शिक्षण विभागाकडून 80 तर रतन टाटा व्यावसायिक प्रशिक्षण विभागाच्या माध्यमाने 800 विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी भाषा शिकवली जात आहे. बाडेन वुटेनबर्ग राज्याला आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळानुसार अभ्यासक्रमात ही बदल अपेक्षित असून याबाबत शिष्टमंडळाच्या बैठकीत विचार करण्यात आला आहे.

0000

संध्या गरवारे/विसंअ